Marathi

हुशार वैशाली! (Short Story: Hushar Vaishali)


मी इन्स्पेक्टर राणे. कांचननगर पोलीस चौकीत मिस्टर रत्नकांत कीर्तीकर यांना पकडलंय… म्हणजे लॉकअपमध्ये आहेत ते, म्हणून तुम्हाला फोन केला… तुम्ही काहीतरी करून शकाल…!

हॅलो, कीर्तीकर नं?”
“हो, पण आपण…”
“आपण मिसेस कीर्तीकर का?”
“होय, पण कोण पाहिजे?…
कोण बोलतंय?”
“मला तुमच्याशीच बोलायचंय…
मी इन्स्पेक्टर राणे. कांचननगर पोलीस चौकीत मिस्टर रत्नकांत कीर्तीकर यांना पकडलंय… म्हणजे लॉकअपमध्ये आहेत ते, म्हणून तुम्हाला फोन केला…
तुम्ही काहीतरी करून शकाल…!”
“अहो पण… कधी पकडलं म्हणालात तुम्ही? आणि का? काय केलंय त्यांनी?” वैशाली मजेत विचारत होती आणि समोरून तिचा नवरा, रत्नकांत तिला ‘कोणाचा फोन?’ असं खुणा करून विचारत होता. तशी ती त्याला तोंडावर बोट ठेवून गप्प राहायला खुणावत होती.
“काल रात्रीच पकडलंय. ते कांचनमृग हॉटेल आहे नं, तिथे काल रात्री धाड घातली आम्ही, त्या वेळी काही मुलींनाही पकडलं. तेव्हा तिथे एका मुलीसोबत त्यांना पकडलं. तेव्हा… अजून दोन-तीन जणांना आणि चार-पाच मुलींनाही पकडलंय!”
“अहो, म्हणजे रात्रीपासून ते तिथेच? आणि तुम्ही आता सांगताय? कालच सांगायचं ना!” वैशाली पुन्हा फिरकी घ्यायच्या मूडमध्येच! तिला मजाच वाटत होती. रत्नकांत काल संध्याकाळीच परत आला होता. आठ-दहा दिवसांचा त्याचा दौरा होता. त्याला असं बरेचदा दौर्‍यावर जावं लागे. आता दोघे एकत्र संध्याकाळच्या चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेत बसले होते. त्यांच्यात सध्या चहानंतर कुठे फिरायला जायचं की सिनेमाला, त्याबद्दल चर्चा सुरू होती.
“सॉरी मिसेस कीर्तीकर, पण तुमचा फोन नंबर मिळालाच नाही… आणि हे कीर्तीकर साहेब सांगायला तयार नव्हते. आता नंबर मिळाल्यावर लगेच फोन केला. पण तुम्ही घाबरू नका. इथे काही त्यांना आम्ही कैद्यांसारखं वागवलं नाहीये. त्यांच्या सोबतच्या एकाला, त्यांच्या मिसेस सोडवून घेऊनही गेल्या. तुम्हीही तसं करू शकता. जामिनावर सोडवता येतं, म्हणजे हे प्रायव्हेटली करायचं असेल, तर थोडे हात ओले करावे लागतील, एवढंच!” राणेनं सांगितलं.
“ठीक… पण थोडे म्हणजे किती? नेमका आकडा सांगाल का? मी हे असलं कधी केलं नाहीये नं… मला खरंच खूप भीती वाटतेय!” वैशालीने घाबरल्याचं नाटक केलं.
“तसे पाच हजारमध्ये सुटले असते… पण त्या बाईंनी दहा हजार दिले ना! त्यामुळे तुम्हीही दहा हजार दिलेत, तर नक्की सुटका होईल साहेबांची.”
“ओके. मी आणते. त्या कांचननगर चौकीतच येऊ का? कुठे आलं हे कांचननगर? आणि तुम्ही तिथेच भेटाल का मला? रिक्षावाल्याला कांचननगर सांगितलं तर तो बरोबर आणेल ना? मला काहीच माहिती नाहीये नं, म्हणून विचारतेय. तुमचा फोन नंबर देऊन ठेवा, म्हणजे जर मला पत्ता कळला नाही, तर तुम्हाला फोन करेन. इथे एक जुना मोबाइल आहे, तो घेऊन निघेन मी. तुम्ही त्या चौकीतच भेटाल की आधीच कुठे भेटाल?… पण मी तुम्हाला ओळखणार कसं? तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कोणता ड्रेस घातलाय तेही सांगा. तुम्ही तुमच्या खाकी वर्दीमध्ये असाल, तर उत्तमच. नाव आणि फोन नंबर सांगा लवकर… मला कुठे चौकीचा फोन नंबर माहीत आहे? तुम्ही सांगा, मी लिहून घेते. हं सांगा…”


वैशालीने गोड बोलून त्याच्याकडून नाव, फोन नंबर, ड्रेस अशी सर्व माहिती घेतली. नंतर मग पुन्हा विचारलं, “इन्स्पेक्टर साहेब, मी किती वाजेपर्यंत तिथे पोहोचले तर चालेल? वकील साहेबांना आणायला हवं का? …मला तर काहीच माहीत नाहीये. भीती वाटतेय हो!”
“छे, छे! अहो वकील कशाला हवेत? वकिलांकडून करायचं म्हणजे मग ते उद्या कोर्टात जामिनासाठी अर्ज करणार, त्यानंतर कोर्ट त्यावर विचार करणार. नंतर कोर्टाने संमती दिली, तर मग कोर्ट सांगेल तितकी फी भरून सुटका होईल. त्यात वेळी खूप जाईल. म्हणून म्हटलं, हे असं आपापसात बोलून सोडवून घ्या. कोर्टा-थ्रू खूप दिवसही लागू शकतात. पैसेही किती ते नक्की सांगता येणार नाही. पाहा तुम्हाला योग्य वाटेल ते करा. मी आपला सोपा उपाय सांगितला.”
“नको… नको. मी आजच संध्याकाळी येते… सात-साडेसात वाजले तर चालेल ना? तेवढा वेळ तर लागेलच! मी आता तयारी करून निघणार. त्यात आज रविवार, म्हणजे बँकही बंदच. तशी तर इतक्या उशिरा बँक बंदच असते म्हणा. पण एटीएममधून पैसे काढणार आणि रिक्षा करून तिकडे येणार, तर थोडा वेळ होईलच. तर चालेल ना साडेसात वाजले तरी?
…मी येते पैसे घेऊन. राणेसाहेब तुम्ही कुठे भेटाल ते सांगा ना!”
“मी शिवाजी चौकात थांबतो. चौकी तशी दुरून दिसणार नाही. मोठ्या रस्त्यावर नाहीये नं. तुम्ही शिवाजी
चौक सांगा रिक्षावाल्याला. कांचननगर आणि शिवाजी चौक म्हटल्यावर तो बरोबर आणेल.”
“ओके, मग मी येते. तुम्हीही नक्की या हं. भीती वाटतेय!”
वैशालीने फोन ठेवला आणि ती नि रत्नकांत एकमेकांकडे बघून हसतच राहिले. बराच वेळ हसणं झाल्यावर रत्नकांत म्हणाला, “वैशू, तू एकटी नको जाऊस, मीही येतो तुझ्यासोबत!”
“अरे, तू कसा येऊ शकशील? तुलाच तर सोडवायला जाणार नं मी? तू स्वतःच स्वतःला सोडवायला येणार आहेस? हाऊ फनी!”
“वैशू आता गंमत पुरे हं. या माणसाला पकडलंच पाहिजे. त्याला फक्त पैसे हवेत की पैसे घेऊन येणारी बाईही
हवी, तेही समजलं पाहिजे. एक मिनिट मला वाटतं आपण विनूकाकांच्या हर्षदला विचारावं. तू ओळखतेस नं त्याला? तो सीआयडीमध्ये आहे. काहीतरी योग्य मार्ग दाखवेल. तो बरेच दिवसांत भेटला नाहीये खरा; पण फोन करून बघायला काहीच हरकत नाही. तो खूप बिझी असतो; पण पाहू या. आपल्या ओळखीचं आणखी कोणी आठवत नाहीये.
मी करतो फोन त्याला…”
“हॅलो हर्षद, मी रत्नकांत… रत्नकांत कीर्तीकर. ओळखलंस नं? तुला जरा घाबरतच फोन केलाय. तू नेहमी बिझी असतोच, त्यामुळे भेटशील की नाही, अशी शंका वाटत होती. पण असो…”
“तुझं काम काय, ते सांग आधी!” हर्षदने स्पष्टच विचारलं.
“हो, सांगतो. अरे मघाशी एक फोन आला होता वैशालीला. त्याने सांगितलं की, मला अटक करून पोलीस चौकीत, लॉकअपमध्ये ठेवलंय… तर दहा हजार रुपये घेऊन या आणि नवर्‍याला सोडवून घेऊन जा, असं सांगितलंय त्याने. तर आता साडेसहाच्या सुमारास वैशाली निघणार आहे. अर्थातच पैसे नेणार नाहीये. पण त्या माणसाला पकडायला हवं, म्हणून तुला फोन केला. आता तू सांग काय करायचं ते. त्या माणसानं स्वतःचं नाव इन्स्पेक्टर दिगंबर राणे असं सांगितलं आहे… कांचननगर पोलीस चौकी.” रत्नकांतने सर्व काही सविस्तर सांगितलं.
“ठीक, मग आता मी काय सांगतोय ते नीट ऐक आणि अगदी तसंच कर…” हर्षदने रत्नकांतला व्यवस्थित प्लान समजावून सांगितला. शेवटी सांगितलं, “हे नीट लक्षात ठेव. आणि वहिनी रिक्षातून गेल्यानंतर पाच मिनिटांनी माझा माणूस तुझ्याकडे येईल. त्याला घेऊन तू शिवाजी चौकात यायचं. त्याआधी निघू नकोस. मला जमलं, तर मी स्वतः येतोच; पण जमणं कठीण आहे. चल बाय. बेस्ट लक!”


वैशाली शिवाजी चौकापर्यंत आली. तिला राणे तिथे उभा असलेला दिसला. त्याने सांगितलेला ड्रेस पाहून तिने त्याला ओळखलं. मग रिक्षा थोडी पुढे गेल्यावर तिने रिक्षावाल्याला थांबायला सांगितलं आणि ती रिक्षातून खाली उतरली. रिक्षाचं भाडं देता देता तिने त्याला कांचननगर पोलीस चौकी कुठे आहे, ते विचारलं. त्याने ती गल्ली दाखवली आणि रिक्षा तिथपर्यंत आत नेण्याची तयारीही दाखवली. वैशालीने मात्र त्याचं भाडं देऊन, त्याला जायला सांगितलं आणि ती मुद्दाम इथे तिथे पाहत वेळ काढू लागली. रत्नकांत येईपर्यंत ती राणेकडे पाहणार नव्हती. पुढच्या एका मिनिटातच रत्नकांतची स्कूटर थांबलेली त्याला दिसली. मग तिने सहज त्या बाजूला पाहिल्यासारखं केलं आणि तिला राणे दिसला. ती दोन पावलं पुढे झाली, त्यावरून राणेने तिला ओळखलं आणि तोही तिच्या दिशेने येऊ लागला.
“अं… मिसेस कीर्तीकर नं? मी इन्स्पेक्टर राणे… पैसे आणलेत?”
वैशालीने होकारार्थी मान हलवली.
“ठीक. चला माझ्याबरोबर…
मी स्कूटर आणली आहे. त्यावरून जाऊ आपण.”
“पण कुठे जायचंय? चौकीतच ठेवलंय ना त्यांना? हे पैसे कोणाला द्यायचेत?” वैशालीने अगदी भोळेपणाचा आव आणून पैशाचं पुडकं त्याला दाखवलं. नोटांच्या आकाराचे कागद त्यात भरून, तिने छान पॅकेट तयार केलं होतं. त्यावरून आणखी एक पाकीट घातलं होतं.
राणेने हात पुढे केला, “द्या ते इकडे आणि चला… ती पाहा माझी स्कूटर.
मी नेतो तुम्हाला. बसा!”
वैशालीने पैसे तर दिले नाहीतच; पण ती स्कूटरवरही बसेना. हे पाहून राणेंनी विचारलं, “काय झालं? स्कूटरवर बसायला भीती वाटते का?”
“नाही तसं नाही; पण माझा नवरा… त्याला पाहिल्याशिवाय मी पैसे नाही देणार! कुठे आहे ती चौकी?” वैशाली घाबरल्याचं नाटक करत बडबडत होती.
राणेने शेवटी रागावून म्हटलं, “आता इथे रस्त्यात कसं आणणार कीर्तीकर साहेबांना? मी स्कूटरवर बसतो, तुम्ही माझ्यासोबत… माझ्यामागे बसा आणि ते पैसे असे नुसते हातात घेऊ नका. कोणीतरी मारले म्हणजे? द्या ते इकडे मी व्यवस्थित ठेवतो.” बोलता बोलता त्याने वैशालीच्या हातातून ते पुडकं घेतलं आणि तिचा हात धरून तिला ओढत नेऊ लागला. त्याबरोबर हर्षदच्या चार माणसांनी त्याला झडप घालून पकडलं. त्याने घाबरून वैशालीचा हात सोडला आणि तिनेही चटकन तिथून काढता पाय घेतला. हर्षदने सांगितल्याप्रमाणे रत्नकांत तिला घेऊन घरी निघून गेला.


“हॅलो, रत्नकांत! मी हर्षद. आपला प्लान एकदम सक्सेसफुल झालाय बरं का. राणे आता लॉकअपमध्ये आहे. त्याची टोळी वगैरे काही नाहीये. तो त्याच चौकीत हवालदार म्हणून नोकरीत होता. त्याला मुलींची छेड काढल्याबद्दल एकदा शिक्षा झाली होती आणि सस्पेंड करण्यात आलं होतं. दुसरी नोकरी मिळत नव्हती, म्हणून त्याने हा फसवाफसवीचा मार्ग शोधला. अशाच प्रकारे त्याने यापूर्वी दोघी-तिघींना फसवून पैसे कमावले होते. वहिनींनी हुशारी दाखवली म्हणून तो पकडला गेला. त्याचा फोन आला होता तेव्हा वहिनींनी जर तू घरीच आहेस, असं सांगितलं असतं, तर काहीच उपयोग झाला नसता. त्याने दुसरं सावज गाठलं असतं. म्हणून तुम्हा दोघांना मनापासून थँक्स! नंतर काय बक्षीस वगैरे द्यायचं ते आमचं डिपार्टमेंट पाहील; पण मी उद्या तुझ्याकडे जेवायला येतो आहे. तू घरी असशील अशी अपेक्षा करतो. मी माझ्याकडून खास बक्षीस घेऊनच येईन. चल बाय! सी यू!”
“चल वैशू, हर्षद उद्या आपल्याकडे जेवायला येतोय. तुझ्यासाठी काहीतरी बक्षीसही आणतोय म्हणालाय. तर
आता उद्याची तयारी करायला लाग. मस्त जेवण बनव! खूप दिवसांनी येतोय तो आपल्याकडे!”
“हो, बनवते मी, मेन्यू तूच सांग!”

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli