Entertainment Marathi

‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’चं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज (Me Honar Superstar Chhote Ustaad Third Season Coming Soon)

‘मी होणार सुपरस्टार- छोटे उस्ताद’च्या दोन्ही पर्वांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या लोकप्रिय कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले ४ ते १४ या वयोगटातील छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. पहिल्या पर्वाप्रमाणे या पर्वातही परीक्षकांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईचा लाडका गायक आदर्श शिंदे हे आहेत. यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे तीन परिक्षकांमध्ये टॉप १२ स्पर्धक विभागण्यात येणार आहेत. त्यामुळे स्पर्धकांसोबतच परिक्षकांमध्येही सुरांची स्पर्धा रंगताना दिसेल.

पहिला एपिसोड आषाढी एकादशी विशेष भाग असल्यामुळे विठुनामाचा जयघोष करत कार्यक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. महाराष्ट्राला सण-उत्सवांची खूप मोठी परंपरा आहे. त्यामुळे आषाढी एकदशीपासून सुरु झालेला उत्सवाचा माहोल अगदी वर्षभर सुरु असतो. छोटे उस्तादच्या मंचावरही सुरोत्सव साजरा होणार आहे. प्रेक्षकांसाठी छोटे उस्तादचं हे नवं पर्व म्हणजे सांगीतिक पर्वणी असणार आहे.

या कार्यक्रमाविषयी सांगताना सचिन पिळगावकर म्हणाले, “मी होणार सुपरस्टारचं तिसरं पर्व सुरु होत आहे, ही माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. एखादा माणूस जेव्हा बाग लावायची ठरवतो, तेव्हा आधी रोपटं लावतो मग त्या रोपट्याला पाणी घालतो. हळूहळू त्या रोपट्याला अंकुर फुटायला लागतात, फांद्या यायला लागतात, कळ्या यायला लागतात. त्या कळ्या उमलतात आणि त्याचं सुंदर फुल तयार होतं. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद हा कार्यक्रमही मला तसाच वाटतो. याआधी देखिल या मंचावर अशीच फुलं उमलली. ज्यांचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्रभर पसरला. यंदाच्या पर्वातही असाच सुगंध पसरवण्याचा प्रयत्न असेल. फक्त या पर्वातलेच नाही तर या आधीच्या पर्वातली मुलंही आमच्या संपर्कात आहेत. त्यांनाही आम्ही मार्गदर्शन करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. या मुलांना मोठं होताना पाहताना खूप आनंद मिळतो. या पर्वात स्पर्धक तीन परिक्षकांमध्ये विभागले जाणार आहेत. त्यांच्यावर पैलू पाडण्याचा आम्ही प्रयत्न करु. माझा आजवरचा अनुभव मी त्यांच्यासोबत शेअर करणार आहे.”

तर वैशाली सामंत म्हणाली, “छोट्या दोस्तांसोबतचा हा सुरांचा प्रवास अनुभवण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. गेल्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. लहान वयात जे शिकवलं जातं ते मनात कायमचं कोरलं जातं. आपल्या ज्ञानाचा नव्या पीढीला फायदा होतोय याचा आनंद आहे. लहान मुलं जेव्हा गातात तेव्हा अचंबित व्हायला होतं की हा एवढा आत्मविश्वास त्यांच्यात येतो कुठून. हा दैवी अनुभव आहे. इतक्या लहान वयात इतकी समज असणं याचं खरंच कौतुक वाटतं मला. आमचे खूप आशीर्वाद आहेत या सर्वासोबत.”

आदर्श शिंदे देखिल या कार्यक्रमासाठी खुपच उत्सुक आहे. छोटे उस्तादच्या नव्या पर्वाविषयी सांगताना आदर्श म्हणाला, “मी होणार सुपरस्टार- छोटे उस्तादच्या दोन्ही पर्वांना खूप प्रेम मिळालं. या कार्यक्रमातील स्पर्धक खऱ्या अर्थाने सुपरस्टार झाले. हे स्पर्धक अनेक कार्यक्रमांमध्ये देखिल परफॉर्म करतात. या मुलांचं यश मी जवळून अनुभवत आहे. नवं पर्व कधी सुरु होणार याविषयी मला सतत विचारणा होत होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. या पर्वातही छोटे उस्ताद आपल्या सुरांनी महाराष्ट्राला थक्क करतील याची मला खात्री आहे.”

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli