Marathi

ती माझी हॉबी (Short Story: It’s My Hobby)


टी.व्ही.वरच्या ज्या ज्या चॅनेलवर पाककृती दाखवितात, त्या त्या सर्व चॅनेलवरून सुमी पाककृती लिहून घेत होती. त्यामुळे तिच्याकडे बंगाली, मद्रासी, सिंधी, पंजाबी, चायनीज वगैरे सर्व प्रांतीय, देशीय पाककृतींचा साठा जमला होता. आपल्या आईचा हा स्वभाव राहुलला खूप आवडायचा. आपल्या आईचा इंटरेस्ट स्वयंपाकघराशी निगडीत आहे, हे पाहून तर राहुलचा आपल्या आईबद्दलचा आदर द्विगुणित व्हायचा.
सुमी धावतपळत, पेन-वही घेऊन धापा टाकत टी.व्ही. समोर येऊन
बसली. तिच्या आवडत्या ‘चला बाई खाऊ या’ या कार्यक्रमात आज एक सुगरण बाई पोह्याचे अगणित प्रकार दाखवणार होती. चॅनलचीही त्यामुळे चार वर्षांची सोय झाली होती. आठवड्याचे पाच दिवस म्हणजे महिन्याला वीस पदार्थ शिकायला मिळणार होते, त्यामुळे प्रेक्षकांचा वेळ घालवण्याचा किंवा सार्थकी लावण्याचा प्रश्‍न चॅनलने सोडवला होता आणि त्या सुगरणीचीही चार वर्षांची मानधनाची सोय झाली होती. असा सर्वांनाच हितकारक कार्यक्रम ‘आम्ही लोकांसाठी’ या चॅनलने सुरू केल्यामुळे सगळ्यांनाच छान जीवन जगावं असे वाटत होते. खावं, प्यावं, गावं, नाचावं असं होऊन गेलं होतं. “तर मग कोमलाताई, तुम्ही पहिला पदार्थ कोणता दाखवणार बरं?” संचालिकेने-सियाने विचारलं.
“अं, मी पहिला पदार्थ दाखवणार आहे, पोहे नसलेले पोहे.”
“अगबाई गंमतच आहे, तर मैत्रिणींनो, आज आपण एकदम अनोखा पदार्थ शिकणार बरं का. हं कोमलाताई,याचं साहित्य काय काय आहे?” सियाने मान वेळावत विचारलं.
“सांगते. अग सिया, मला किनई
हे पाहायला आले होते ना, ती गंमत आठवतेय.” कोमलाताई अगदी लाजून चूर झाल्या.
“सांगा ना, ती गंमत आम्हालाही.” सियाने लाडेलाडे म्हटलं.
“सांगते ना! अग, त्या वेळी
किनई मुलगी पाहण्याचा मोठ्ठाच कार्यक्रम असायचा आणि त्या प्रसंगी कांदेपोहेच बनवायचे असा नियम होता.” कोमलाताई आपली निळी चुनरी सावरीत, हाताने कांदा कापत उत्तरल्या.
“म्हणजे? एखाद्या मुलाने पंचवीस मुली बघितल्या तर प्रत्येक ठिकाणी त्याला कांदेपोहेच खावे लागले असणार. ओऽऽ सो सॅड ना?”
सिया उदासपणे म्हणाली. पण कोमलाताई चाळीस वर्षापूर्वीच्या त्यांच्या तारुण्याच्या शिखरावरच्या काळात गेल्या होत्या. तेव्हा त्या वीस वर्षाच्या होत्या.
आपल्याच नादात त्या म्हणाल्या, “तर बरं का सिया, मी किनई पोहे करायला घेतले वधू परीक्षेसाठी. माझी आई म्हणाली, तूच बनव बाई पोहे. मी बनवायचे आणि प्लेट देताना खोटं सांगायचं, आमच्या कोमलानं बनवलेत हो हे पोहे. असं नको. त्यामुळे मी फोडणीत हिंग, मोहरी, मिरच्या, कांदा वगैरे घालून तेलावर चांगलं परतलं. मग त्यात मीठ, थोडी साखर घातली. झाकणी ठेवली आणि भिजवलेले पोहे त्यात घालणार एवढ्यात बेल वाजली. मी गॅस बंद केला आणि आईच्या मागून दिवाणखान्यापर्यंत गेले. आईबाबांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. मी दाराआडून नवर्‍या मुलाला पाहिलं आणि पाहतच राहिले. खरंच हे फार देखणे होते. त्यांना पाहून माझं भानच हरपलं. मी माझी राहिलेच नाही.
पाहुणे घाईत होते म्हणून आई म्हणाली. कोमला, आण बाई कांदेपोहे नि चहा. तशी मी माझ्या त्या धुंदीत प्लेटमध्ये तो फोडणीचा कांदा, मिरची भरलं आणि ट्रेमधून प्लेटस् घेऊन बाहेर गेले. पाहुण्यांना प्लेटस् दिल्या. तशी तो पदार्थ खाऊन हे म्हणाले, वा मस्त ‘वा मस्त, खमंग कांदा फारच चविष्ट आहे. मला मुलगी पसंत आहे.’ आणि काय सांगू आई तो पोहे नसलेला कांदेपोह्यांचा पदार्थ पाहून जी घाबरली होती, ती एकदम अत्यानंदाने ओरडली, ‘अग कोमला, अजून वाढ ना त्यांना खमंग कांदा…’ अशी मजा.” बोलता बोलता कोमलाताईंनी कढई तापत ठेवून तेल टाकले होते. “अय्या! खरंच किती गमतीची गोष्ट आहे तुमच्या लग्नाची.” सिया चिवचिवली. “म्हणूनच तो पदार्थ दाखवतेय.” म्हणत कोमलाताईंनी ‘खमंग कांदा’ कसा बनवायचा त्याचं सगळं प्रात्यक्षिक दाखवलं. सुमीने भराभरा सगळी कृती लिहून घेतली. तिच्या पाककलेच्या डायरीत आता 1011 वी पाककृतीची भर पडली होती. या पदार्थाला कोमलाताईंनी ‘पोहे नसलेले पोहे’ हे नाव दिलं होतं, तेही
सुमीला आवडलं. टी.व्ही.वरच्या ज्या ज्या चॅनलवर पाककृती दाखवितात, त्या त्या सर्व चॅनलवरून सुमी पाककृती लिहून घेत होती. त्यामुळे तिच्याकडे बंगाली, मद्रासी, सिंधी, पंजाबी, चायनीज वगैरे सर्व प्रांतीय, देशीय पाककृतींचा साठा जमला होता. आपल्या आईचा हा स्वभाव तिच्या मुलाला- राहुलला खूप आवडायचा. घरात स्वयंपाकासाठी कुक होती, वरकामासाठी मुलगी होती. परंतु आपल्या आईचा किचनमधला इंटरेस्ट टी.व्ही.वरच्या इतर सासू-सुनेच्या सिरीअल्स न बघता केवळ स्वयंपाकघराशी निगडीत आहे हे पाहून तर राहुलचा आपल्या आईबद्दलचा आदर द्विगुणित व्हायचा.
राहुलने कॉलेजमध्ये गेल्यागेल्याच जाहीर करून टाकलं. “मित्रांनो
आणि मैत्रिणींनो, उद्या माझा बर्थडे आहे ना, तर या वर्षी मी तुम्हाला माझ्या घरी ट्रीट देणार आहे. कारण माझी आई सुगरण आहे. तिला किचनमध्ये जाम इंटरेस्ट आहे.
उद्या तुम्ही संध्याकाळी माझ्या घरी
या आणि डिनर एन्जॉय करा.”
राहुल दुपारीच कॉलेजमधून घरी आला तो अगदी शीळ घालतच! “अगबाई आज स्वारी खुषीत दिसतेय.” सुमी त्याला पाण्याचा ग्लास देत म्हटली. “आहेच मी खुषीत! ओळख उद्या काय आहे?” हातातली हॅवरसॅक सोफ्यावर फेकत राहुलने विचारले. “उद्या? अं… काय आहे… अगबाई? उद्या तर तुझा वाढदिवस आहे.” सुमीने त्याच्या पाठीवर प्रेमभराने थोपटत म्हटलं.
“बरोबर ओळखलंस डिअर आई. तेव्हा उद्या रात्री माझ्या मित्रांना मी घरी जेवायला बोलावलंय.” राहुल सुमीचे दोन्ही हात धरत प्रेमभराने म्हणाला.
“अरे बरं केलंस. नो प्रॉब्लेम.
मग काय काय करू जेवायला ते
तरी संाग!”
“सांगतो ना. अगं माझ्या मित्रमैत्रिणींना घरगुती पदार्थ हवेत. तेव्हा तू उकडीचे मोदक, अळू वड्या, पंचामृत, पुरणपोळ्या, वाटली डाळ, कच्च्या टोमॅटोची कोशिंबीर, भरली वांगी, ज्वारीच्या भाकर्‍या आणि आमसुलाची कढी आणि सोबत जिरा राइस एवढंच बनव. त्यांना बाहेरचं खाऊन कंटाळा आलाय आणि हो, त्यांच्यापैकी कुणाच्याच आईला असे घरगुती पदार्थ बनवता येत नाहीत. तेव्हा मी म्हटलं. माझी आई सुगरण आहे. ती बनवील सर्व. कारण बघावं तेव्हा ती रेसिपीज्चे कार्यक्रम बघत असते. आई तू ग्रेट आहेस ग!” असं म्हणत राहुलने आईला उचलून गोल गोल फिरवलं. तशी सुमी ओरडली, “अरे अरे पुरे! चक्कर येईल ना. चल, चल उद्याच्या तयारीला लागू दे मला.”
“हो हो. मस्त जेवण बनव ग आई उद्या. माझा रुबाब वाढणार आहे बरं का तुझ्या घरगुती जेवणामुळे.” राहुलने आईला बजावून सांगितलं.
“अरे काळजीच करू नकोस. आत्ता मार्केटमध्ये जाऊन सगळं साहित्य, भाज्याबिज्या घेऊन येते. बरं किती जण आहेत उद्या.”
“अगं नेहमीचेच. मी धरून आठ.”
“ठीक आहे. बघच तू उद्या. अस्सा स्वयंपाक करते की, तुझी वट वाढेल तुझ्या मित्रांमध्ये.” सुमी म्हणाली.
राहुलही जाम खूश झाला. त्याने ताबडतोब मित्रांना मेनूही कळवला. नंतर त्याने अनन्याला त्याच्या खास खास मैत्रिणीला फोन केला. “हाय राहुल.” अनन्या चिवचिवली. ती खाण्यातली दर्दी होती. “हाय अनु,
मेनू सांगू का?” राहुलने विचारलं.
“अरे शुअर, सांग ना.”
“सांगतो… सांगतो.” म्हणत राहुलने तिला सर्व मेनू ऐकवला.
“व्वाव! पंचामृत, भाकर्‍या, सोलकढी! अमेझिंग राहुल. आणि हे सगळं घरी बनवलेलं. फॅण्टास्टिक.” अनन्या आनंदाने किंचाळली. मेनू आवडीचा-त्यात घरचा. म्हणून ती जरा जास्तच लाडालाडात त्याच्याशी बोलत राहिली. राहुल तर हवेतच होता.
दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सुमीचं घर तरुणाईच्या जल्लोषात उजळून निघालं. केक कापून झाल्यावर सगळ्यांनी “हॅप्पी बर्थ डे टू यू डियर, राहुल…” असं अगदी बेंबीच्या देठापासून ओरडून त्याला कानठळ्या बसेपर्यंत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी सुमीने त्यांना जेवायला बोलावलं. तेव्हा राहुल आणि त्याची मित्रमंडळी डायनिंग टेबलाकडे आली. पानावर बसली. घमघमीत सुवासाचं, खमंग साग्रसंगीत जेवणावर त्यांनी ताव मारायला सुरुवात केली. पाच मिनिट झाली न झाली तोच अनन्या एकदम म्हणाली, “राहुल, ह्या अळू वड्या, पंचामृत, भाकर्‍या, सोलकढी, पुरणपोळ्या, मोदक हे सगळं खूप मस्त आहे. पण हे तर गृहिणी मैत्रीण या महिला मंडळातल्या जेवणासारखं आहे, म्हणून विचारलं.”
“अगं नाही ग अनु, माझ्या आईने हे सर्व घरी स्वतःच्या हाताने बनवलंय. ती सुगरण आहे, खरंच सांगतोय.”
“अरे पण राहुल, मला तर आता खात्रीच झालीय. कारण माझी आई त्या महिला मंडळातल्या अन्नपूर्णा विभागाची प्रमुख आहे. आज हेच जेवण, जे उरलेलं विकायला ठेवतात ना ते, आई बाबांसाठी घेऊन आली.”
“अरे देवा, आता मला घरी जेवण बनवणारी सासू शोधावी लागणार… तुझ्याकडेही निराशाच पडली पदरात!” अनन्या अगदी वैफल्याने उद्गारली.
रात्री सगळं जेवण आटोपल्यावर राहुलने आईला विचारलं, “आई, अगदी खरं सांग. हा सगळा स्वयंपाक नक्की तूच केला होतास ना?”
सुमी जरा बावरली. मग चाचरत म्हणाली. “अं… अं… म्हणजे…”
“गृहिणी मैत्रीणमधून मागवलंस
ना… ऑर्डर देऊन?” राहुलने कडकपणे विचारलं.
“अं… हो.. हो..” सुमी उत्तरली.
“अग, पण एवढ्या रेसिपीज बघतेस, लिहितेस, ते का?”
“अरे, ती माझी हॉबी आहे राहुल! म्हणून!” सुमी म्हणाली. राहुलने
स्वतःच्याच कपाळावर हात मारला.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

रवीना टंडनने इतरांप्रमाणे राजकारणाची वाट का धरली नाही? अभिनेत्रीने सांगितले खरे कारण (‘Someone Would Have Shot Me…’ Raveena Tandon Gave Reason for Not Entering Politics)

गोर्जियस गर्ल रवीना टंडन ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या फिल्मी…

November 21, 2024

जेव्हा सुष्मिता सेनने दिलेली विक्रम भट्ट यांच्यासोबतच्या नात्याची कबुली (When Sushmita Sen Said About Her Relationship With Married Vikram Bhatt)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन जवळपास 10 वेळा प्रेमात पडली होती,…

November 21, 2024

दिवंगत आई्च्या स्मर्णार्थ अर्जुन कपूरने पाठीवर कोरला टॅटू, त्यावर लिहिले रब रखा…. (Rab Rakha… Arjun Kapoor pays tribute to late mother with new tattoo, Writes emotional post)

अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही काळापासून मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. याशिवाय, सध्या तो रोहित…

November 21, 2024
© Merisaheli