Marathi

दंतदुःख (Short Story: Dantdukha)


-प्रियंवदा करंडे.


“अरे अरे, थांबा ना! मला चहा तरी द्या कुणी एकीने! जरा आराम करायचाय् तर काय हा तमाशा?” राजन शेवटी सर्व गोष्टी असह्य झाल्यामुळे चिडून ओरडला


अग आई आई ग!” आपल्या उजव्या गालांवर हात ठेवत विनीता विव्हळली.
“काय झालं ग?” राजनने काळजीने विचारलं. तो नुकताच ऑफि सातून आला होता. कपडे बदलत होता. पण लाडक्या बायकोचं विव्हळणं ऐकून तो गडबडला. विनीताला मोठ्या प्रेमाने जवळ घेत त्याने कळवळून विचारलं, “विनी, काय होतंय? बोल ग सोने!”
“अरे, अरे… किनई माझी दाढ ठणकतेय्!” विनिता मोठ्या कष्टाने म्हणाली. तसा अधिकच भावुक स्वरात राजन म्हणाला, “अरेरे! काय हे देवा ! इतक्या नाजुक मुलीला हे असं दाढदुःख देऊ न तू तिला काळाच्या दाढेत का ढकलतोस रे? त्यापेक्षा तिचं दुःख तू जगात इतकी माणसं आहेत, त्यांच्यापैकी कुणाला का बरं पास ऑन करत नाहीस?” त्याचं हे वाक्य संपत न संपत तोच “अरे देवा रे देवा!” अशी किंकाळी त्याला ऐकू आली.
“आता कोण ओरडलं विनी?” राजनने आश्चर्याने विचारलं. “कोण काय? हा सासूबाईंचा आवाज आहे!” विनी फ णकारून उत्तरली. तोच सासूबाई-कमलाबाई त्यांच्या बेडरूममध्ये आल्या.
“अरे राजन माझा हा दात फार दुखतोय रे!” त्या विव्हळत म्हणाल्या. “म्हणजे देवाने माझी प्रार्थना ऐकली?” तो पुटपुटला.
“अहं माझी दाढ ठणकतेय् रे अजून!” विनीताने उत्तर दिलं. “आणि माझा दात दुखतोय रे राजन्!” कमलाबाईंनी त्याला पुन्हा आठवण करून दिली.
“अग आई वयाप्रमाणे दात, गुडघे, सांधे दुखणारच! त्याचं काय एवढं?” राजन काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.
”छान! बायकोची दाढ दुखतेय त्याचं एवढं स्तोम ! अरे, एवढ्या 23-24 वर्षात तुझ्या बायकोची दाढ दुखतेय, यावरून तिची तब्येत किती खराब आहे हे तुझ्या लक्षात नाही का येत? चांगलं खडसवायचं तिला की, “दात नीट घास ! दोन वेळा ब्रश कर! खळखळून चूळा भर… उगाच दातावर डॉक्टरांची बिल भरण्याचा खर्च मी करणार नाही… तर तुझं आपलं उलटंच!” कमलाबाई तावातावाने म्हणाल्या.
“अग आई, दात दुखतोय ना तुझा? मग जरा तोंडाला आराम दे!” राजनने आईला तिच्या दुखर्‍या दाताची आठवण करून दिली.
“किती रे बाईलवेडा तू! अरे, काम करायला नको ना म्हणून ती अशी थेरं करते, दाढ दुखण्याची!” कमलाबाईंनी सुनेला एक टोमणा मारला.
तशी चवताळून विनीता म्हणाली, ”अरे राजन चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक असतात. तुझ्या आईला कामं कशी चुकवायची याचे बरेच रस्ते माहित आहेत तर!“
”फार लांब जीभ झालीय् तुझी विनीता! अग सासू आहे मी तुझी! तुझ्या नवर्‍याची आई!”
“माहिताय् मला! नवर्‍याच्या आईला सासू म्हणतात हे तुम्ही नका सांगू ! तेवढी अक्कल आहे मला!”
“तेवढीच नाही! नको तेवढी आहे! अग तुझ्या वयात मी अक्रोड दातांनी फोडून खायचे! जरदाळू फोडून त्यातील बी देखील दातांनी फोडून खायचे! कळलं?”
“तुम्ही नारळ जरी दातांनी फोडून
खायचे असं सांगितलं ना तरी देखील माझ्यावर काही एक परीणाम होणार नाही!” कुत्सित हसत विनीता म्हणाली.
“कसा होणार? नर्मदेतला गोटा तू म्हणजे! त्याच्यावर कसला परीणाम होणार?” कमलाबाईंनी मुंहतोड जवाब दिला.
“अरे अरे, थांबा ना! मला चहा तरी द्या कुणी एकीने! जरा आराम करायचाय् तर काय हा तमाशा?” राजन शेवटी सर्व गोष्टी असह्य झाल्यामुळे चिडून ओरडला.
“छान म्हणजे मी तमाशा करते?” कमलाबाईंनी घसा फोडून विचारलं. “बोल ना, बोल ना, मी करते का तमाशा?”
“मी म्हटलं का असं?” राजनने हताशपणे विचारलं. “वा! म्हणजे मी तमाशा करतेय, असंच ना?” विनिताने डोळे वटारत त्याला जाब विचारला.
“अरे काय चाललंय् हे? अरे सुशिक्षित आहोत ना आपण? काय गावठीपणा चाललाय् घरात? कुणी ऐकलं तर काय म्हणेल?” राजन परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत म्हणाला.
“काय म्हणणार? कमलाबाईंना भांडकुदळ सून मिळाली हो असा डांगोरा पिटणार सगळे!” दात चावत कमलाबाई ओरडल्या.
“मी भांडकुदळ? वा! अहो, सगळ्यांना माहित आहे की, मी चांगल्या संस्कारक्षम आईवडिलांची मुलगी आहे, समजुतदार आहे, चांगल्या वळणाची आहे आणि मुळातच स्वभावाने गरीब आहे….” विनीता हसत हसत म्हणाली.
आपली आई घसा खरवडून ओरडतेय् तरीही आपली सुंदर, तरुण बायको शांत, मृदु स्वरात सुंदर भाषेत बोलतेय् हे पाहून राजनच्या मनात विनीताबद्दल इतका आदर निर्माण झाला की, तो एकदम म्हणाला, “अग विनी, किती छान बोलतेस ग तू! वाटतं तू असंच बोलत रहावंस नि मी असंच ऐकत रहावं! सगळ्यांना माहित आहेच ग तू किती लाघवी आहेस ते!”
“इश्य्!” म्हणत विनीता त्याच्या जवळ सरकली तोच कमलाबाई डाफरल्या, “अरे राजन, अरे ए बैलोबा, ठोंब्या, अरे अगदीच कसा रे तू बोटचेप्या! किती मूर्ख! ती गोड बोलून शांतपणाचं नाटक करतेय् आणि तू माना डोलावतोयस! अरे, तिचे आईवडील म्हणे तिच्यासमोर शरण आलेत! त्यांच्याबरोबर पण ही भांडते!” कमलाबाई देखील कमी नव्हत्या. त्यांनी लगेच डाव उलटवला.
“काय? ही आपल्या आईवडिलांशी भांडते?” राजनने आश्चर्याने विचारलं.
“खोटं! साफ खोटं! तुझी आई खोटारडी आहे!” विनीता ओरडली.
“मी खोटारडी? अग अख्खी दुनिया मला ओळखते.”
“माहिताय्! खोटारडी म्हणूनच ओळखते. अरे राजन, तुझ्या माझ्यात फूट पाडायला तुझी आई असा आरोप करतेय्!”
“मी? मी फूट पाडतेय्? अग तूच माझ्या मुलाला तोडलंस माझ्यापासून!” कमलाबाई आता रडक्या सुरात बोलू लागल्या.
“अग, अग आई, ए विनी, जरा ऐका! मी म्हणतो, तुम्ही दोघी जरा डेंटिस्टकडे जायचं बघा ना! अरे तुमचे दात दुखतायत ना? आई निघ, डेंटिस्टकडे जा!” राजन वैतागून म्हणाला.
“हो बाबा! जाते! काय ग विनी, पण तू कुठल्या डेंटिस्टकडे जाणार? की येतेस माझ्याबरोबर?”
“का? घाबरता का एकट्या जायला?” विनीने खट्याळपणे विचारलं. आणि मी का येऊ तुमच्या डेंटिस्टकडे? किती म्हातारे आहेत ते!” विनी नाक मुरडत म्हणाली.


“बघ रे बाबा! राजन! तुझ्या बायकोला डेंटिस्टही तरूण, देखणा हवाय!” कमलाबाई पुन्हा टोमणा मारत उद्गारल्या.
“बरं का राजन, मला मॉडर्न टेक्निकस् येणारा डेंटिस्ट हवाय्, यू नो कॉस्मेटिक डेंटिस्ट! त्याचं काय आहे ना राजन, मी तरुण आहे ना! मग? तुझ्या आईंना काय जुनापुराणा दंतवैद्य बरा!” विनीताने लगेच कमलाबाईंना टोमणा परतवून लावला.
आता मात्र कमलाबाई चिडल्या. त्या दातओठ खात म्हणाल्या, “अग, कशी बोलतेस ग तू? काही मानमर्यादा ठेवायची अक्कल आहे की नाही?” तशी विनीताही दात चावत ओरडली,
“कुणाची अक्कल काढता? कुणाची?
माझ्यासारख्या डब्बल ग्रॅज्युएट मुलीची? कॉलेजचं तोंड तरी पाहिलंत का तुम्ही?”
“ए,ए इंटरपर्यंत शिकलेय् मी! पुढेही शिकले असते… पण मागणी पडली ना, लगेच लग्न झालं! माझ्या सुंदर दातांवर भुलले ग तुझे सासरे! कळलं?”
“हो का? वाटतं तुमचे ते दात पाडून टाकावेत!”
“अस्सं थांब तुझी ती दाढ उपटते.” असं म्हणून दोघीही एकमेकींच्या गालावर चापट्या मारू लागल्या आणि बघता बघता एकीची दाढ नि दुसरीचा दात पटकन बाहेर पडला. तशा दोघी गांगरल्या.
“अरे राजन, अरे माझा दात पाडला रे तुझ्या बायकोने!” कमलाबाई वैतागून ओरडल्या.
“आणि माझी दाढ तुटली बघ, तुझ्या आईनेच पाडली.” विनीता ओरडली.
“चला बरं झालं! डेंटिस्टकडे जायलाच नको! आता मला चहा आणा.” राजन सुस्कारा सोडून म्हणाला. दोघीही चरफडत स्वयंपाकघराकडे वळल्या.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli