Marathi

ओढ (Short Story: Odha)

  • विनायक शिंदे
    त्यांच्या ब्लॉकचा दरवाजा सताड उघडा होता. दारासमोर सोसायटीतल्या महिलांची गर्दी पाहून त्यांच्या काळजात चर्र्र्र् झालं. कदाचित दुर्गेचं काही… नुसत्या कल्पनेनंच त्यांच्या कपाळावर धर्मबिंदू उमटले.


    सहाव्या मजल्यावरून दुर्गाकाकी पावसाळ्यानंतर गार्डनच्या कोपर्‍यात तरारून फुललेला रक्तवर्णी गुलमोहर पाहत होत्या. सकाळची देवपूजा आटपून त्या खिडकीजवळ बसून नेहमीच व्यंकटेश स्तोत्र वाचल्यावर समोरचं मोकळं आभाळ आणि टॉवरच्या कोंडाळ्यात दूरवर दिसणारे जांभळट डोंगर न्याहाळीत नेमानं तासभर बसत. त्यांचे यजमान वसंतराव मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झाल्याला आता दहा-बारा वर्षं झाली होती. शिक्षकी पेशा त्यांच्या हाडीमासी भिनल्यामुळे त्यांचं प्रत्येक काम कसं वक्तशीर आणि टापटिपीने भरलेलं असे. सुट्टीचा दिवस असो किंवा रविवार असो, सकाळी पाच वाजता उठून गार पाण्याने आंघोळ करायची सवय त्यांच्या अगदी अंगवळणी पडली होती. सकाळचा चहा झाल्यानंतर त्यांना ताजं वर्तमानपत्र वाचायला हवं असे. पेपर टाकणार्‍या पोर्‍यानं जरा जरी उशीर केला, तर लगेच त्यांच्या कपाळाला आठ्या पडत. त्यांचे दोन्ही मुलगे, उमेश आणि जयेश, तसंच पत्नी दुर्गा यांना त्यांचं हे शिस्तीचं अवडंबर अजिबात खपत नसे. ‘कशाला एवढं काटेकोरपणं वागता?’ असं त्यांना विचारायला गेलं तर ते शिस्तीनं राष्ट्र किती मोठं होतं असा छापील मजकूर तोंडावर फेकतील आणि मग मूडमध्ये आले तर व्याख्यानही झोडतील; ते ऐकायला पडू नये म्हणून प्रत्येक जण तोंड मिटून गप्प बसत.
    दोन्ही मुलगे अभ्यासात स्कॉलर असल्यामुळे त्यांनी पहिला नंबर कधीच सोडला नाही. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणही यशस्वीपणे पूर्ण करून, आपापल्या मेरिटवर परदेशात जाऊन भारी पगाराच्या नोकरीवर ते स्थिरस्थावर झाले होते. आई-वडिलांना कळलंच नाही इतका त्यांचा वर्तमान सुपर फास्ट झाला.
    सुरुवातीला दोघंही परदेशातून नियमित फोन करून आई-वडिलांची ख्याली-खुशाली विचारत असत, मग तेही कमी झालं. उमेश पहिल्यापासून दुर्गाकाकींचा लाडका, तर वसंतरावांना जयेश परममित्रासारखा! त्या दोघांचे आठवडाभर फोन आले नाहीत, तर दोघंही अस्वस्थ होत. मग गुप्तेकाका, त्या दोघांचे कॉमन फ्रेंड वसंतरावांना हसून म्हणत, “काय वसंतराव, बरेच दिवस तुमचा मोबाईल वाजलेला दिसत नाहीये. तुमचा ओढलेला चेहरा सांगतोय. अहो, आजकाल जो तो इतका बिझी झालाय की, मरायलाही कोणाला फुरसद नाही, फॉरेनला तर म्हणे इतकं काम असतं की, कूस बदलायला देत नाही. काय म्हणताहेत तुमचे लाडके देवदूत? नाही म्हणजे हा शब्द तुमचा.”
    “गुप्त्या, आज बरा वेळ सापडला तुला… माझी खेचायला…” आणि ते अचानक गप्पच झाले. त्यांना कदाचित मुलांची प्रकर्षाने आठवण झाली असावी किंवा मुलाच्या बालपणात आणि त्यांच्या तरुणपणात त्यांनी खाल्लेल्या खस्ता आठवल्या असतील. अचानक भावनावश होत ते म्हणाले, “पाखरं झाडावर घरटं बांधतात आणि मग मन मानेल त्या दिशेला जातात. ती परत घरट्याकडे कधीच फिरकत नाहीत; पण त्यांना कदाचित हे ठाऊक नसतं की, ते झाड त्यांच्या परतण्याची वाट पाहत आहे.”
    “पूर्वी मधुसूदन कालेलकरांच्या नाटकात अशी मनभावन वाक्यं असायची. त्यांची आज अचानक आठवण करून दिलीत वसंतरावजी,” असं म्हणून गुप्तेकाका विनोद केल्यासारखे हसले. वसंतरावांना मात्र अजिबात हसू आलं नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर प्रखर प्रकाशझोतात उजळून निघालेला रंगमंच दिसायला लागला. त्या रंगमंचाच्या मधोमध त्यांना जयेश आणि उमेश दिसायला लागले. भाकड नटासारखे त्यांचे चेहरे अगदी निर्विकार दिसत होते. कोरडे ठणठणीत अगदी कपड्यांच्या शोरूममध्ये उभे केलेल्या निर्जीव पुतळ्यासारखे!
    ते नेहमीप्रमाणे लिफ्टमधून सहाव्या मजल्यावर उतरल्यावर त्यांचा 602 नंबरचा ब्लॉक सताड उघडा होता आणि दारासमोर सोसायटीतल्या महिलांची गर्दी पाहून त्यांच्या काळजात चर्र्र्र् झालं. कदाचित दुर्गेचं काही… नुसत्या कल्पनेनंच त्यांच्या कपाळावर धर्मबिंदू उमटले. पत्नीला पलंगावर बसलेलं पाहिल्यावर त्यांच्या जिवात जीव आला. त्यांच्या भकास चेहर्‍याकडे पाहत मंद स्मित करत दुर्गाकाकी म्हणाल्या, “इतकं काही सिरियस होण्यासारखं घडलेलं नाही.
    सकाळी बी.पी.ची गोळी घ्यायला विसरले,
    त्याचा दुष्परिणाम.”
    “दुर्गे, तुझं हे नेहमीचंच आहे. सतत मुलांची काळजी करायची आणि मग आपल्या प्रकृतीची हेळसांड करायची. कशाला हव्या आहेत त्यांच्या आठवणी… ते तिकडे मजेत आहेत.”
    “तुमच्यासारखं कठोर होणं, मला नाही जमायचं.”
    “मग मर एकदाची… मला काही सांगू नकोस,
    हे होतंय आणि ते होतंय… सुधाही फोन करून
    सांगत होती तुला, एकदा डॉ. खाडिलकरांना दाखवून घे म्हणून…”
    “तुमच्यापेक्षा तुमच्या बहिणीला माझी किती काळजी. औषधं वेळेवर घेतेस ना… दिवसातून तीन-चार वेळा फोन करून सतरांदा चौकशी करील. अशी प्रेमळ माणसं म्हणजे तुम्हीही… वाटतं पुढल्या जन्मीही ही माणसं माझ्या वाट्याला यावीत…
    भरभरून प्रेम करणारी…”
    बोलता बोलता सुधाकाकींच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्यांचा स्वभावच हळवा! वर्तमानपत्रात कोणाच्या मृत्यूची बातमी वाचल्यावरही त्यांच्या डोळ्यात घळाघळा आसवं येऊन त्या अपरिचित व्यक्तीला त्या श्रद्धांजली वाहत. त्यांच्या या भावुकपणाची चेष्टा करायची वसंतरावाना लहर यायची. मग वर्तमानपत्रात तशीच एखादी बातमी आली की, ते हसून म्हणायचे, “दुर्गे, ही बघ पेपरमध्ये तुझ्या नातेवाइकांची बातमी आली आहे. टेंभुर्णीजवळ पाण्याचा टँकर आणि खासगी कारची टक्कर होऊन एकाच कुटुंबातली चार माणसं मरण पावली आहेत. अपघाताबद्दल पोलीस चौकशी सुरू आहे, गेले बिचारे तुला सोडून… हा: हा: हा:”
    “मेली सदान्कदा ही जीवघेणी चेष्टा! त्या घरातल्या माणसांवर केवढा दुर्धर प्रसंग ओढवला असेल, त्याचं तुम्हाला काय सोयरसुतक.”
  • “अगं, हे बोलावणं वरून आलं की, ते कोणालाही टाळता येणार नाही. ज्याचे दिवस भरले तो गेला, त्यात काय एवढं… ज्याचं त्याचं प्रारब्ध, दुसरं काय?”
    “झालं तुमचं तत्त्वज्ञान सुरू…”
    मग तो विषय तिथेच संपत
    असे आणि दोघं एकमेकांकडे सूचक नजरेने पाहत. त्यात भविष्यातल्या
    कटू सत्याची भीती काठोकाठ भरलेली असे.
    अलीकडे वसंतरावांचं कशातच लक्ष लागत नव्हतं. खरं तर अध्यात्मानं भारलेले-तत्त्वज्ञानाने भरलेले कितीतरी ग्रंथ त्यांच्या संग्रही होते. अधूनमधून सवड मिळेल तशी ते ती पुस्तकं अगदी मन लावून वाचत असत. कोणीतरी लवकरच या घरातला आपला प्रवास इथेच संपवणार आहे, असं त्यांचं अंतर्मन घड्याळाच्या टीकटीकसारखं सांगतं आहे, असं वाटत राही. भल्या मोठ्या मैदानात ते पूर्वी संध्याकाळी चक्कर मारायला जात. अगदीच कंटाळा आला तर पार्ल्याला धाकट्या बहिणीकडे, सुधाकडे जात… पण तेही जाणं त्यांनी सोडलं होतं. आपण कुठेतरी गेलो, तिथेच रमलो आणि इकडे दुर्गाला काही झालं तर…? अशी अनामिक भीती पहाटेच्या धुक्यासारखी त्यांच्या मनात ठाण मांडून बसत असे. त्या रात्री तर कहरच झाला. टी.व्ही.वरची शेवटची मालिका अकरा वाजता संपल्यानंतर ती दोघं काहीही न बोलता उशाला मोबाईल आणि पाण्याची बाटली ठेवून झोपी जात. नाही म्हणजे, त्यांनी स्वतःला तसा नियम घालून घेतला होता. सिरियलवर नो कॉमेंटस्! मुलांच्या फोनची चौकशी अजिबात करायची नाही की, आठवणी जागवायच्या नाहीत. लाइट बंद करून डोळे मिटून गप्प पडून राहायचं. ‘झोपलात का?’ असंही विचारायचं नाही.
    त्या रात्री दुर्गाकाकी झोपेची गोळी घेतल्यासारख्या कधी नव्हत्या त्या गाढ झोपल्या होत्या. वसंतरावांना मात्र काही केल्या झोप येत नव्हती. मग त्यांनी तिथल्यातिथे फेर्‍या मारायला सुरुवात केली. बराच वेळ झाला. हळूहळू पाय दुखायला लागले, पण डोळ्यांवर पेंग काही येईना. दिवसा माणसांच्या, फेरीवाल्यांच्या कलकलाटात गजबजलेला तो रस्ता शिकार मट्ट करून सुस्त पडलेल्या अजगरासारखा दिसत होता. ती प्रगाढ शांतता त्यांना अगदी खायला उठत होती. त्यांनी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. साडेतीन वाजून गेले होते. मग ते निश्‍चय करून पलंगावर आडवे झाले. पाच वाजता त्यांचा डोळा लागला, अगदी गाढ झोपले. झोपेत त्यांना एक सुंदर स्वप्न पडलं. त्यांचं नवीन नवीन लग्न झालं होतं. सगळेच तिकडे जातात म्हणून हेही हनिमूनला महाबळेश्‍वरलाच गेले होते. लग्न झालं त्या वेळी ते हॅण्डसम दिसायचे, तसेच दिसत होते. लख्ख गोरापान रंग, काळे कुळकुळीत केस, भरपूर उंची… दुर्गाकाकीही अगदी त्यांना शोभतील अशाच होत्या. तांबूस वर्ण, पिंगट डोळे, तरतरीत नाक आणि चवळीच्या शेंगेसारखा उठून दिसणारा त्यांचा सडसडीत बांधा. स्वप्नात दिसत असलेला प्रदेश हा नक्कीच महाबळेश्‍वर नव्हता. सर्वत्र दूरवर पसरलेली गुलाबाची शेती, तरारून उठलेले ताटवेच ताटवे! स्वप्नात स्वप्न दिसावं तसा गुलाबी संधिप्रकाश… समोरचं मनमोहक दृश्य पाहून दोघांच्याही डोळ्यांचं पारणं फिटलं. मधूनच खट्याळ वारा संगीताच्या तारा छेडल्यासारखा फुलांवर सुखद लहरी उठवत होता. शांततेचा भंग करत वसंतराव खट्याळ हास्य करत म्हणाले, “दुर्गा, निसर्गाचा हा मोहक नजारा पाहून काय वाटतं?”
    क्षणाचीही उसंत न घेता दुर्गाकाकी म्हणाल्या,
    “मला ना आता दूरवर क्षितीजापर्यंत जोराने धावत
    जावंसं वाटतं.” आणि बोलल्याप्रमाणे त्या चक्क
    धावायला लागल्या.

  • ‘अगं, थांब’ म्हणेपर्यंत त्या क्षणात दूर गेल्या. वसंतराव अवाक् होऊन पाहतच राहिले. आता पळण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता.
    दुर्गाकाकी पळतच होत्या. धावून धावून वसंतरावांचे
    पाय थकले. घशाला कोरड पडली, तरी ते धावतच होते. शेवटी दुर्गाकाकी लहान ठिपक्यासारख्या दिसायला लागल्या आणि वसंतरावांच्या डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच एकाएकी अदृश्य झाल्या. आता नेमकं काय करावं तेच त्यांना कळेना. त्यांनी मोठ्यानं टाहो फोडला. ‘दुर्गाऽऽऽ’ त्यांनी डोळे उघडले, तर समोर दुर्गाकाकी त्यांच्याकडे पाहत हसत होत्या. “म्हटलं, मी जिवंत आहे. काळजी करू नका,” असं म्हणून त्यांनी काकांना पाणी प्यायला दिलं. त्यांच्या कपाळावर उमटलेला घाम त्यांनी फडक्यानं पुसला.
    दुसर्‍या दिवशी दुर्गाकाकी त्यांच्या स्वप्नावर मल्लिनाथी करून वसंतरावांची टर उडवून स्वतःशीच हसत होत्या. हसता हसता त्यांना अचानक उचकी लागली, ती तांब्याभर पाणी पिऊनही थांबेना, तेव्हा वसंतरावाचा चेहरा कावराबावरा झाला. त्यातच त्यांना श्‍वसनाचा त्रास व्हायला लागला. मग मात्र त्यांनी बहिणीला फोन लावला. ती धावतच आपल्या थोरल्या मुलाला घेऊन तातडीनं हजर झाली. त्याने जराही वेळ न दवडता आपल्या मित्राच्या, डॉ. परांजपेंच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना अ‍ॅडमिट केलं. हां हां म्हणता ही बातमी अख्ख्या सोसायटीभर पसरली आणि जो तो हॉस्पिटलकडे पळाला. लोकांचं प्रेम पाहून वसंतराव भारावले. नकळत सुधाच्या मुलाने अमेरिकेला जयेश आणि उमेशला फोन लावले. तेवढ्यात दुर्गाकाकींना हृदयविकाराचा जोरदार झटका येऊन त्यांचं दुःखद निधन झालं.
    दोन मोठे मुलगे असूनही वसंतराव एकाकी झाले. अमेरिकेत वेळेवर फोन करूनही जयेश-उमेश जेव्हा पाहिजे त्या वेळी भारतात येऊ शकले नाहीत. दुर्गाकाकींच्या निधनाच्या आठ दिवसानंतर जयेश एकटाच भारतात घरी परतला. वसंतरावांना पत्नी गेल्याचं परमावधीचं दुःख झालं होतं. त्यांनी जयेशला काही तरी बोलावं अशी इतरांची अपेक्षा होती, पण त्यांनी कोणतीही नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. रीतसर दुर्गाकाकींचं तेरावं झालं. नंतर दुसर्‍या दिवशी जयेश परदेशी जायला निघाला, तेव्हा वसंतरावांनी मुलाला विचारलं, “जयेश, तू लोकलज्जेस्तव निदान आईच्या तेराव्याला तरी आलास, मग उमेश का नाही आला?”
    त्यावर जयेश म्हणाला, “दादा म्हणाला, जयेश मला अजिबात वेळ नाही तेव्हा तू आता जा. बाबांच्या वेळेला मी जाईन.”
shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या ॲनिमेटेड ‘बुनी बियर्स’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच! (The Poster Launch Of The Animated Movie ‘Bunny Bears’, Which Gives Courage And Stubbornness To Children!)

कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच…

April 16, 2024

‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चनचा प्रोमो व्हायरल ( Kaun Banega Crorepati 16 Promo Registration Begins Amitabh Bachchan Announces It)

'कौन बनेगा करोडपती'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या शोच्या 16व्या सीझनसह…

April 16, 2024

लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आलिया रणबीर केलं खास, दोन दिवसांनी फोटो व्हायरल (Inside Pics of Alia Bhatt and Ranbir Kapoor’s 2nd wedding anniversary celebrations)

14 एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाली. दोघांनी…

April 16, 2024

कहानी- काठ की हांडी (Short Story- Kath Ki Handi)

सारे षडयंत्र से अनभिज्ञ सुनीता, जिन्हें हमदर्द समझ रही थी, वही आस्तीन के सांप निकले."सुनीता,…

April 16, 2024
© Merisaheli