Close

चित्रसृष्टीत धडपडणाऱ्या तरुणांची कंगना रणौत निर्मित प्रेमकहाणी ‘टिकू वेडस्‌ शेरू’ (Kangana Ranaut Is Back In Limelight With Her Home Production ‘Tiku Weds Sheru’)

चित्रसृष्टीत प्रवेश करण्यासाठी देशभरातून तरुण मुले व मुली मायानगरी मुंबईत धाव घेतात. अन्‌ या मायावी नगरीत नाव कमावण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो. एखाद-दुसरा अपवाद वगळता आज जे सुपरस्टार्स झाले आहेत, त्या प्रत्येकाने बॉलिवूडमध्ये संधी मिळण्यासाठी टक्केटोणपे खाल्ले आहेत. अशाच तरुण जोडीची प्रेमकहाणी ‘टिकू वेडस्‌ शेरू’ या प्राईम व्हिडिओच्या नवीन चित्रपटात आहे. हा चित्रपट ॲमेझॉन व्हिडिओ वर २३ जून रोजी प्रदर्शित होईल.

या चित्रपटाची निर्माती कंगना रणौत आहे. खूप दिवसांनी ती पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण प्रसंगी तिने प्राईम व्हिडिओच्या निर्मात्या अपर्णा पुरोहित यांचे जाहीर आभार मानले व चित्रपटाची जन्मकथा सांगितली. “हा चित्रपट ६-७ वर्षांपूर्वी ‘डिव्हाईन लव्हर्स’ या नावाने मी सुरू केला होता. इरफान साहेबांसोबत मी सुरु केला, पण दिग्दर्शकाची तब्येत बिघडली. अन्‌ तो रखडला… नंतर याची संहिता अपर्णाजी पुरोहित यांना पाठवली. अन्‌ त्यांचा होकार मिळताच माझा हुरुप वाढला. अन्‌ आता तो प्रदर्शनास तयार आहे,” असे कंगनाने सांगितले.

चित्रपटाचा नायक शेरु (नवाजुद्दीन सिद्दीकी) हा ज्युनियर आर्टिस्ट आहे तर नायिका टिकू (अवनीत कौर) ही धडपडणारी अभिनेत्री आहे. त्यांचे सिनेमाचे वेड, पाहिलेली स्वप्ने आणि ती पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड यांची ही संघर्षमय कथा आहे. दिग्दर्शन साई कबीर यांचे आहे. “सिनेमाच्या अशा वेडापायी अनेक जण मुंबईत येतात, पण त्यांचे पुढे काय होते, तेच कळत नाही. काही स्वप्ने पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात. तरी निराश व्हायचं नाही, स्वप्ने पूर्ण होतील, या आशेवर पुढे चालत राहायचं, असा संदेश हा चित्रपट देतो,” असे अपर्णा पुरोहित म्हणाल्या. तर आपणही आजचे यश पाहण्यासाठी खूप संघर्ष केला असल्याचे कंगनाने सांगितले. तिच्या मताशी सहमत असल्याचे सांगून नवाजुद्दीनने आपल्या धडपडीच्या काळातील मजेदार अनुभव कथन केले. “कथा ऐकल्यावर, अन्‌ ती स्वतःहून कंगना माझ्याकडे घेऊन आल्यावर मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता,” असे नवाजुद्दीन म्हणाला.

“आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि भावुक आहे. याचा ट्रेलर पाहिल्यावर मला अश्रू आवरले नाहीत. नवाजुद्दीन आणि कंगना यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले, ही मोठी गोष्ट आहे. चित्रपटाची नायिका टिकू ही कंगनाच्या हृदयाचा कप्पा आहे. शूटिंग प्रसंगी त्या सदैव माझ्यासोबत होत्या. अन्‌ प्रत्येक दृश्याची त्यांनी माझ्याकडून चांगली तालीम करून घेतली,” असा आपला अनुभव नायिका अवनीत कौरने सांगितला.

Share this article