अनियमित जीवनशैलीने सर्व माणसांचं आरोग्य बिघडवलं आहे. ऑफिसात 8 ते 10 तास एका जागी बसल्याने अंगातील चरबी वाढतेय, घेर वाढतोय. एकूणच फिटनेसचा बोर्या वाजलेला आहे. परंतु ऑफिसात राहून आपण फिटनेसचं तंत्र अजमावू शकतो.
आजच्या स्पर्धात्मक युगात आणि करिअर सांभाळण्याच्या नादात आपले कामाचे तास वाढले आहेत. नोकरदार अथवा उद्योजक आपल्या कामात इतका गर्क आहे की, त्याचा बराचसा वेळ घरापेक्षा कामावर खर्च होत आहे. सकाळी लवकर उठून कामावर धावत जायचं नि रात्री उशिराने थकूनभागून घरी यायचं, अशी कित्येकांची दैनंदिनी झाली आहे. आता तर आपल्या राज्य शासकीय कर्मचारी व महानगरपालिका कर्मचारी यांना पाच दिवसांचा आठवडा जाहीर झाल्याने त्यांच्या कामाच्या तासात अधिकृत वाढ करण्यात आली आहे. म्हणजे एरव्ही कमी काम करणारे कर्मचारी आता जास्त तास कामात बिझी राहू लागले आहेत.
मुंबईसारख्या महानगरात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी व तिथून घरी परत जाण्यासाठी एवढा प्रवास करावा लागतो की लोकांची दमछाक होते. म्हणजे कामाचे तास आणि प्रवासाचे तास धरता मुंबईतील कित्येक माणसं फक्त झोपण्यापुरती रात्री घरात असतात. या अनियमित जीवनशैलीने अजीर्ण, अॅसिडिटी, मरगळ, नैराश्य, अधीरता, मधुमेह, रक्तदाब, वजनवाढ असे लहानमोठे आजार होतात. आरोग्य बिघडतं. ऑफिसात 8 ते 10 तास एका जागी बसल्याने अंगातील चरबी वाढते, घेर वाढतो. फिटनेसचा बोर्या वाजतो.
आता तब्येतीवर परिणाम होतो किंवा फिटनेस राहत नाही, म्हणून कोणी कामाशी, करिअरशी तडजोड करू शकत नाही. पण कामाच्या तासांच्या दरम्यान काही युक्त्या योजून फिटनेस राखण्याचा प्रयत्न करता येईल.
काय कराल?
ऑफिसातील कामाचं नियोजन करा. ऑफिसच्या वेळेपेक्षा जास्त वेळ बसणार नाही, असा मनाशी निश्चय करा व त्यानुसार कामाची आखणी करा.
काही कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये वर्कआऊट करण्यासाठी जिमची व्यवस्था केलेली असते. ऑफिस सुटताक्षणी तिथे कसरत करता येते. आपल्या ऑफिसात अशी सुविधा असेल तर त्याचा जरूर लाभ उठवा. नसेल तर ऑफिसच्या जवळपास असलेली एखादी जिम जॉईन करा. अन् तिथे जाऊन कसरत करा. जेणे करून जिमपर्यंत जाण्याचा वेळ वाचेल. अन् कंटाळा पण येणार नाही.
ऑफिसात वेळेत किंवा वेळेआधी पोहोचा. अन् आपल्या खुर्चीत बसून किमान 10 मिनिटं प्राणायम करा. श्वसनाचे व्यायाम करा.
लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. जिन्याने चढउतार केल्याने शरीराला थोडा तरी व्यायाम होईल.
आपण ऑफिसात स्वतःची कार घेऊन जात असाल, तर ती पार्किंग लॉटमध्ये अथवा ऑफिस परिसरात थोडी लांब उभी करा. जेणेकरून पार्क केलेल्या कारपासून आपल्या बसण्याच्या जागेवर चालत गेल्याने थोडेफार पाय मोकळे होतील.
लंच घरून आणा. बाहेरचे अन्न खाऊ नका. जेवणाच्या सुट्टीत लंच घेऊन ऑफिस परिसरात शतपावली घाला. शरीराची थोडीफार हालचाल होईल, अशी कृती करा.
कामातून व्यायाम
एकाच जागी बसून करण्याचे आपले काम असेल, तर शरीरात मेद साठण्याची शक्यता जास्त असते. त्याच्याने सुस्ती येते, आळस येतो. तो टाळण्यासाठी दर तासांनी जागेवरून उठावे व काही ना काही निमित्ताने इकडे तिकडे चालावे. किमान 2-3 मिनिटं अवश्य चालावे.
ऑफिसात आपल्याला लागणार्या फाईल्स, रजिस्टर, रबर स्टॅम्प इत्यादी वस्तू स्वतः उठून घ्या. कोणाला आणायला सांगू नका.
पिण्याच्या पाण्याची बाटली टेबलावर भरून न ठेवता पॅन्ट्रीमध्ये ठेवा. म्हणजे पाणी पिण्यासाठी तिथे उठून जाता येईल. पाणी पिऊन झाल्यावर आपल्या बसण्याच्या जागी जाण्यासाठी थोडा लांबचा फेरा गाठावा.
लंच घेतल्यानंतर बाहेरच्या जागेत शतपावली अवश्य करा.
कॉम्प्युटरवर सतत पाहून थकायला होतं. तेव्हा आपली मान खुर्चीच्या पाठीला चिकटवून, डोळे मिटून काही मिनिटं विश्रांती घ्या.
बसल्या जागी आपले पाय ताणा. बसण्याच्या जागेपर्यंत वर उचला. खाली-वर हलवा. मुठी आवळून 10 वेळा आतील बाजूस व 10 वेळा बाहेरील बाजूस फिरवा.
खांदे वर-खाली करा. 10 वेळा पुढे तर 10 वेळा मागच्या बाजूला फिरवा (क्लॉकवाइज् आणि अॅन्टी क्लॉकवाईज् मूव्हमेन्ट)
डोळे बंद करून डोळ्यांची बुब्बुळे वर-खाली तसेच डावी-उजवीकडे फिरवा. डोळ्यांची उघडझाप करा.
अशा रितीने बसल्या बसल्या काही हालचाली केल्याने आपण थोडाफार तरी फिटनेस राखू शकता.