Marathi

जलते हैं जिसके लिए (Short Story: Jalate Hai Jisake Liye)


राजश्री नितीन बर्वे

जलते हैं जिसके लिए, तेरी आँखों के दिये,
ढूँढ लाया हॅूं वही, गीत मैं तेरे लिए…
नेहमीसारखंच श्रीच्या आयपॉडवर गाणं लागलं होतं. बेडरूममधल्या सोफ्यावर बसून तो ते ऐकत होता. तनूही सगळं आवरून बेडरूमलगतच्या गॅलरीत बसली होती नेहमीप्रमाणेच. तार्‍यांकडे नजर होती तिची, पण ती नजर कुठेतरी हरवली होती. यात नवीन असं काहीच नव्हतं. हे गाणं लागलं की दोघंही कुठल्यातरी वेगळ्याच विश्‍वात असत.
“बाबा, प्लीज. रीपीट लावू नका हं. इरीटेट होतं.” प्रणु म्हणाली.
“सॉरी हं प्रणु, तेवढं सोडून बोल. तुलाही माहीत आहे, माझं एकदम फेव्हरेट गाणं आहे ते.”
“हो, मला समजतंय. पण म्हणून रोज चारचार वेळा?” प्रणुच्या कपाळावर सूक्ष्मशी आठी आणि डोळ्यांत प्रचंड आश्‍चर्य होतं. बाबा ऐकणार नाहीत, हेही तिला माहीत होतं. म्हणून मग कंटाळून ती तिथून निघून गेली.
तनू मात्र मनोमन आनंदली. तिनं मोठ्या अभिमानाने आणि प्रेमाने पाठमोर्‍या श्रीकडे पाहिलं. डोळे क्षणभर मिटून श्‍वास घेऊन आनंदाचा तो क्षण तिने मनात शोषून घोतला. तिच्या डोळ्यांची कड किंचित ओलावली. अश्रू काय फक्त दु:खाचे किंवा सुखाचेच असतात?…
कधी कधी हृदयातील एखादी जाणिवेची लाट मर्यादा ओलांडून पुढे आल्यानेही ते येतातच की!
हे गाणं ऐकलं की तो दिवस जसाच्या तसा आठवतोच. लग्न ठरल्यानंतर श्रीला भेटल्याचा. तसे अनेक दिवस… पण ठळकपणे स्मरतो तो तोच दिवस… संधिप्रकाशातला… समुद्रकाठचा… दिवसभर त्याच्या भेटीची हुरहुर… आणि नंतर… मैत्रिणींना सांगितलं तेव्हा त्यांना आश्‍चर्यच वाटलं होतं.
“दोन तास एकत्र होतात आणि एकही शब्द बोलला नाहीत?
नक्की काय केलंत गं मग?” प्रीतमने डोळा मारून खांद्याने तिच्या खांद्यावर हलकासा धक्का दिला होता.
“अगं, काय म्हणून काय विचारतेस? त्याने गाणं नाही का म्हटलं? जलते हैं जिसके लिए…” नेहा म्हणाली होती.
“माझा मुळी विश्‍वासच नाही हं. दोन तासांत फक्त एक गाणं? शक्यच नाही. आता तुला सांगायचं नसेल तर…” अजून
कोणीतरी म्हटलं.
मग त्यांना पटवण्याचा किती प्रयत्न केला होता आपण. तरी नाहीच पटलं त्यांना. नाहीच पटणार कुणाला. आणि पटवण्याची गरजही नाही. आपल्या दोघांचं हे प्रेम…. अबोल… अव्यक्त… पण तितकंच खोल… गहिरं…. फक्त आपल्यालाच कळतं ते. आपल्याला आणि श्रीला. बास आहे तेवढं. तनू परत तो दिवस आठवू लागली.
किती वेळ बसलो होतो श्रीच्या हातात हात घालून… त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून… समुद्रात मावळणार्‍या सूर्याकडे पाहत… श्रीही तसाच शांत नजरेने त्या अथांग समुद्राकडे पाहत होता. वरून दोघंही शांत होतो, पण आत… हृदयात मात्र प्रचंड उलथापालथ चालू होती. प्रेमाचा खरा अर्थ त्याच दिवशी समजला. बराच वेळ नुसतं बसून झाल्यावर श्रीने गाणं म्हणायला सुरुवात केली होती. ‘जलते हैं जिसके लिए, तेरी आँखों के दिये…’ त्याच्या गोड गळ्यातील त्या गाण्याने जादूच केली आपल्यावर. डोळ्यांना अश्रूंची धार लागली होती. हृदयातील प्रेम अश्रूच्या रूपात व्यक्त झालं होतं. श्रीकडे लक्ष गेलं तर त्याच्याही डोळ्यांतून पाणी दिसलं आपल्याला. तो क्षणच दिव्य होता. प्रेमाची अनुभूती देणारा. त्या क्षणीच पटलं. हाच तो… आपला जन्मोजन्मीचा सखा… आपल्यावर अबोल प्रेम करणारा… असं प्रेम असताना ‘आय लव्ह यू’ असं म्हणायची गरज तरी कुठे असते मग? नजरेतूनही प्रेम बरसतं म्हणतात. पण आम्हाला तर नजरेचीही गरज नव्हती. हृदयच हृदयाशी थेट संवाद साधत असेल, तर गरजच काय प्रेम व्यक्त करण्याची? त्या क्षणीही मग असेच डोळे मिटून घोतले होते आणि दीर्घ श्‍वास घेऊन तो क्षण हृदयात साठवून ठेवला होता.
आज लग्नाला इतकी वर्षं झाली तरीही ही अनुभूती येते कितीतरी वेळा… आजही आली. म्हणूनच तर हे गाणं विशेष जवळचं वाटतं आपल्याला आणि श्रीलाही. त्यालाही त्या दिवशीसारखाच अनुभव येत असेल हे गाणं ऐकताना? अजूनही? अर्थातच येत असेल. पण बोलून दाखवणार नाही तो. तोही आपल्यासारखाच… अबोल प्रेमाचा चाहता.
अर्थात कधीतरी खटकायचं म्हणा, त्याचं हे असं वागणं. स्पेसिफिकली तरुण असताना. तेव्हा वाटायचं की, याने कधीतरी बोलून दाखवाव्यात आपल्या भावना. म्हणजे अगदी सारखं नाही… कृत्रिम वाटेल असं. पण कधीतरी म्हणावं,
‘तू मला खूप आवडतेस’ किंवा ‘तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही’… वगैरे वगैरे. आजही इतकी वर्षं झाल्यानंतर कधीतरी वाटतंच की, त्याने एकदा तरी बोलून दाखवलं पाहिजे… त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे ते. आपल्याशिवाय त्याचं जीवन कसं व्यर्थ आहे ते. अगदी मोठे मोठे डायलॉग्ज् नकोत, पण निदान साधं ‘आय लव्ह यू’ तरी. निदान तशा अर्थाचा एखादा एसएमएस! किंवा मग पूर्वीचे नायक नायिकांना द्यायचे तसा एखादा गजरा, मोगर्‍याचा. काहीही न बोलणारा, पण
न बोलताच सारं काही सांगून जाणारा.
कसं वाटेल आपल्याला तो जर असं रोमँटिक वागायला लागला तर? पण मग लगेच वाटतं नकोच. जे त्याच्या स्वभावात नाही, ते त्याने का करावं? उगाच खोटं वाटेल ते. वरवरचं वाटेल. नाटकी वाटेल. सिरीअलमधून, सिनेमातून दाखवतात तसं. खरंच… असा सारखा प्रेमाचा इकरार करत असतात का प्रेम करणारी माणसं? गरज असते त्याची? त्याला तिचं आणि तिला त्याचं प्रेम कळू शकत नाही शब्दांशिवाय? नजरेशिवाय? अगदी स्पर्शाशिवायही… कुणास ठाऊक?
इतरांचं काही का असेना? आपलं तरी असंच आहे. कदाचित वेगळं असेल जगाच्या. पण असेना का! जे आहे ते आम्हा दोघांना प्रिय आहे! आणि दोघांचं सारखंही आहे! आपण खरंच भाग्यवान आहोत. श्रीसारखा नवरा मिळाला आपल्याला. ऑफिसमध्ये पाहतो ना आपण. तो मनोज… दिवसभरात दोन-तीन वेळा तरी फोन करतो बायकोला. डबा खाल्लास का? निघालीस का? येताना भाजी काय आणू? फोन नाही आला तर चिडते ती. खरंच मनापासून करत असेल तो फोन? की तिचा हट्ट म्हणून? आणि त्या शर्वरीचा नवरा किती गिफ्ट्स देत असतो तिला. तिचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, साखरपुड्याचा दिवस, लग्नाचा वाढदिवस, ती दोघं पहिल्यांदा भेटली तो दिवस, व्हॅलेन्टाईन्स डे… हा दिवस नि तो दिवस… एवढं लक्षात राहतं त्याच्या? की रिमाइण्डर लावतो मोबाईलवर? इतरांचंही थोड्या फार फरकाने असंच! काही अति प्रेमात तरी असतात, नाही तर काही जण सतत भांडत तरी असतात. आणि हल्लीच्या पिढीचं तर काय विचारायलाच नको! सतत प्रेमाचे धुमारे फुटत असतात सर्वांना. प्रणु सांगत होती ना त्या दिवशी, ती समोरची अमृता म्हणे नवर्‍याला बेबी म्हणते. आणि तो जाता-येता तिला फ्लाइंग किस देत असतो. आणि ही सर्व नाटकं आईवडिलांसमोर. आपला श्री किती डिसेंट आहे. आपलं आणि त्याचं नातं या सर्वांपेक्षा खूपच वेगळं आहे. खूप वेगळं. त्या नात्यातला अर्थ अगदी खोल आहे. तो शब्दात मांडणं कठीण आहे. मग तिला आठवत राहिलं…
श्रीचं वागणं. खूप काही सांगून जाणारं. तिच्या आवडीच्या वस्तू आठवणीने आणणं… प्रणुच्या वेळेस तिची काळजी घेणं…
तिच्या आईवडिलांचीही स्वत:च्या आईवडिलांसारखीच काळजी घेणं… असा सर्व विचार करताना मग कधीतरी असंही वाटून जातं की, आपण उगाच आपल्या मनाचं समाधान तर नाही ना करत आहोत? मागे एकदा आईशी बोललो होतो आपण यावर. तिला चक्क विचारलं होतं की, तुला बाबा कधी ‘आय लव्ह यू’ म्हणाले होते का गं? त्यावर चक्क लाजली होती ती. आणि मग म्हणाली होती, “आमच्या वेळेस नव्हती हं असली काही थेरं? नवरा-बायको एकत्र यायचे तेच किती दिवसांनी. असं तुमच्यासारखं फिरायला जाणं, ट्रिपला जाणं व्हायचंच नाही. एकदा तुझ्या बाबांनी मला पावडरचा डबा आणला होता साधा, तर तुझ्या आजीने इतकं अकांडतांडव केलं होतं की काही विचारू नकोस. घर फोडायला निघालीस म्हणून मला सर्वांची माफी मागायला लावली होती त्यांनी. त्यामुळे आम्ही कसल्या अपेक्षाच ठेवल्या नाहीत नवर्‍याकडून.” आईच्या या बोलण्याने आपल्याला खरं काय ते उत्तर मिळालंच नाही.
पण मग कळलं की, ही तर आईची पिढी. आजीच्या पिढीत तर नवरा वाटेलाच येत नसे बाईच्या. घरातही बोलायला, एकत्र हसायला बंदी होती. याचा अर्थ काय त्या नवरा-बायकोमध्ये प्रेमच नव्हतं, असं नव्हे ना? आणि वागण्यातून प्रेम कळत नाही का?
तिला आठवलं… गेल्याच महिन्यात तिचं प्रमोशन झालं तेव्हा, तिनं लगेच फोन लावला होता त्याला. त्याच दिवशी त्याने ब्रिजवासीकडून रसगुल्ले आणले होते. बोलून नाही दाखवलं त्याने अभिनंदनाशिवाय काही, पण कळलंच ते सारं तिला. त्याच्या त्या एकाच कृतीतून. भले तिला रसगुल्ले फारसे आवडत नाहीत. म्हणून काय झालं? काय आणलं ते थोडंच महत्त्वाचं होतं! त्या मागची त्याची भावना जास्त महत्त्वाची, नव्हती का?
शिवाय तिच्या त्या अपघातानंतर त्याने सुरू केलेले ते सोमवारचे उपवास. विचारलं तरी बोलला नाही त्यावर तो काही. तसा देवभोळा नाही तो. देव-देव करण्यापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व देतो. असं असतानाही अचानक सुरू केले उपवास. तेही आपल्यासाठीच केले असणार!… अशा एक ना दोन अनेक गोष्टी तिला आठवल्या. कधीही काहीही बोलून दाखवत नव्हता तो. पण तिला कळत होतं… सारं काही… शब्दांशिवाय….
या सर्वांतून त्याचं प्रेमच बरसत नव्हतं का?
प्रेम बोलून दाखवण्यापेक्षा ते मेहसूस करणं जास्त आनंद देऊन जातं, असं श्रीप्रमाणे तिलाही वाटू लागलं मग. तनूचं लक्ष परत श्रीकडे गेलं. पाठमोर्‍या श्रीकडे. आताही त्याच्या मिटल्या डोळ्यांसमोर आपलीच छबी असेल! तिला अभिमान वाटला. स्वत:चाच. ती पटकन उठली आणि श्रीजवळ गेली. प्रणु घरात असताना, बेडरूमचा दरवाजा उघडा असताना ती कधीच त्याच्या अगदी जवळ जात नसे. पण आज मात्र तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. सोफ्यावर बसलेल्या त्याच्या मागे जाऊन ती उभी राहिली. त्याच्या गळ्याभोवती हात गुंफावा, असं तिच्या मनात आलं. पण तिने स्वत:ला रोखलं. प्रणु घरात असताना असं काही केलेलं त्यालाही आवडलं नसतं. म्हणून मग ती तशीच उभी राहिली. त्याच्या मागे.
तिथे गेल्यावर तिला कळलं, तो डोळे मिटून बसला नव्हता, तर तो लॅपटॉपवर मग्न होता. मागे ती उभी असल्याचा मागमूसही नव्हता त्याला. ती आपल्या कुठल्याच गोष्टीत कधीच इंटरफीअर करत नाही, माहीत होतं त्याला. म्हणूनच तो असा निर्धास्त… बिनधास्त…
ती खोलीत असतानाही. आणि ती मात्र वेगळ्याच विश्‍वात! अबोल प्रेमात चिंब… अनामिक हुरहुरीने बेधुंद… त्या अवस्थेतही तिच्या नजरेस पडला त्याने लिहिलेला तो मेल. जनरली त्याचे मेल बिझनेस मेलच असत. आणि म्हणूनच इंग्लिशमध्ये. समोरचा मेल मात्र मराठीत होता. साहजिकच तिची नजर त्या मेलवर स्थिर झाली.

प्रिय तेजा,
कुठे होतीस तू? किती शोधलं तुला? रोजच फेसबुकवर तुझं नाव टाकून पाहतो. रोजचा नियमच झाला आहे तो आता. आपल्या शाळेत हल्ली रियुनियन, गेट टुगेदर होतात तीही अटेण्ड करतो. कुठून तरी, कोणाकडून तरी तुझ्याबद्दल माहिती मिळेल, तुझा पत्ता मिळेल या आशेने. आज फेसबुकवर नेहमीप्रमाणे तुझं नाव टाकलं आणि या वेळेस चक्क तू मिळालीस. तुझा ई-मेल आयडीही त्यावरूनच मिळाला.
तेजा, आठवतं तुला? तुझे आईबाबा तुला
तेजु म्हणायचे आणि मित्र-मैत्रिणी तेज म्हणायचे. तेजा अशा नावाने फक्त मीच हाक मारायचो. दुसर्‍या कुणीही तुला तेजा म्हटलेलं मला आवडायचंही नाही. तू फेसबुकवर तेच नाव टाकलं आहेस… माझ्या आवडीचं. म्हणूनच टाकलंस, होय ना? आणि तुझ्या प्रोफाईल पिक्चरमध्ये जी साडी नेसलीयस, ती मी दिलेली साडीच आहे. होय ना? अजून जपून ठेवली आहेस तू ती? तुझ्या फेव्हरेटमध्येही आपलं फेव्हरेट गाणं मला दिसलं. ‘जलते हैं जिसके लिए…’ याचा अर्थ मी तर असाच काढलाय की, तू अजूनही मला विसरली नाहीस. तुझ्या हृदयात अजूनही मीच आहे… आणि माझ्या हृदयात तू.
विश्‍वास नाही बसणार तुझा… पण तेजा, अजूनही तुझ्या वाढदिवसाला रसगुल्ले आणतो मी. तुझ्या आवडीचे. आपण भेटायचो ना, त्या जागेवर मोगर्‍याचा गजराही नेऊन ठेवतो मी कधीतरी अजूनही. आठवतं ना तुला… मला उशीर झाला की, कसली रागवायचीस तू माझ्यावर आणि मग गजरेवाल्याकडून गजरा घेऊन तो तुझ्या केसात माळला की मगच शांत व्हायचीस तू. विसरली नाहीस ना गं काही? नाहीच विसरणार तू. माहीत आहे मला. तुझ्या आईवडिलांनी विरोध केला, तेव्हा कसले कडक सोमवार सुरू केले होतेस माझ्यासाठी. तसेच मीही हल्ली सोमवार सुरू केले आहेत. केवळ तू भेटावीस म्हणून. तुला नाही विसरू शकलो आजतागायत. आपण वचनच दिलं होतं एकमेकांना तसं… एकमेकांना कधीही न विसरण्याचं. होय ना?
तेजा, प्लीज लवकरात लवकर रिप्लाय कर.
वाट पाहतोय. तोपर्यंत तू भेटशीलच मला. आपल्या दोघांच्या त्या गाण्यातून… नेहमीप्रमाणे. होय ना?
तुझा आणि फक्त तुझाच,
श्रीराज

श्रीचा हात परत आयपॅडच्या त्या गाण्यावर गेला. त्याच्या मागे उभी असलेली तनू त्याच्या नकळतच तिथून हलली होती. तिच्या डोळ्यांतील अबोल प्रेमाच्या त्या तेज:पुंज ज्योती, आता त्यातून ओघळणार्‍या अश्रूंनी मालवून टाकल्या होत्या… विझवून टाकल्या होत्या… आणि आताही ते तलतच्या आर्त स्वरातील मघाचंच गाणं लागलं होतं…
दिल में रख लेना इसे, हाथों से ये छूटे ना कहीं,
गीत नाजुक हैं मेरा, शीशे से भी टूटे ना कहीं,
गुनगुनाऊँगा यही, गीत मैं तेरे लिए,
जलते हैं जिसके लिए…

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

कविता- रसिक प्रेम (Poetry- Rasik Prem)

रसिक श्यामलेकर अधरों पर मुस्कानछेड़ वंशिका की तानपुकार रहे राधा नाम राधामन ही मन रिझायेरसिक…

May 20, 2024

कहानी- आख़री ख़त (Short Story- Aakhri Khat)

औरत को ये क़ैद क्यों मिलती है? शायद तुम्हारे मौन का कारण तुम्हारी अपनी क़ैद…

May 20, 2024

Turn Down The Heat

Parenting is hard work. Sometimes, our kids make us feel angry. We will come home…

May 20, 2024

यामी गौतम झाली आई! अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन (Yami Gautam And Director Aditya Dhar Blessed With Baby Boy)

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या…

May 20, 2024
© Merisaheli