Close

वैशिष्टयपूर्ण अभिनयाने आपल्या नावाचा ठसा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची प्राणज्योत मालवली (Marathi Actress Seema Deo Passed Away)

मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वाची मोठी हानी झाली आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सीमा देव यांना अल्झायमरचा त्रास सुरु झाला होता. सीमा यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत आई लवकर बरी होऊ दे यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं होतं. परंतु त्यांची गंभीर आजाराशी चाललेली झुंज आज अपयशी ठरली. गेल्या काही काळापासून सीमा त्यांच्या मुलासोबत मुंबईतील वांद्रे येथे राहत होत्या.

सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. अन्‌ अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुलं आहेत.  मराठी चित्रसृष्टीतील अतिशय सोज्वळ तारका म्हणून सीमा देव यांनी लौकिक मिळवला होता. १९५७ साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा देव यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले. सुरुवातीला सोज्वळ, सालंकृत, निरागस अशा नायिकेच्या भूमिका त्यांनी केल्या. ‘जगाच्या पाठीवर’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपल्या सहज अभिनयाची छाप उमटविली. पुढे त्या सिनेमातील नायक-नायिकांच्या ताई आणि आई झाल्या. अन्‌ त्या चरित्र भूमिकांमधून देखील त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली.

चित्रसृष्टीत पदार्पण केल्यावर रमेश देव यांच्याशी त्यांची जोडी जमली. दोघे विवाहबद्ध झाले. त्यानंतर मात्र फक्त रमेश देव ज्या चित्रपटात असतील, त्यामध्येच कामे करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रमेश देव सोबत त्यांनी ‘लग्नाची बेडी’, ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकांमध्ये देखील भूमिका केल्या. या नाटकांचे शेकड्यांनी प्रयोग त्यांनी केले.

रमेश देव यांच्यासोबत सीमा यांनी हिंदी चित्रसृष्टीत पदार्पण केले. अन्‌ तिथे आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी चरित्र भूमिका गाजविल्या. त्यांच्या ‘तीन बहुरानियां’, ‘आनंद’, ‘दस लाख’ आदी हिंदी चित्रपटातील भूमिका गाजल्या. ‘आनंद’ मधील कॅन्सर पीडित नायकाच्या मानलेल्या बहिणीची त्यांची भूमिका आजही रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

त्यांची एक विशेष आठवण म्हणजे शूटिंग दरम्यान वेळ मिळेल तेव्हा कलाकार पत्ते खेळतात, झोपतात. मात्र सीमाताई आवडीने "चांदोबा" हे मुलांचे मासिक वाचायच्या. २०१७ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Share this article