Marathi

खंत (Short Story: Khant)


त्यांनी दचकून आजूबाजूला पाहिलं! कुणीच नव्हतं! मग आत्ता कण्हलं ते कोण? काहीतरी भास झाला असावा. पुन्हा तोच आवाज आला! सुमी बसली होती त्याच बाजूनं! पण तिथं तर कुणीच नाही!
मालतीबाई घराचा दरवाजा उघडून आत आल्या. चपला शू रॅकमध्ये नीट ठेवल्या. हॉलमधल्या कोपर्‍यातल्या डायनिंग टेबलवर हातातली पर्स ठेवली आणि पंखा लावून त्या सोफ्यावर हुश्श करून टेकल्या!
मालतीबाई प्राथामिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. दिवसभर मुलांचा कलकलाट, शिक्षकांच्या, मुलांच्या, पालकांच्या तक्रारी, एक ना दोन कटकटी अगदी मेटाकुटीला यायचा त्यांचा जीव. कधी एकदा घरी जाते आणि पंख्याखाली निवांत बसते असे त्यांना होऊन जाई. थोडासाही आवाज नकोसा वाटे त्यांना.
डोळे मिटून त्या शांतपणे बसल्या. कसं शांत शांत वाटत होतं! एवढ्यात बेल वाजली! टर्र! टर्र!! टर्र!! टर्र!!! एकदा नाही चांगली चारदा! त्यांनी ओळखलं हा त्यांचा दांडगोबाच! दुसरं कोण असणार? दांडगोबा म्हणजे त्यांची लाडकी लेक! सुमी! सुमित्रा. एकुलती एक म्हणून जरा जास्तच लाडावलेली! त्यांनी शिस्त लावायचा प्रयत्न केला तर बापाला आवडत नाही. त्या चरफडतच उठल्या आणि दरवाजा उघडला. हो, नाहीतर हा बेलचा टरटराट काही थांबायचा नाही!
सुमी एखाद्या वादळासारखी आत घुसली! खांद्यावरचे वह्या पुस्तकांचे ओझ्याचे सॅक टेबलावर फेकले आणि एकदम मालतीबाईंच्या गळ्यातच पडली!
“अगं, अगं, सोड, सोड, एवढं कसलं प्रेम उफाळून आलंय?”
“ममा, ममा ओ माय स्वीट ममा!”
“हो, हो समजलं. फार लाडीगोडी नको, बोल.”
“ममा प्लीज एक कप मस्त कॉफी दे ना, देतेस?”
“अगं मी आत्ताच आलेय शाळेतून. जरा पाच मिनिटं बसू तरी देशील? मग टाकते.”
“ममा, थँक्यू ममा! मी येतेच फ्रेश होऊन पाच मिनिटात! मला लगेच जायचंय डान्स क्लासला!”
कधी मोठी होणार ही पोर? आता दोन चार वर्षात लग्नाची होईल. काय होणार हिचं पुढे? मालतीबाईंच्या जिवाला घोर लागला. पण ही बोलायची वेळ नव्हती. त्यांनाही कॉफी हवी होतीच. त्यांनी तोंडावर पाण्याचे चार दोन सपकारे मारले. नीट पुसले. गॅसवर कॉफी ठेवली. थोडी जास्तच, कारण सुमी जाते नाही तर माधवरावांची घरी यायची वेळ होईलच.
कॉफी किटलीत भरून त्या सुमीची वाट बघत बसल्या. सुमी आलीच. आल्या आल्या फर्रकन खुर्ची ओढून बसली. खुर्ची ओढल्याचा केवढा तरी आवाज झाला! फर्र! फर्र!!
“अग सुमे केवढ्यानं ओढतेस ती खुर्ची? नीट उचलून नाही का घेता येत? हा कसला मला धसमुसळेपणा? वस्तू जरा जपून वापरावी.”
“मॉम! पुरे! तुझी शाळा नको सुरू करूस आता!” सुमी हसतच म्हणाली आणि कॉफी ढोसून जशी आली तशीच झपाट्याने गेली सुद्धा!
मालतीबाई ती गेली तिकडे नुसत्याच आ वासून पहात बसल्या! जातानाही सुमी गेली ती खुर्चीचा फरफराट करूनच! कॉफीचे घोट घेत घेत त्या विचार करीत बसल्या. सगळं चांगलं आहे. दोघांच्याही चांगल्या नोकर्‍या आहेत. सुखी कुटुंब आहे. सुमी लाडावलेली असली तरी उध्दट नाही. पण या वयानं थोडी अवखळ झाली आहे. जपलं पाहिजे. माधवराव आले म्हणजे सांगितलं पाहिजे त्यांना. अहो आता पोरीचे लाड बस झाले. जरा तिला व्यवहार शिकवू.
वाढत्या वयाची पोर म्हणजे जीवाला घोर नुसता. विचार करता करता अधून मधून कॉफीचे घोट घेत त्यांनी डोळे मिटले. कॉफीची चव जिभेवर घोळवत घोळवत कॉफी प्यायची त्यांना फार आवड. कॉफीचा मस्त सुगंध जिभेवर घोळवत त्यांनी डोळे मिटले.
कुणाचा तरी कण्हल्यासारखा आवाज आला!
“कोण? कोण कण्हतंय?” त्यांनी दचकून आजूबाजूला पाहिलं! कुणीच नव्हतं! मग आत्ता कण्हलं ते कोण? काहीतरी भास झाला असावा. पुन्हा तोच आवाज आला! सुमी बसली होती त्याच बाजूनं! पण तिथं तर कुणीच नाही! घरात त्या एकट्याच होत्या! मग हा कुणाचा आवाज? बाहेरून तर नाही येत?
“नाही, बाहेरून नाही मॅडम मीच कण्हतेय!”
“मॅडम? इथे घरी कोण मला मॅडम म्हणतेय?”
“मी फरशी बोलतेय मॅडम!”
“फरशी? कोण फरशी?”
“मॅडम, अहो फरशी म्हणजे आपली फरशी
“फरशी हे काय नाव आहे का? कुठे आहेस तू?”
“मॅडम, अहो फरशी म्हणजे या तुमच्या हॉलची मी फरशी!”
“काय? हॉलची फरशी?” मालतीबाईंना आता मात्र आपण भम्रिष्ठ तर नाही ना झालो असे वाटू लागले.
“नाही मॅडम. तुम्ही भ्रमिष्ठ नाही झालात. मी खरोखरच फरशी बोलते आहे!”
“अग बाई फरशी कशी बोलेल? तिला काय जीव असतो का?”
“मॅडम निर्जीव वस्तूतही जीव असतो. पण तो आपण जाणून घेत नाही. मॅडम तुमच्या मनात दुःखी विचार आले तेव्हा मला पण दुःख झालं. वाटलं आपलं दुःख कोण जाणणार?”
“तुला? आणि दुःख? कसलं दुःख?
अगं खरं तर तुझा दिमाख हेवा करावा असाच आहे. तुला माहीत आहेत का, या हॉलच्या सजावटीसाठी आम्ही किती महागड्या, चकचकीत, रंगीत, गुळगुळीत दिमाखदार
इंपोर्टेड फरशा आणल्या आहेत? शिवाय या हॉलची सजावट करण्यासाठी तुला छान काश्मिरी गालिचानं मढवलं आहे. त्यावर हा सुंदर गुबगुबीत सोफा, हे दिमाखदार फर्निचर, या सुंदर सुंदर शोभेच्या वस्तू, फ्लॉवर पॉट, जिकडे तिकडे पहावे तिकडे पहा तुझा दिमाख तर अगदी राजेशाही थाटाचा आहे आणि तरी तू दुःखी? सुख टोचते म्हणतात ते असे!”
“मॅडम हे वरवरचे वैभव पहायला गोड वाटते!”
“म्हणजे?”
“मॅडम हे वैभव तुम्हाला दिसते, पण मी रोज जे मरण मरते ते तुम्हाला दिसत नाही!”
“मरण? ते पण रोज? काय सांगतेस?”
“मॅडम, मरणच नाहीतर काय? मघाशी पाहिलेत ना ती सुमी केवढ्यांदा खुर्ची फर्रकन ओढून बसली. केवढे ओरखडे पडले माझ्या अंगावर! जणू कोणी तरी बोचकारतेय. शिवाय रोज रोज तुम्ही लोक मला तुडवता ते वेगळेच. हे फर्निचर हलवताना, सरकवताना माझा जीव घाबरतो, थरथर कापतो, पण कुणाला त्याचं काही वाटतं का?”
“खरंच ग बाई, हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही.”
“नाही ना? आता आणखी एक तुमच्या लक्षात आलं का?”
“आणखी काय? आणखी कसलं दुःख?”
“मॅडम आता वर बघा त्या छताकडे.”
“त्याने काय केलंय तुला?”
“मॅडम इथे खाली पडल्या पडल्या मी रोज तुडवली जात असताना वर पहाते. मला छताचा रूबाब दिसतो. काय त्याचा दिमाख? छान, सुबक रचना, निळसर पांढरा रंग, कोपर्‍या कोपर्‍यावर झगमगती झुंबरं, भिरभिर्‍या सारखे मोहक पंखे, पिवळे, पांढरे दिवे, किती थाट? शिवाय त्याला पाय लावायची टाप आहे का कुणाची? पाय लावायला गेला तर धप्कन पडेलच खाली!”
“हो ग बाई. तुझं दुःख खरंच माझ्या लक्षात आलं नाही. मघाशी सुमीनं खुर्ची ओढली तेव्हा मी तिला बोलले खरं, पण त्यामुळे तुला एवढे दुःख झालं असेल असे माझ्या मनातही आले नाही.
“तिचं दुःख तुम्हाला समजलं. पण माझं?”
“आता आणखी कोण?”
“मी!”
“मी? तू कोण?”
“मी वरून बोलतोय! छताजी!”
“छताजी?”
“हो, म्हणजे हॉलचे छत हो!”
“चांगला मजेत आहेस की. तुला कसले दुःख? आताच फरशीनं सांगितला ना, तुझा रूबाब!
तुला रे कसला त्रास? फरशीचं म्हणणं पटलं मला.”
“मॅडम तुम्हाला जन्मठेपेचा कैदी ठाऊक आहे का?”
“हो, पण त्याचं इथं काय?”
“मॅडम, अहो त्याच्या सारखीच शिक्षा भोगतोय मी!”
“काय सांगतोस? जन्मठेप? आणि तुला?”
“नाहीतर काय मॅडम? अहो इथं टांगून ठेवलंय मला. खाली उतरायची सोय नाही. सगळं लांबून लांबूनच पहायचं. अगदी वाळीत टाकल्या सारखं झालंय मला. मॅडम, अहो असं सतत उलटं टांगणं म्हणजे काय असतं ठाऊक आहे का?”
“काय असतं?”
“मॅडम त्याला म्हणतात वटवाघुळाचं जिणं!”
“वटवाघुळाचं जिणं? काय वाट्टेल ते बोलू नकोस!”
“नाहीतर काय मॅडम, अहो रोज भीती वाटते खाली पडून फुटायची!”
बेल वाजते. टर्र! टर्र!
मालतीबाईर्ंची तंद्री लागलेली असते.
माधवराव त्यांच्या जवळच्या किल्लीने दार उघडून आत येतात. मालतीबाई डोळे मिटून वर छताकडे तोंड करून खुर्चीवर बसलेल्या दिसतात. त्यांना झोप लागली आहे असे त्यांना वाटते.
झोपू दे. थकली असेल. असे वाटून ते बूट काढण्यासाठी शू रॅक जवळचे लोखंडी स्टूल हळूच ओढून घेतात. त्यावर बसून बूट काढायला लागतात. हळूच ओढले तरी त्या लोखंडी स्टुलाचा फर्र फर्र आवाज होतोच!
“अरे, नका रे असे ओढू! त्या फरशीला त्रास होतो रे! तिला दुखते रे!!” मालतीबाई झोपेत असल्याप्रमाणे बडबडतात!
माधवराव लगबगीने त्यांच्याकडे जाऊन त्यांना उठवतात. हलवतात. त्या डोळे उघडतात!
“अरे! तुम्ही कधी आलात?”
“तू फरशीशी बोलत होतीस तेव्हा!”
“फरशीशी? चला काही तरीच!”
“अगं खरंच तिला त्रास देऊ नका. दुखेल म्हणालीस. तिचं डोकं बिकं
दुखतंय का? बाम आणू का लावायला तिला?”
“चला! चेष्टा मस्करी पुरे! या, कॉफी घ्यायला!”
“अहो मॅडम, त्यांना म्हणावं बाम नको क्रीम आणा लावायला! हे ओरखडे फार दुखताहेत हो!”
“काय म्हणालीस? क्रीम लावू?”
माधवराव थक्क होऊन मालतीबाईंकडे पहात राहातात!

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर बासरी वाजवून अर्जुनने जिंकली प्रेक्षकांची मनं ( Tharala Tar Mag Fame Arjun Subhedar Aka Amit Bhanushali Is Flute Artist )

ठरलं तर मग मालिकेतला अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांसमोर येणार…

February 9, 2025

छावा सिनेमाच्या निमित्ताने घरोघरी मातीच्या चुलीच्या सेटवर विक्की कौशलने लावली खास हजेरी (Vicky Kaushal made a special appearance on the sets of Gharoghar Mati Chuli For Chhava movie Promotion)

स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या श्री आणि सौ स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.…

February 9, 2025

महाकुंभमेळ्याला जाण्याबाबत भारती सिंहचे विधान, सोशल मीडियावर चर्चा  (Bharti Singh Reveals Why She Will Not Visit Mahakumbh Mela )

सामान्य माणसांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि परदेशी लोकही २०२५ च्या महाकुंभात पवित्र स्नान करत आहेत. अशा…

February 9, 2025

पुतण्या अरहान खानच्या पॉडकास्टमध्ये दिसला सलमान खान, मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटावर व्यक्त ( Salman Khan Shares Advice For Nephew Arhaan Khan After Arbaaz -Malaika Arora Divorce)

आगामी चित्रपट 'सिकंदर'च्या रिलीजपूर्वी, बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान त्याचा पुतण्या अरहान खान म्हणजेच अरबाज…

February 9, 2025

म्यूजिक डायरेक्टर प्रीतम चक्रवर्ती के स्टूडियो में हुई चोरी, 40 लाख रुपए लेकर भागा चोर (Music Director Pritam Chakraborty 40 Lakh Rupees Stolen From The Office)

बॉलीवुड को सुपर हिट सॉन्ग देने वाले म्यूजिक डायरेक्टर प्रीतम चक्रवर्ती (Music Director Pritam Chakarborty)…

February 9, 2025

Healthy habits that can backfire

We all want to be as fit as possible, yet we end up adopting certain…

February 9, 2025
© Merisaheli