- चित्रा वाघ
पोतनीस पती-पत्नीचा व्यग्र दिनक्रम, त्यांचा आठ वर्षांचा मुलगा विराज, त्याचा हट्टी स्वभाव, एकटेपणा, मुलगी दत्तक घेण्याची त्यांची इच्छा… वगैरे गोष्टी मी आधीच त्यांना फोनवर सांगितल्या होत्या. आता त्यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली होती.
“मॅडम आपल्याला पोहोचायला अजून अर्धा तास तरी लागेल. आत्ताच साडेदहा वाजलेत. त्या मोकाशीबाईंना फोन करूया का?” पोतनिसांनी ड्रायव्हिंग करताना मला विचारलं.
“नको. त्यांना या ट्रॅफिकची तशी कल्पना आहे आणि त्या संध्याकाळपर्यंत तिथेच असतात.
माझं सकाळीच बोलणं झालंय त्यांच्याशी.”
“तुम्ही त्यांना पूर्वीपासूनच ओळखता?”
मिसेस पोतनिसांनी विचारलं.
“हो. त्यांची आणि माझ्या आईची जुनी मैत्री. रेणूमावशीच म्हणते मी त्यांना. गेली पंचवीस वर्षं त्या स्नेहालयात काम करतायत. अगदी तान्ह्या बाळांपासून बारा वर्षांपर्यंतची मुलं इथे राहतात. त्यानंतर बदलापूरला याच संस्थेचा आश्रम आहे. त्यांना तिथे पाठवतात. सगळीच मुलं अनाथ आहेत असं नाही, काही अगदी गरीब घरांमधलीसुद्धा आहेत. मोकाशीबाई सांगतीलच सविस्तर. मुलांना सांभाळण्याचा खूप अनुभव आहे त्यांना. माझ्याकडे काही क्रिटिकल इश्यूज आले की मी त्यांनाच कन्सल्ट करते.”
आमचं बोलणं चाललं होतं, इतक्यात पोतनिसांनी कचकन् ब्रेक दाबला. एक तरुण मुलगी आपल्याच तंद्रीत रस्ता क्रॉस करत होती. तिचं गाडीकडे लक्षच गेलं नाही.
“काय ही कॉलेजमधली मुलं! एकटी असली तरी आपल्याच नादात आणि घोळक्याने चालत असली तरी तेच.” त्यांनी वैतागत म्हटलं.
“तुम्ही गाडी जरा हळूच चालवा हं. या रस्त्यावर नेहमीच मुलांची वर्दळ असते. काय करणार? काही मुलं असतातच अशी. आपणच त्यांना सांभाळून घ्यायला हवं.” मी अजून मान मागे वळवून त्या मुलीकडेच बघत होते.
पोतनीस मात्र बराच वेळ आजकालची तरुण मुलं, याच विषयावर बोलत होते. थोड्या वेळाने डावीकडे बाण दाखवणारा स्नेहालयाचा फलक दिसला. आमची गाडी वळून एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली थांबली.
आज सुट्टीचा दिवस असल्याने बरीच लहान मुलं खेळत होती. त्यातल्याच एकाने पुढे होऊन ‘कोणाला भेटायचंय?’ असं विचारलं. मोकाशीबाईंचं नाव ऐकताच आमच्या पुढे धावत तो ऑफिसमध्ये वर्दी द्यायला गेला.
शांत, सावळ्या चेहर्याच्या, काहीशा स्थूल रेणूमावशी ऑफिसच्या दारापाशी आल्या.
मी ओळख करून दिली. पोतनीस पती-पत्नीचा व्यग्र दिनक्रम, त्यांचा आठ वर्षांचा मुलगा विराज, त्याचा हट्टी स्वभाव, एकटेपणा, मुलगी दत्तक घेण्याची त्यांची इच्छा… वगैरे गोष्टी
मी आधीच त्यांना फोनवर सांगितल्या होत्या. आता त्यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली होती. आता त्या तिघांनी एकमेकांशी सविस्तर बोलणं गरजेचं होतं.
“तुमचं बोलणं होऊ दे. मी बाहेर थांबते.” असं म्हणून मी मागच्या व्हरांड्यात निघून आले.
मैदानात लगोरीचा खेळ रंगात आला होता. वरच्या मजल्यावरच्या तान्ह्या मुलांच्या खोल्यांमधून रडण्याचा आवाज येत होता.
बर्याच दिवसांत तिथे फेरी मारली नव्हती. आता थोडी मोकळीक होती, म्हणून व्हरांड्यातून वरच्या मजल्यावर गेले.
समोरच्या मोठ्या हॉलमध्ये दोन वर्षांपर्यंतची रांगणारी, धरून धरून चालणारी मुलं खेळत होती. दोन सेविका त्यांच्यात रंगून गेल्या होत्या. आतमधल्या खोलीत पाळणे ठेवलेले होते. तिथल्या राधाबाईंनी मला ओळखलं आणि लांबूनच हसल्या. कडेवरच्या बाळाला थोपटत त्या काहीतरी गुणगुणत होत्या.
मला त्यांच्या कडेवरचा तेव्हाचा अश्विन आठवला. मन एकदम दहा वर्षं मागे गेलं. लाल रंगाचं झबलं घातलेला, अंगानं बारीक, पण खेळकर अश्विन! पाच महिन्यांचा होता तेव्हा. डॉक्टरांनी तो सुदृढ असल्याची खात्री दिली होती. ते सर्टिफिकेट हातात घेऊनच रेणूमावशी माझ्याबरोबर याच दरवाजापाशी उभ्या होत्या. मी आणि दिनेश, दोघंही अतिशय भांबावलेल्या आणि विमनस्क अवस्थेत होतो. राधाबाई अश्विनला घेऊन पुढे आल्या आणि त्याने माझ्याकडे बघत हात पुढे केला.
बास्स! तोच तो क्षण! मनाने त्याच्या बाजूने कौल दिला. आमच्या विस्कटलेल्या, रखरखीत आयुष्याला फुलवू शकेल, सावरू शकेल असा हा एकच आधार वाटला तो, त्या क्षणी.
मन आतल्या आत निकिताच्या नावाने आक्रंदत होतं. मला तो आवेश सहन झाला नाही. मी धावतच खाली उतरले. रेणूमावशी आणि दिनेश माझ्या मागोमाग आले. दिनेशची अवस्थाही फारशी वेगळी नव्हती. फार सोसलंत रे तुम्ही दोघांनी! असं काहीतरी म्हणत रेणूमावशी माझ्या पाठीवरून हात फिरवत होत्या. सगळं काही कालपरवाच घडल्यासारखं वाटत होतं.
इतक्यात पर्समधला मोबाईल वाजला आणि
मी भानावर आले. पलीकडून आई बोलत होती. “अगं अश्विन अजून घरी आला नाही. तुला सांगून गेला होता का?”
“अगं, मी तुला म्हटलं ना तो पूर्वाकडे खेळायला जायचाय. तिथेच जेवून संध्याकाळी येणार
आहे घरी.”
“हो गं बाई, साफ विसरले बघ आणि रेणू भेटली का? काम झालं?”
“त्या पोतनिसांशी बोलतायत. निघू आम्ही थोड्या वेळाने. चल, ठेवते.” मी फोन बंद केला. सहज माझ्या मनात आलं, आई इथे आमच्याकडे वाशीला राहायला आली, त्यामुळे किती सुख झालंय. आता अश्विनची मला काही काळजी नाही. खरंच, गेल्या दहा-बारा वर्षांत किती उलथापालथ झाली माझ्या आयुष्यात. एक-एक काळच असा येतो की आपण परिस्थितीला पूर्णपणे शरण जातो. टाकलेलं प्रत्येक दान उलटंच पडतं. आमचं घर तेव्हा गोरेगावला होतं आणि फॅक्टरी तळोजाला. दिनेशची आणि माझी नुसती फरफट होत होती. त्यातच माझ्या बाबांचं आजारपण. कितीदा समजावायचे मी माझ्या घरी चला म्हणून, पण नाही. वयाबरोबर हट्टीपणा वाढतच चाललेला. सगळीकडून शेवटी कोंडी झाली माझी. फॅक्टरीच्या कामात लक्ष घालू,
की निकिताकडे बघू, की बाबांची काळजी घेऊ?
निकिता! अवघ्या तेरा-चौदा वर्षांची होती.
ज्या वयात तिला माझी गरज होती, त्याच वेळी एकटी पडली. अगदी एकटी. घरकामाच्या बाई मला सांगायच्या, “ती जेवत नाही. सारखी फोनवर बोलत असते. रडते. किती बारीक झालीय. तिच्याकडे लक्ष द्या.”
मी अनेकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उदास वाटली, पण वाटलं या वयात होतं असं कधी कधी. मी माझ्या व्यापातून जरा मोकळी झाले की तिच्या बरोबर राहीन. पण इथेच माझं चुकलं. निकिता आपल्या कोषातून बाहेर पडलीच नाही. माझी नाजूक कळी फुलण्याआधीच कोमेजून गेली.
मला न सांगता घराबाहेर पाऊलही न टाकणारी माझी मुलगी, आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेऊ शकते, या गोष्टीवर माझा आजही विश्वास बसत नाही.
निकिताचं एकटेपण अश्विनच्या वाट्याला आलं नाही. असो!
प्रयत्नपूर्वक मी लक्ष दुसरीकडे वळवलं. गेटजवळच ते माझ्या आवडीचं निरगुंडीचं झाड दिसलं. त्याची कोवळी, हिरवी पानं, फांद्यांच्या टोकावरचे नाजूक निळसर तुरे वार्यावर छान झोके खात होते. इतक्यात रस्त्यावरनं एक ट्रक आला. त्याच्या धक्क्याने थोडी पानं ओरबाडली गेली. झाडाच्या अर्ध्याअधिक फांद्या बाहेरच्या बाजूने खाली रस्त्यावर झुकल्या होत्या. त्यांच्यावरची पानं अशीच झडून गेली होती. नुसत्या काटक्या उरल्या होत्या. रेणूमावशींचे तेव्हाचे शब्द माझ्या कानात घुमू लागले.
“हे झाड पाहिलंस नीला, औषधी आहे म्हणून लोक वाट्टेल तशी पानं ओरबाडतात. येणार्या-जाणार्या गाड्यांना घासून फांद्या तुटतात. पण तरी ते खचत नाही. तसंच ताठ उभं आहे, आघात सहन करत. पुनःपुन्हा नवी पालवी येते, नवे धुमारे फुटतात. आपणही या झाडांकडून खूप काही शिकायचं असतं.”
खरंच, त्या शब्दांनी मला केवढी उभारी दिली. आयुष्याकडे बघण्याची नवी दृष्टीच जणू मिळाली. रेणूमावशींबद्दलच्या कृतज्ञतेने माझे डोळे भरून आले.
एवढ्यात एक मुलगा मला शोधत आला.
“मॅडम तुम्हांला मोकाशीबाई बोलावतायत.”
मी ऑफिसमध्ये गेले. पोतनिसांच्या चेहर्यावर समाधान दिसलं. “ये नीला, बस.” रेणूमावशी म्हणाल्या.
“तुझ्याकडून समजलंच होतं. पण आत्ता आमच्या छान गप्पा झाल्या. विराजबद्दल आम्ही बोललो. सात-आठ वर्षांच्या मुलाच्या वागणुकीवर काही शिक्कामोर्तब करणं चूकच आहे. पण दुसरं मूल दत्तक घेतल्याने तुमचे प्रश्न नक्कीच कमी होतील,” असं मला वाटतं.
“पण तुम्ही पुन्हा विचार करा. घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. वाटल्यास तुमच्या विराजला इथे घेऊन या.”
“हो. आम्ही विचार करू. या नीलाताई तर गेलं वर्षभर आमच्या सतत संपर्कात आहेत. त्यांनीच विराजच्या वागण्यातला बदल शाळेत नोटीस केला. त्यांच्या काऊन्सिलिंगमुळे आता तो बराच बदललाय. पुढल्या वेळी आम्ही त्याला बरोबर घेऊनच येऊ.” मिसेस पोतनीस मनापासून बोलत होत्या.
“तुम्ही व्हा पुढे. मी आलेच.” असं म्हणून मी मावशींशी बोलायला थांबले.
“कशी आहेस नीला? आणि आमचे अश्विनशेठ काय म्हणतायत?” रेणूमावशी माझ्याजवळ येऊन म्हणाल्या.
“आम्ही सगळे अगदी मजेत आहोत. या शाळेतल्या काऊन्सिलरच्या नोकरीत तर मी इतकी रमलेय. खरं सांगू? प्रत्येक केस मला जगण्याचं बळ देते. मुलांच्या वाढत्या वयात त्यांना समजून घेणं, त्यांना छान आकार देणं यात वेगळंच समाधान मिळतं. निकिताच्या बाबतीत जे घडलं, ते कुणाच्याही बाबतीत घडायला नकोय मला. पण मावशी त्या वेळी जर तुम्ही दिशा दाखवली नसती, तर मी कुठे भरकटत गेले असते कुणास ठाऊक!”
“तसं काही नाही गं. मी फक्त निमित्त झाले. शेवटी प्रत्येकाला स्वतःच सावरावं लागतं.
ये पुन्हा कधीतरी.”
त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडले. गेटजवळच्या त्या निरगुंडीच्या झाडाजवळच पोतनीस पती-पत्नी उभे होते. इतरही तीन-चार मुलं काहीतरी करत होती.
“काय झालं? काय बघताय?” मी विचारलं.
“ही नवीन रोपं लावतायत.” मिसेस पोतनीस कौतुकाने न्याहाळत होत्या.
“काय लावताय रे?” मी त्या मुलांना विचारलं.
“बाई ही मधुमालतीची वेल आहे. भराभर वाढतेय. पण कोपर्यात जवळ कसलाच आधार नाही, म्हणून बाईंनी या झाडाजवळ ती लावायला सांगितली.”
त्यांचं काम पूर्ण होईपर्यंत आम्ही तिथेच थांबलो आणि मग निघालो. तेही तेच दृश्य डोळ्यांत आणि मनात साठवत.