पालकांना मुलांचा आयुष्यात विरस होऊ द्यायचा नसतो, तो झालेला बघायचाही नसतो. मुलाचं आयुष्य फारशी वळणं न घेता यशस्वीपणे घडावं, अशी पालकांची धारणा असते. यातूनच लादल्या जातात त्या अपेक्षा, स्पर्धां, उत्तमतेचा ध्यास आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव.
सानिकाचा सातवीच्या स्कॉलरशिपचा रिझल्ट लागला. कमी मार्क बघून आई भयंकर वैतागली. तिचा भरतनाट्यमचा क्लास, घरातील केबल, इंटरनेट गेम सारं काही आईनं बंद केलं. आता केवळ मिशन दहावी हेच आईचं ध्येय बनलं. सानिकाला फक्त अभ्यास एके अभ्यासाची सक्ती आली. याचा जबरदस्त ताण सानिकावर आला. आठवीतल्या पहिल्या सहामाहीतच, नव्वद टक्के मिळवणार्या सानिकाला जेमतेम 75-78 टक्के गाठता आले.
यशला गिटारचा क्लास लावला होता. काहीही करून त्याला चांगला गिटारवादक बनवायचंच असा चंग त्याच्या आईनं बांधला होता. अभ्यास, गिटारचा क्लास, सततच्या स्पर्धा याचा यशला अतिशय त्रास होत होता. यामुळे गिटार शिकणं तर दूरच, धड अभ्यास करणंही यशला जमेनासं झालं आणि शेवटी सायकॉलॉजिस्टची मदत घेणं भाग पडलं…
अशा अनेक घरांमध्ये अपेक्षा, स्पर्धा, अभ्यासाचा बाऊ, स्पर्धेत टिकण्यासाठी रस्सीखेच अशी नाना परीने मुलांची कशा प्रकारे ओढा‘ताण’ करता येईल, याचे सुयोग्य नियोजन केलेले असते. आपलं दडपण मुलांवर टाकून पालक निर्धास्त होतात, पण मुलांचं काय? अशा अनेक घरांत पालकांच्या सर्व अपेक्षा मुलांवर केंद्रीत झालेल्या दिसतात. अभ्यासाचं दडपण तर मुलांवर असतंच. पण याबरोबरच पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार आहोत की नाही, या विचाराचा ताण त्यांना सतत जाणवत असतो.
अर्थात आपल्या मुलाच्या भविष्याबाबत त्रस्त असलेल्या पालकांची यात संपूर्णतः चूक असते असे नाही. आयुष्याच्या खाचखळग्यातून चालताना समोर असलेल्या पर्यायांची मुलांनाच निवड करावी लागणार, याची पुरेशी कल्पना त्यांना आली आहे. म्हणूनच मग हे सगळं पेलायची ताकद आपल्या चिमण्याच्या जिवात यावी, यासाठी त्यांचा आटापिटा सुरू होतो. त्याचा अभ्यास, त्याच्या व्यक्तिमत्त्वाची घडण, या सार्याबद्दल पालकांना उत्तमतेचा ध्यास लागतो.
आजच्या स्पर्धेच्या जगात तणावापासून दूर पळता
येत नाही, हे आपण मान्य केलेलं आहेच. पण या तणावाचा मुलांवर परिणाम होऊ लागला की धोक्याचे संकेत मिळू लागतात. मुलांच्या मनात अवास्तव भीतीमुळे तणाव येऊन न्यूनगंड येतो. याचे गंभीर परिणाम जाणवतातच. अगदी आत्महत्त्येसारखा टोकाचा निर्णय घेण्याइतकी गंभीर परिस्थिती मुलांबाबत निर्माण होऊ शकते. म्हणूनच या तणावांना बाजूला सारत मुलांचं भविष्य घडविण्यासाठी पालकांनी सहभाग घेतला पाहिजे.
तणावाचे प्रकार
साधारणतः मुलांना दोन प्रकारच्या तणावांना सामोरं जावं लागतं. यातील एक असतो नॉरमेटिव्ह तणाव. हे मुलाच्या विकासाच्या भिन्न अवस्थांशी निगडीत असते. अशा तणावातून जाणार्या मुलांना कोणतंही काम दिलं तरी त्याचा त्यांना ताण येतो. जसं, सायकल चालवायला शिकणं, पोहायला शिकणं किंवा लिहीणं इत्यादी. हा ताण न्यूनगंडातून आलेला असतो. अशा मुलांसाठी कोणतीही नवी गोष्ट शिकणं वा करणं अत्यंत तणावपूर्ण असतं.
दुसर्या प्रकारात मुलांच्या रुटीन आयुष्यात कोणताही बदल झाल्यास हा तणाव जाणवतो. या अंतर्गत मुलं, त्यांच्याबाबत कोणताही छोटा मोठा बदल झाला
तर तो सहजासहजी स्विकारू शकत नाहीत आणि अशा गोष्टीचा तणाव येऊ लागतो. यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टीही कारणीभूत असतात. आईवडीलांचा घटस्फोट, घरातील अप्रिय घटना किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू या काही महत्त्वाच्या गोष्टींचा तणाव मुलांना येतो.
तणावाची कारणे
मुलांमध्ये वाढणार्या तणावामुळे चिंतीत होण्याऐवजी याबाबतची कारणे आणि उपाय याचा विचार
पालकांनी करावा.
एकटेपणा
एकाकी कुटुंब किंवा नोकरदार आईवडील असणार्या कुटुंबात मुलांसाठी वेगळा वेळ देणं मुश्किल असतं. मुलांना व्यक्त होण्यासाठी, त्यांनी सांगितलेलं ऐकण्यासाठी कोणीही नसतं. यामुळे त्यांच्या मनातील समस्यांबाबत घुसमट होऊ लागते आणि मुलांचा एकटेपणा वाढत जातो.
अपेक्षा आणि स्पर्धा
मुलांच्या माध्यमातून पालकांना आपली अपूर्ण स्वप्नं पूर्ण करायची असतात. यासाठी मुलांना वेगवेगळे क्लासेस, कार्यशाळांना पाठवतात. यात मुलांचा कल न बघता त्याने प्रत्येक क्षेेत्रात अव्वल असावंच, ही काही पालकांची धारणा असते. पालकांच्या या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याने मुलं स्पर्धांना घाबरतात.
पालकांकडून तुलना
अनेकदा पालकांकडून दोन भावंडांमध्ये किंवा इतर मुलांमध्ये तुलना केली जाते. पालकांनी आपल्या मुलाबाबत सतत तुलनात्मक दृष्टिकोन बाळगल्यास त्याचे इतर गुण दबले जातात आणि मूल कोणत्याही पातळीवर स्वतःमधील चांगल्या बाजू दर्शवण्याचा प्रयत्न करीत नाही. आपल्याला डावलले जात असल्याचा ताण त्याच्या मनावर सतत राहतो.
वयातील बदल
मूल आणि पालक या गहिर्या नात्याचे पोत वाढत्या वयात बदलत जातात. टीनएज हा स्वयंघोषित स्वातंत्र्याचा टप्पा असतो. मुलांना मोठं व्हायची घाई झालेली असते. त्यांना पालकांच्या कचाटयातून सुटायचं असतं. मुलांचे बदललेले विचार, त्याला पालकांचा विरोध, त्यांनी नोंदवलेला निषेध, मागितलेले स्पष्टीकरण आणि उद्भवणारे वाद यामुळे मुलं आणि पालकांमधलं नातं विस्कटतंय असं वाटू लागतं. अशी परिस्थिती नीट हाताळली न गेल्यासही मुलांवर विपरीत परिणाम होतो.
तणावाची लक्षणे
मुलांमधील तणाव वेळीच ओळखणे आवश्यक आहे. नैराश्य आणि तणावामुळे मुलांचं भविष्य उद्ध्वस्त होण्याआधीच मुलांमधील तणाव जाणून घ्यायला हवा. मुलांमध्ये कोणत्याही भावनेचे पडसाद लगेच उमटतात. मुलांचं अती चिडचिड करणं, सतत रागावणं, अबोला धरणं, कोणत्याही गोष्टीबाबत एकवाक्यता नसणं, कुटुंबाऐवजी मित्रमैत्रिणींमध्ये जास्त रमणं ही लक्षणं मुलांमध्ये दिसू लागल्यास पालकांनी लक्ष द्यायला हवं.
तणावाचे उपाय
मुलांना या ताणतणावापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनीच प्रयत्न करायला हवेत. मुलांमधील मानसिक तणावाची योग्य वेळी दखल घेणे, त्याचे निदान होणे आणि त्यावर प्रभावी उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी पालकांनीही काही गोष्टींचे पालन करायला हवे.
मुलांना वेळ देणे
हल्ली आईवडील दोघेही नोकरदार असल्याने मुलांसाठी तुलनात्मक कमी वेळ मिळतो. मुलांसाठी किती वेळ देता यापेक्षा जो वेळ द्याल तो त्यांच्यासाठी गुणात्मकदृष्ट्या मोलाचा असला पाहिजे. मुलाच्या शाळेतल्या दिवसभराच्या घटना, त्याचे मित्रमैत्रिणी, शिक्षक याबाबत सांगायला मुलं उत्सुक असतात. म्हणूनच मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधत वेळ देणं आवश्यक आहे.
क्षमतांनुसार अपेक्षा ठेवणे
शाळकरी मुलांमध्ये अभ्यास, परीक्षा, शिस्त यांचा तणाव असतो. त्यात भर पडते ती पालकांच्या अपेक्षांची. परंतु या अपेक्षांमुळे आपण मुलांवर किती ओझे लादतो आहोत, ते त्यांना पेलवते आहे का, या गोष्टीवर फारसा विचार होत नाही. म्हणूनच आपल्या मुलाची बुद्धिमत्ता व क्षमता यांचा विचार करून अपेक्षा ठेवल्या तर मुलांना याचा ताण येत नाही.
समुपदेशन करणे
मुलं जसजशी मोठी होत जातात तसे त्यांच्या आयुष्यात अभ्यासाव्यतिरिक्त इतर तणाव वाढत जातात. त्यांच्या विचारांची कक्षा रुंदावते. दिशा बदलते. शरीरातल्या बदलांची जाणीव होते आणि कधी कधी काही घटनांमुळे मन:स्थिती संदिग्ध बनते. अशा वेळी मुलांमधील शारीरिक आणि मानसिक बदलांना जाणून मुलांना योग्य मार्गदर्शन देणे गरजेचे असते. या परिस्थितीत तणावाचा सामना करण्यासाठी समुपदेशनाची नितांत गरज मुलांना असते. ज्यायोगे पालकांच्या मदतीने मुलांचं मन स्थिरावण्यास मदत होते.
मुलांना ‘नाही’ म्हणायला शिकणे
ज्या घरात आईवडील दोघेही कमावते अशा घरात, मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने कधी कधी मुलांच्या सर्व मागण्या तत्परतेने पूर्ण केल्या जातात. मनात अपराधीपणाची भावना बाळगून पालक मुलांच्या अपेक्षा पूर्ण करीत असले तरीही कधी कधी आवाक्याबाहेरच्या मागण्या पूर्ण करणे परिस्थितीवश शक्य नसते. नकाराची जाणीव आत्तापर्यंत न झाल्याने त्यांना हवी असलेली गोष्ट न मिळाल्यास मुलांमध्ये याबाबत तणाव वाढत जातो. म्हणूनच मुलांवर सुसंस्कार असणे आवश्यक आहे. तेव्हा मुलांच्या मागण्या पूर्ण करताना त्याबाबतचा काटेकोरपणा पालकांनीही बाळगायला हवा.
मुलांवर योग्य लक्ष ठेवणे
पालकत्व ही जितकी सोपी तितकीच कठीण गोष्ट आहे. मुलांबाबत योग्य आराखडे मांडताना आपल्या कुटुंबाबरोबरच आजुबाजूच्या परिस्थितीचे संस्कारही त्यांच्यावर होत असतात. यात त्याच्या मित्रपरिवाराचा सहभाग मोठा असतो. मुलांचे मित्रमैत्रिणी, त्याची दिनचर्या, त्याचा अभ्यास, इतर गोष्टींमधील कल याबाबत पालकांनी स्वतः लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
देवावर विश्वास ठेवायला शिकवणे, देवाबाबत मनात विश्वास निर्माण होणे हा संस्काराचा भाग असला तरी आपल्या ताणतणावात श्रद्धेचा वाटा मोठा असतो. ही श्रद्धा देवावरील विश्वासाने आपल्यात निर्माण होते. देवावरील श्रद्धेमुळे चांगल्यावाईट गोष्टींची तुलना मनात आपोआप केली जाते. याकरिता मुलांच्या मनातही याबाबत चांगले संस्कार करावेत.
ओव्हरप्रोटेक्टिव्ह बनू नका
मुलांबाबत सजगता बाळगणे जितके आवश्यक आहे, तितकीच त्यांना मोकळीक देणेही आवश्यक आहे. मुलांवर सतत लक्ष ठेवल्याने, पालकांबाबतची अविश्वासाची भावना मुलांमध्ये निर्माण होते. असे होऊ नये, याकरिता पालक म्हणून आपलं कर्तव्य योग्यरित्या बजावा.
थोडक्यात काय, तर या उमलत्या वयात मुलांना जपावं लागतं. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातलं ओळखावं लागतं. त्यांचा मित्र किंवा मैत्रीण बनावं लागतं. यामुळे हळूहळू पालक-मुलं सुसंवादी वातावरण निर्माण होऊ शकेल.
आपल्या लहानग्याने त्याच्या बाळमुठीत घट्ट पकडलेलं आपलं बोट आपण नेमकं कधी नि कसं सोडायचं,
हा प्रश्न प्रत्येक पालकाला कधी ना कधी पडतोच
किंवा तो पडेपर्यंत मुलाचं बोटं सुटलेलंही असतं. आपल्या मुलाबद्दल आजचा पालकवर्ग अस्वस्थ आहे. या अस्वस्थतेत मुलाविषयीची तळमळ असते, प्रेम असतं. पण त्याला अपेक्षा आणि शिस्तीचं कोंदण लाभलं की, मुलांवर त्याचं सावट निर्माण होतं. तेव्हा सजग पालक म्हणून याचा अवश्य विचार करायला हवा.
स्वरा भास्कर (Swara Bhaskar) अपनी फिल्मों को लेकर कम और विवादों को लेकर ज्यादा सुर्खियों…
अभिनेत्री परिणीती चोप्राचं गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्न झालं.…
टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा बऱ्याच काळापासून सर्वांचा आवडता शो…
ब्लॉकबस्टर फिल्म 'गदर' (Gadar) में सनी देओल (Sunny Deol) द्वारा निभाए गए तारा सिंह (Tara…
जागतिक टेलिव्हिजन डेच्या निम्मिताने 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत भैरवीची भूमिका गाजवत असेलेली अभिनेत्री मेघा धाडेने…
टेलीविजन के सबसे पॉपुलर शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)…