Close

चिमणी पाखरं (Short Story: Chimani Pakhara)

  • राम कोयंडे
    पाच-सहा महिन्यांनी सोसायटीतल्या काही जणांच्या लक्षात आले, अरे हे भांडणारे आजोबा आजी आजकाल भांडत नाहीत. कधी बाहेर दिसले तर उत्साही आणि समाधानी दिसतात. काय गौडबंगाल आहे ते लोकांना कळेना. त्यांच्यावर पाळत ठेवली गेली. आजोबा-आजी वाण्याकडून प्रत्येकी दोनशे ग्रॅम अशी चारपाच धान्ये विकत घेतात अशी कोणीतरी बातमी पुरविली.
    कि शोरला चौथीची स्कॉलरशिप मिळाली. आईवडिलांनी सांगितले म्हणून पेढे आणि बॉक्स घेऊन तो त्यांच्या समोरच्याच बिल्डिंगमध्ये रहात असलेल्या, त्याच्या आजोबा आजीकडे आला… पहिल्यांदाच एकटा! हे आजोबा आजी म्हणजे त्याच्या आईचे आई-वडील. सतत आपापसात भांडणारे. त्या चार बिल्डिंगमध्ये प्रसिद्ध होते ते, भांडखोर म्हणून. त्या कॉलनीतले लोक त्यांच्याकडे जायचे टाळायचे. इतकेच काय. घराच्या बाहेर दिसले तरी त्यांच्याशी बोलायला लाज वाटायची त्यांना. तळ मजल्यावरच रहात असल्यामुळे तिथून जाणार्‍या येणार्‍यांना भांडण ऐकू यायचे आणि भांडताना हातवारे करताना पण दिसायचे. नंतर नंतर किशोरचे आईवडील तर आपलं काही नातं आहे त्यांच्याशी, हे पण कोणाला सांगत नसत. किशोर त्यांच्या दरवाजात आला.. त्यांचे भांडण चालू असलेले त्याने ऐकले आणि तरीही डोअरबेल दाबली त्याने. आता तर दरवाजा कोणी उघडायचा यावर त्यांचे भांडण सुरू झाले. किशोरला कळेना. आता आपण काय करायचे? तेवढ्यात दरवाजा उघडला..
    ‘अरे, किशोर.. सोन्या तूऽऽ ये, आत ये’, असं आजोबांनी म्हणताच आजीही तिथे आली.
    ‘माझा सोन्या तो! कसा आहेस रे?’ असं म्हणून आजीने त्याला कवटाळले.
    ‘अगं, अगं, त्याला आत तर येऊ दे.’ आजोबा म्हणाले.
    किशोर आत आल्यावर आजीने दोन्ही हातात त्याचा चेहरा पकडून प्रेमाने त्याच्या कपाळाचे अवघ्राण केले. म्हणाली, ‘केवढा मोठा झालास रे तू! निदान तू तरी येत जा इथे. सोन्या ऽ ऽ कुणीसुद्धा आमच्याकडे येत नाही बघ. किती दिवसांनी आलास?’
    त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून किशोरने आणलेले पेढे आजोबांना दिले आणि वाकून नमस्कार केला. आणलेला लंच बॉक्स आजीकडे देऊन तिलाही वाकून नमस्कार केला. म्हणाला, ‘आजी. मला स्कॉलरशिप मिळाली.’ तशी ती दोघं खूप
    खूश झाली.
    ‘तसा आहेस तू हुशार आणि गुणीसुद्धा. पण काय रे किशोर, सोन्या मला फक्त दोन पेढे आणि तुझ्या आजीला मात्र बुंदीचे लाडू आणि ते सुद्धा बॉक्स भरून?’ आजोबांनी लटकेच रागात विचारले.
    ‘आज्जू, तुम्हाला कसं कळलं त्यात बुंदीचे लाडू आहेत ते?’
    ‘अरे, तुझ्या आजीला खूप आवडतात ना? तुझ्या आईने मुद्दाम आणले असणार?’ आजोबा म्हणाले. जरा वेळाने निराश होत म्हणाले. ‘आमच्या सततच्या भांडणामुळे ती येत नाही इथे रे. आमची लाज वाटत असेल तिला. त्यामुळेच आमच्याशी तिचे काही नाते आहे हे ही सोईस्कररित्या विसरली असेल ती… लोकांना काय सांगेल ती? तुझ्या आजीला खूप सांगतो मी. बोलाव तुझ्या आईला, पण नाही…’
    ‘आणि तुम्ही सांगितलंत तर नाही येणार ती? पण नाही… मग माझं नाव कसं पुढे करता येईल भांडणासाठी?’ आजी.
    ‘मुलगी ना तुझी ती?’ आजोबा आणि तुमची?’
    आता परत भांडण सुरू होणार असं किशोरला वाटलं. इतक्यात त्याला त्यांच्या गॅलरीत चिमण्यांचा आवाज आला. त्याने सहजच विचारले.
    ‘आज्जू, चिमण्या पाळल्यात वाटतं?’
    ‘नाही रे’
    ‘मग गॅलरीत चिमण्यांचा आवाज कसा?’ असं म्हणत तो गॅलरीत गेला तर दोन चिमण्या भुर्रकन उडून गेल्या. किशोर म्हणाला, ‘आज्जू, तुम्ही चिमण्या का पाळत नाही? एवढी मोठी गॅलरी… रिकामीच तर आहे. थोडे दाणे द्या आणि बशीमध्ये पाणी ठेवा. सोप्पंय एकदम!’ असं म्हणून त्याने परत एकदा दोघांनाही नमस्कार करून आजीने दिलेला डबा घेऊन आपल्या घरी आला.
    तो गेल्यावर किशोरचे आजोबा सहजच गॅलरीत आले तर एक चिमणी गॅलरीच्या ग्रीलवर बसून चिव चिव करीत असलेली दिसली त्यांना. इतक्यात आजीही तिकडे आली तर तीच चिमणी उडून गेली. आजोबांनी आजीला चिडवायची संधी सोडली नाही. म्हणाले, ‘तुझ्या वार्‍याला माणसंच काय, चिमणी पण उभी रहात नाही.’ झालं… भांडण सुरू होणार… पण नाही झालं भांडण. किशोरच्या सहज बोलण्यातून त्यांना काहीतरी दिशा मिळाल्यासारखं वाटलं… चर्चा झाली, आणि आपापसात सतत भांडत राहण्यापेक्षा सहज जमणारं काम करून बघायला काय हरकत आहे असा आजोबा आजीचा विचार पक्का झाला, ‘आता सोन्या किशोर म्हणतो तसं करायचं.’
    अति उत्साहाने दोन प्लॅस्टिकच्या बश्या आणि तीन-चार प्रकारची धान्ये आणून दुसर्‍याच दिवशी सुरुवात झाली. आपापसातलं भांडण टाळण्यासाठी एकाने गॅलरीच्या एका टोकास तर दुसर्‍याने दुसर्‍या टोकास जायचं ठरवलं. प्लॅस्टिकची बशी ठेवून त्यात प्रत्येकाने पाणी ओतले. बशीच्या बाजूस थोडे थोडे धान्य पसरवून ठेवले. आता फक्त चिमण्याच यायच्या होत्या. आजोबा-आजी वाट पाहत बसले.
    बर्‍याच वेळाने एक चिमणी आली. ग्रीलवर बसून वेगळाच आवाज काढत असलेली चिमणी आजोबा आजीच्या ध्यानात आली. जरा वेळाने दुसरी आली. ती पण पहिल्या चिमणीसारखीच वेगळ्या आवाजात कोणाला तरी बोलावत असावी. थोड्याच वेळात तीनचार चिमण्या गोळा झाल्या. कलकलाट वाढला. पण दाणे टिपण्यास कोणीच तयार नव्हते. मग त्या सर्व उडून गेल्या. आता तर आजोबा आजीला चिमण्या दाणे कधी टिपतात त्याची उत्सुकता लागून राहिली. चिमण्या यायच्या..कलकलाट करायच्या आणि निघून जायच्या. चारपाचदा असंच झालं. आपणाला पकडण्यासाठी सापळा तर नाही ना? असं चिमण्यांना वाटत असेल. पहिली जोखीम घ्यायची कोणी? या मुद्यावर आजोबा आजीचं एकमत झालं. बर्‍याच काळानंतर कोणत्या तरी विषयावर न भांडता एकमत झालं होतं. दोघंही खूष होते.
    एक चिमणा आला. त्याने मोठमोठ्या आवाजाने चिमणीला बोलावून घेतल्याचे आजोबा आजीने बघितलं. चिमणी आल्यावर थोडासा चिवचिवाट झाला आणि हळूच चिमण्याने गॅलरीत उतरून घाबरत घाबरत दोन दाणे टिपून उडून गेल्याचे आजोबा आजीने बघितले. चला, सुरुवात तर झाली, असं म्हणून दोघांनीही एकमेकांकडे कौतुकाने बघितलं.
    आठ-दहा दिवसांनंतर तिथे दाणे टिपण्यासाठी एका वेळेस चार-पाच चिमण्या पण येऊ लागल्या. त्यांच्या कलकलाटाची सवय झाली. आता तर आजोबा आजीने दोघांसाठी दोन दुर्बिणी पण आणल्या. आपापसातील भांडणाची जागा पक्षी निरीक्षणाने घेतली. आपसात भांडणं न करता दिवस मजेत जाऊ लागले.
    पाच-सहा महिन्यांनी सोसायटीतल्या काही जणांच्या लक्षात आले, अरे हे भांडणारे आजोबा आजी आजकाल भांडत नाहीत. कधी बाहेर दिसले तर उत्साही आणि समाधानी दिसतात. काय गौडबंगाल आहे ते लोकांना कळेना. त्यांच्यावर पाळत ठेवली गेली. आजोबा-आजी वाण्याकडून प्रत्येकी दोनशे ग्रॅम अशी चारपाच धान्ये विकत घेतात, अशी कोणीतरी बातमी पुरविली. मग लोकांना कळले की, ते रोज सकाळी आणि संध्याकाळी गॅलरीत दाणे विखरून ठेवतात आणि बश्यांतून पाणीसुद्धा! चिमण्या पाखरांना प्रेमाने पाळतात ते! त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून. त्यातच ते रमतात. सोसायटीत हा एक
    चर्चेचा विषय झाला. काही महिन्यातच सोसायटीतले लोक भांडणारे आजी-आजोबा हे बिरुद विसरून गेले. आता तर तर लोक त्यांच्याकडे कौतुकाने बघू लागले. ज्येेष्ठ नागरिक फावल्या वेळात कुतूहलाने त्यांच्याकडे यायला लागले. या वयात त्यांचा तो उपक्रम बघून ते सुद्धा सुखावले. चिमण्या-चिमणींचे अनुभव लोकांना सांगताना आपण इतरांपेक्षा काही तरी वेगळं पण भव्यदिव्य करत असल्याचं तेज दोघांच्या चेहर्‍यावर दिसू लागलं. आपण हे सर्व किशोरने सुचविल्यामुळे केले, असे सांगून आपल्या नातवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करू लागले. एकंदरीत आजी-आजोबांचे छान चाललेलं बघून आपल्या बाल्कनीत गॅलरीत जागाच नसल्याने तसं करता येत नाही, ही व्यथा बर्‍याच जणांनी व्यक्त केली तर काही जण तिथून गेल्यानंतर गॅलरी, खिडकी आणि ग्रीलमध्ये असलेल्या छोट्या जागेत धान्य व पाणी ठेवू लागले. तिथे मात्र चिमण्यांबरोबर कबुतरे आणि कावळे पण यायला लागल्याचे ते नंतर म्हणाले.
    आता तर किशोरचे आईवडीलही त्यांचे आपापसात होणारे भांडण विसरून गेले. किशोरची आई वारंवार आपल्या आईवडिलांकडे जाऊ लागली. त्यांना काही हवं नको बघू लागली. लोकांनी केलेल्या कौतुकाने किशोरचे आजी-आजोबाच काय किशोरचे वडीलही सुखावत होते. सणासुदीला किशोरचे वडील मुद्दाम आपल्या सासू-सासर्‍यांना भेट घेऊन जाऊ लागले. चिमणी-पाखरं पाहून त्यांनाही बरं वाटू लागलं.
    आठ-दहा वर्षे चांगली गेली. काहीसं निमित्त होऊन आजी निवर्तली. आजोबा एकटेच राहिले. चिमण्यांच्या देखभालीत दुःखाचा भार कमी झाला एवढे मात्र खरे! आता आजोबांबरोबर बोलायलासुद्धा कोणी नव्हतं. किशोरला प्रश्‍न पडला कसा वेळ घालवीत असतील आजोबा.
    एका संध्याकाळी किशोर मित्राकडे चालला होता. आजोबांच्याच बिल्डिंगमध्ये दुसर्‍या माळ्यावर राहायचा किशोरचा मित्र. आजोबांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला म्हणून सहजच आत डोकावलं त्याने. तर आजोबांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला, म्हणून तो आत गेला. आजोबा, कोणाशी तरी प्रेमाने बोलत होते, ‘अगं, अशी काय करतेस? काय घाई आहे तुला? इथं आल्यावर नेहमीच घाई असते तुला जाण्याची. थांब जाऊ नकोस. रागावेन मी. तू आल्यासारखी जरा बोलू तर खरं! तुझ्याबरोबर बोलायला बरं वाटतं बघ. तू गेलीस तर मी कोणाबरोबर बोलू? तुझ्या संगतीत दिवस चांगला जातो ग. पण रात्र नाही जात. कसं समजावू तुला? ह्या म्हातारपणात एकटं असण्याचं दुःख कसं समजणार ग तुला. थांब तू. अगं विसरलोच मी. कचरा टाकायला गेलो. येताना बदली हातात होती म्हणून दरवाजा बंद केला नाही. आता करतो. वय झालं. सगळं नीट होत नाही बघ. थांब दरवाजा बंद करून येतो.’ ते दरवाजाकडे जायला वळले आणि किशोरला बघून दचकलेच.
    किशोरने न विचारताच म्हणाले, ‘किशोर बेटा, मी चिमणीशी बोलत होतो. ती लंगडणारी चिमणी. तुझी आजी ज्या दिवशी गेली त्याच दिवशी संध्याकाळपासून रोज इथे येते. ती लंगडत असल्यामुळेच मी तिला ओळखतो. मला आपलं वाटतं तुझी आजीच आहे ती, म्हणून बोलतो तिच्याशी. आठवणी सांगतो.
    सुखदुःखाचं बोलतो. कधी रागावतोही तिच्यावर. दुसरं कोण आहे इथं बोलायला तरी. मन हलकं होतं रे! कोणाशी तरी बोलल्याचं समाधान मिळतं. शिवाय परत उत्तर नाही. वेळही जातो.’
    किशोरला गप्प असलेला बघून जरा वेळाने म्हणाले, ‘मी अमेरिकेतून परत भारतात येणार नाही; एक वेळ इथपर्यंत ठीक आहे रे. पण तुम्हीही चला माझ्याबरोबर अमेरिकेत. आपण सर्व तिथेच राहू, असंही कधी आमचा मुलगा आम्हाला म्हणाला नाही. याच उद्वेगातून भांडणं व्हायची आमची आपापसात. निराश झालो होतो आम्ही आणि आता तुला माहीतच आहे. आई गेली तरी तो आला नाही… अरे, दिवस कार्याला पण नाही…! चौथीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत पास झालास म्हणून पेढे घेऊन आला होतास तू. तेव्हा सहजच म्हणालास, चिमण्या का पाळत नाही म्हणून. तू आपल्या घरी गेल्यावर तसंच केलं आम्ही. चिमण्या पाळल्या. आमचं आयुष्यच बदलून गेलं त्यामुळे. आमच्या जगण्याला एक दिशा मिळाली. भांडणाऐवजी उत्तम विरंगुळा मिळाला. हळू हळू भांडणं कमी झाली. आमच्याकडे सोसायटीतले लोक पण यायला लागले. तुम्हीही यायला लागलात. आम्ही परत माणसात आलो आणि अचानक तुझी आजी गेली.’ त्यांचा स्वर कातर झाला. मागच्या सर्व आठवणीने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ते बोलायचे थांबले. किशोरलाही गलबलून आलं. न बोलता आजोबांना नमस्कार करून तो तिथून बाहेर पडला. लंगडणार्‍या चिमणीला ते आजी समजतात. ते तिला आजीच मानतात. ती आजी असल्यासारखंच तिच्यावर प्रेम करतात. किशोरला जाणीव झाली, आजोबा-आजीचं एकमेकांवर अतिशय प्रेम असल्याची.
    एखाद दिवशी बुंदीचा लाडू आणून आजोबांनी ‘त्या’ चिमणीला भरवला आणि ते जर किशोरला कळलं, तर मात्र किशोरचे डोळे भरून आल्याशिवाय राहणार नाहीत.

Share this article