Marathi

नाते टिकवणारे गुपित (The Secret To Maintaining A Relationship)


‘अग, ऐकलंस का?’ असं म्हणून एखादी मैत्रीण आपल्या मैत्रिणीला आपली नणंद-भावजय, सासू-सासरे किंवा शेजारणीचं एखादं गुपित सांगते. ते सांगून झाल्यावर मात्र ‘कुणाला सांगू नकोस हं,’ अशी किंवा ‘मी सांगितलं हे त्यांना कळू देऊ नकोस बरं’, अशी गळ घालते. जवळच्या किंवा परक्या माणसाचं एखादं गुपित हिच्या पोटात राहत नसतं. कधी एकदा दुसर्‍याला सांगू असं तिला होऊन जातं. आता जिला गुपित सांगितलं जातं, ती देखील हिच्यासारख्याच स्वभावाची असेल तर मग त्या गुपिताचा निकाल लागलाच म्हणायचा. तिच्याकडून आणखी कोणाला, असं करत जे गुपित ठेवायचं असतं, ते उघडपणे सगळीकडे पसरतं. जिनं हे गुपित फोडलं असतं, तिच्या नावाची बोंब होते नि मग ‘हिच्या मेलीच्या पोटात काही म्हणून राहतच नाही,’ अशी तिची बदनामी होते. बायकाच नाही, काही पुरुषही असे बदनाम असतात. कोणतंही सिक्रेट पोटात न राहू देण्याच्या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे ‘बायकी स्वभावाचा’, असं विशेषण त्यांना लागू पडतं.
खरं म्हणजे, गॉसिप अर्थात् एखाद्याविषयी कुजबुज किंवा त्याचं सिक्रेट ऐकायला सगळ्यांनाच आवडत असतं. ‘तुला एक गंमत सांगू का?’ असा एखाद्या गॉसिप बहाद्दरानं प्रश्‍न टाकला तर कोणी कानात बोटे घालत नाही. तरी पण गॉसिप करणारा, गुपित फोडणाराच बदनाम होतो. जर तुम्ही असं काही करत असाल तर…
काय असतं की, तुमची एखादी मैत्रीण, नातेवाईक आपल्या मनातील कोंडीतून बाहेर पडण्यासाठी तिचं एखादं सिक्रेट तुम्हाला सांगते. एखाद्या समस्येतून तिला सुटण्याचा मार्ग सापडत नाही, म्हणून तुम्हाला सांगते. ते तिचं गुपित असतं म्हणून ती विश्‍वासानं तुमच्याकडे मन मोकळं करते. तुमच्यावरील विश्‍वासानं तिनं असं केलेलं असतं. आता हे गुपित जर तुम्ही खिरापतीसारखं सगळ्यांना वाटलं तर विश्‍वासाला तडे जाणार नाही का! मग नातलग आणि मित्रपरिवारात नावही खराब होतं. नातेसंबंध बिघडतात. तसं होऊ नये म्हणून गुपित हे मनाच्या कुपीत कसं दडवून ठेवता येईल, त्याची ही सिक्रेटस्…

आडवळणाने सुचवा
समजा तुम्हाला कुठून तरी कळलं की, तुमच्या जिवलग मैत्रिणीचा नवरा तिच्याशी प्रतारणा करतोय. त्याचे बाहेर कुणाशी तरी संबंध आहेत, तर तिला या गोष्टीची कल्पना देणं हे आपलं कर्तव्यच ठरते.
पण ते खुबीनं तिच्या कानी घातलं पाहिजे. सुरुवातीला इकडच्या तिकडच्या गोष्टी करून मग ‘तुझे मिस्टर दुसर्‍या स्त्री बरोबर फिरताना दिसतात, ते तुला माहीत आहे का ग?’ असा प्रश्‍न तिला करा. ‘मला वाटलंच होतं,’ असं म्हणून किंवा अन्य काही बोलून तिनं आपल्या नवर्‍यावर संशय व्यक्त केला तरच मग तिला खरं काय ते सांगून टाका. मात्र त्यापूर्वी हेही जाणून घ्या की, हे सत्य ती पचवू शकेल का? तिला जर आपल्या नवर्‍याविषयी संशय वाटत नसला, तर आडवळणाने सुचवून पहा. यात कधी कधी असंही घडतं की, खरा प्रकार माहीत असूनही, आपण त्या गावचेच नाही, असं काही लोक दाखवतात. ते अज्ञानात सुख मिळवू पाहतात. अशा वेळी तिच्या नवर्‍याचं सिक्रेट उघड न करता आपल्या मनातच गाडून टाका.

योग्य वेळेची वाट बघा
तुम्हाला जर एखाद्या मैत्रिणीचं किंवा जवळच्या नातलगाचं एखादं गुपित समजलं तर ते लगेच सगळीकडे पसरवू नका. आपण हे आपल्याच मनात ठेवावं की नाही, याचा शांत डोक्याने विचार करा. काही गोष्टी अशा असतात की, दडवून ठेवण्यातच संबंधित व्यक्तीचं हित असतं. अशा गोष्टी चक्क मनात दडवून ठेवा. याउलट जर तुमच्या लक्षात आलं की, एखाद्या गोष्टीमुळे समोरच्या माणसाचं फार नुकसान होणार आहे, तर मग योग्य वेळेची वाट पहा. योग्य वेळी ती बाब उघड करा. मात्र ती उघड करते वेळी, हिताची बाब म्हणून तुला सांगतेय, अशी जाणीव करून द्या. याला गॉसिपचा दर्प येता कामा नये.

काढता पाय घ्यावा
ऑफिसात जर आपले दोन सहकारी एखाद्या गोष्टीवर चर्चा करत असतील, अन् ते जर सिक्रेट असेल तर ‘मला आधीपासूनच माहीत आहे,’ अशी त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. कारण त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. ‘तुला माहीत होतं, तर आधीच का नाही सांगितलंस,’ असं बोलत ते तुम्हाला दूषणं देऊ शकतात. तुमच्यावर अविश्‍वास दाखवत, ‘अन् आणखी काय काय माहीत आहे, ते आता सांग पाहू,’ म्हणून अधिक माहिती काढून घेऊ शकतात. तेव्हा तुमचे सहकारी तुम्हाला माहीत असलेल्या एखाद्या सिक्रेटची चर्चा करत असतील, तर तिथून काढता पाय घ्या.

विषयांतर करा
आपण मनाचा निग्रह करून एखादं गुपित मनात दडवून ठेवलंय. आपण चार लोकात बसलो. त्या ग्रुपमध्ये जर नेमका तोच विषय निघाला, तर खुबीनं विषयांतर करा. त्या विषयाला बगल देऊन दुसर्‍या विषयावर बोलायला सुरुवात करा. आवेशात येऊन दडवलेल्या गुपिताला आणखी फाटे फोडण्यापेक्षा ही युक्ती बरी. हे जमलं नाही, तर आपण त्या गावचेच नाही, असं दाखवत गप्प बसून राहा.

असं मन मोकळं करा
असं होऊ शकतं की, मनात दडवून ठेवलेली एखादी गोष्ट फार त्रासदायक ठरू शकते. हे दडवून ठेवण्याचं दडपण जास्त वाढू शकतं. कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं, असं वाटू लागतं. अशा वेळी हे दडपण कमी करण्यासाठी ते गुपित डायरीत लिहून काढा. (पूर्वी लोकांची डायरी लिहिण्याची पद्धत किती योग्य होती बघा.) हे गुपित फारच भयंकर असेल नि आपली डायरी कोणाच्या हाती पडली तर काय होईल, अशी भीती वाटत असेल तर मनात खदखदणारी ही गोष्ट एका कागदावर लिहा. अन् मग तो कागद फाडून फेकून द्या. यामुळे मन मोकळं होईल आणि गुपित देखील दडूनच राहील.
या गोष्टींचं पालन केल्यास तुम्ही विश्‍वासू व्यक्ती म्हणून गणल्या जाल. अन् नातीगोती दृढ राहतील.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

फिल्म समीक्षा: स्पोर्ट्स थ्रिलर एक्शन से भरपूर
‘क्रैक- जीतेगा तो जिएगा’ (Movie Review- Crakk- Jeetegaa Toh Jiyegaa)

पहली बार हिंदी सिनेमा में इस तरह की दमदार एक्शन, रोमांच, रोगंटे खड़े कर देनेवाले…

February 25, 2024

कहानी- अलसाई धूप के साए (Short Story- Alsai Dhoop Ke Saaye)

उन्होंने अपने दर्द को बांटना बंद ही कर दिया था. दर्द किससे बांटें… किसे अपना…

February 25, 2024

आईची शेवटीची इच्छा पूर्ण करण्यासाठी शाहरुखने सिनेमात काम करण्याचा घेतला निर्णय (To fulfill mother’s last wish, Shahrukh decided to work in cinema)

90 च्या दशकापासून आतापर्यंत शाहरुख खानची मोहिनी तशीच आहे. त्याने कठोर परिश्रम करून स्वत:ला सिद्ध…

February 25, 2024
© Merisaheli