Marathi

मी कात टाकली (Short Story: Me Kat Takali)

  • दिगंबर गणू गावकर

  • तिला बाहुपाशात घेणं तर सोडाच, मनोभावे कधी तिच्या डोईत साधा गजराही माळता आला नाही. तीही आजवरच्या प्रथे-परंपरेप्रमाणे हातभर अंतर राखूनच वागली. सिनेमातलं, नाटकातलं, कथा-कादंबरीतलं आणि विशेषतः मनातलं मनातच कोंडून राहिलं. तिच्याही मनाचा पदर खोचलेलाच राहिला. माझ्या अंगाने कधी उडालाच नाही.

  • मी, वयाची अठ्ठावन्न वर्षं पूर्ण करून सेवानिवृत्त झालो, त्याच वेळी मीनलने एकावन्नाव्या वर्षात पदार्पण केलं. आमच्या लग्नाची तीस वर्षं विना खळखळ गेली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोन-दोन वर्षांच्या फरकाने दोन मुली झाल्या. त्यांचं लालनपालन, शिक्षणही हसतखेळत झालं. एकविसाव्या शतकाचं वारं लागलेल्या मुलींनी वडिलांच्या चपलांचे जोड झिजू दिले नाहीत. एकीने पंजाबी,
    तर दुसरीने मद्रासी नवरा केला. त्यांच्या या निर्णयाच्या बाबतीत मीनलने खळखळ केलीच…
    “अहो, त्यांना समजावा. काय कळतंय त्यांना यातलं. उद्या काय बरं-वाईट झालं, तर! काही करून त्यांनी हात वर केले तर…! समाज काय म्हणेल, आपल्याला तोंड वर करायला जागा तरी राहील का?”
    पण मी सगळं निभावून नेलं. दोघींच्या लग्नाच्या होड्या दोन्ही बाजूने वाहवत, सुखरूपपणे तडीला नेल्या… आणि आज नोकरीची नैया नदीपार झाली होती.
    आजपर्यंत संसाराच्या धबडग्यात आणि त्यासाठी लागणार्‍या पैशाच्या अति विचाराने, श्रमाने, स्त्री-सुख काय असतं, ते किती परिपूर्ण अंगाने घ्यायचं असतं, ते राहूनच गेलं होतं. मुलांना समज येईपर्यंत आईवडील, भावंडं घरात होती. भावंडांची लग्न झाली, आईवडील गेले तोपर्यंत मुली मोठ्या झाल्या होत्या. त्यामुळे प्रणय कधी फुललाच नाही. तिला बाहुपाशात घेणं तर सोडाच, मनोभावे कधी तिच्या डोईत साधा गजराही माळता आला नाही. बरं तीही आजवरच्या प्रथे-परंपरेप्रमाणे हातभर अंतर राखूनच वागली. सिनेमातलं, नाटकातलं, कथा-कादंबरीतलं आणि विशेषतः मनातलं मनातच कोंडून राहिलं. तिच्याही मनाचा पदर खोचलेलाच राहिला. माझ्या अंगाने कधी उडालाच नाही.
    मात्र या दोन-तीन वर्षांत तिच्या बाह्यरूपात खूपच फरक पडला होता. बरीच समज आलेल्या मुलींनी आपल्या आईचं देखणं रूप तिला दाखवलं होतं. माझ्याही नजरेचा हात त्यावरून फिरत होता. तिच्या चेहर्‍यात, केस रचनेत, ब्लाऊज-साडीत आमूलाग्र बदल घडला होता. शाम्पू, फेशियल, फेस क्रीम, बॉडी लोशन यांची रेलचेल मुलींमुळे वाढली होती. आणि त्यांनी त्यांचं महत्त्व आईच्या मनावर नि अंगावर ठसवलं होतं. धक्का दिल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही म्हणतात, तसंच तिला दिल्या धक्क्याने तिची ऊर्मी परत जागी झाली होती. तिने तिला तिचं रूप दाखवलं होतं. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाबरोबर झालेल्या लग्नाने ती दबून गेली होती. मात्र त्याबाबत कधीच आग्रही नव्हती.
    याउलट माझी अवस्था झाली होती. रुबाब तोच असला तरी, कण्याला किंचित बाक आला होता. केसांनी आपला रंग सोडला होता. नव्हे केसांनी आपला तळ उठवल्यामुळे त्यावरून आता सूर्यकिरणं परावर्तित होऊ लागली होती. मुळात सुमार असलेल्या माझ्या चेहर्‍याने आता उग्र रूप धारण केलं होतं. आम्ही बरोबरीने प्रवास करताना मला माझाच हेवा वाटत होता. तिच्याकडे लोकांनी वळून पाहिलं की, मन आनंदून जात होतं.
    आताशा घरात आम्ही दोघंच होतो…
    मी स्वयंपाक घरात गेलो… ती स्वयंपाक करण्यात मग्न होती… बराच वेळ तिच्या पाठमोर्‍या शरीरावरून नजर फिरवीत राहिलो. तिला कवेत घ्यावं म्हणून सरकलोही, तर तिने मागे वळून पाहिलं.
    “काय हो, काही हवंय का?” खरं म्हणजे तिने विचारलंही होतं मला… पण माझ्या मनात होतं, ते तिला अभिप्रेत नव्हतं आणि म्हणून “काही नाही… काही नाही”, म्हणत मी माघारी वळलो… लहानपणी गोष्टीत वाचलं होतं… सात नद्या, सात डोंगर पार केल्यावर इच्छित वस्तू मिळते. तेव्हा गंमत वाटायची, पण आज मला त्याची सत्यता तीव्रतेने जाणवली. मला माहीत होतं, ती माझी हक्काची बायको होती. माझ्या दोन मुलींची आई होती. आम्ही एका बेडवर झोपत होतो. मग कोणतं बंधन आड आलं होतं? की तिची अपेक्षा होती की, मी तिचं कौतुक करावं, तिच्या शरीरावरून शब्दांचं मोरपीस फिरवावं. असा तर्क मी उगाचच काढत होतो. खरं म्हणजे, सध्याचं तिचं रूप पाहून मलाच वाटत होतं… पण भीतीही वाटत होती… ‘या माणसाला म्हातारचळ लागलेत’, असं ती म्हणेल म्हणून… मनाला चाळा लागला?… तिच्या संबंधात प्रश्‍न मी स्वतःच निर्माण करत होतो आणि त्याची उत्तरही मीच देत होतो… तिच्या नकारात्मक प्रतिक्रियेची धास्तीच घेतली होती मी जणू! तिची स्तुती करण्याचं, तिला विचारण्याचं धाडसच होत नव्हतं… ती आणि मी दिवसरात्र एकत्र असूनही! जणू वयाने माझं धाडस, शक्ती हिरावून घेतली होती.
    आणि ती घटना घडली. मित्र, विनयसोबत बाईकच्या मागे बसून चाललो होतो नि एका टेम्पोने धडक दिली. माझ्या गुप्तांगाला मार बसला. हॉस्पिटल झालं… औषधोपचार झाले… या दरम्यान बायकोच्या मदतीला विनय होता. बराही झालो. पण डॉक्टरांनी जे सांगितलं, ते ऐकून खर्‍या अर्थाने सर्द झालो. सगळं उपभोगून झालं, तरी माणसाला आंतरिक ऊर्मी टोचणी देत असतेच. त्याचा विस्फोट तारुण्याइतका होत नसला, तरी बर्‍याच वेळाने माळेतली एखादी धुमसणारी लवंगी फटाकी फुटावी, तसा होतोच. हे सगळं होण्याची शक्यताच संपल्याचं सांगितलं होतं. दिवसेंदिवस झेंडूच्या फुलासारखं पाकळीन् पाकळी फुलणार्‍या बायकोकडे असहायपणे पाहत होतो. प्रणयाच्या बाबतीत अलिप्तपणे राहणारा… किंबहुना संभोग याच क्रियेला महत्त्व देणारा मी, आता खर्‍या मोकळ्या वेळाने, बायकोच्या सौंदर्याने प्रणयग्रस्त होऊ लागलो होतो. वयामुळे ते व्यक्त करण्यास संकोच वाटत होता. आता तर ते जीवनातूनही निसटून गेलं होतं. आणि चक्रीवादळात पिळवटलो, अग्नी प्रकोपात होरपळलो… जो मित्र माझ्या आजारपणात मदतीला आला, तो अद्यापही माझ्या चौकशीच्या निमित्ताने घरात येत होता. आपल्या उपकारकर्त्याला दूषण देणं, हा कृतघ्नपणा होता… परिस्थितीकडे डोळेझाकही करता येत नव्हतं.

  • “भावोजी, पोहे घ्या”, ती म्हणाली… पोहे दिले आणि स्वयंपाकघरात जायला वळली.
    “आहाहा!” विनयच्या या आश्‍चर्योद्गाराने ती मागे वळली. “वहिनी, पोहे खावेत तर तुमच्या हातचे.”
    मी पाहिलं. ती मोहरली… त्याच्याकडे बघत राहिली.
    “प्रसाद, तू लकी रे बाबा. अशी सुगरण बायको मिळाली.”
    मीनल घरात गेली अन् चहा घेऊन आली.
    “प्रसाद, तुझ्या तोंडात चहाची चव जेवणापर्यंत राहत असावी.” हे ऐकून तिच्या गालावर हसू फुललं. माझ्या नजरेतून ते सुटू शकलं नाही.
    “तू भाग्यवान रे, असली सुगरण, देखणी बायको…” हे वाक्य त्याने असं फेकलं की, बरी न होणार्‍या जखमेवर बिब्ब्याचा डाग दिल्यानंतर होणारी तगमग, असह्य वेदना व्हाव्या, तसं वाटलं… त्यात मानभावीपणा होता… माझी स्तुती वाटावी असंही होतं. त्याने एका शरातून दोन पक्षी घायाळ केले होते. माझ्या शरीरातील रक्त उसळवलं होतं आणि
    त्याच वेळेला माझ्या बायकोच्या गालावर रक्तिमा फुलवला होता.
    आतासा मी हिंडू फिरू लागलो होतो. पायाला झालेल्या जखमाही भरून आल्या होत्या… पण, ही वेगळीच जखम ठुसठुसू लागली होती… दिवसेंदिवस चिघळू लागली होती. माझा उपकारकर्ता मित्र, विनय माझ्या चौकशीच्या निमित्ताने नित्यनेमाने घरी येत होता. माझ्यावर स्तुतिसुमने उधळत होता. स्तुतिसुमनं माझ्यावर उधळली जात असली तरी, ती सत्यभामेच्या दारात पडण्याऐवजी रुक्मिणीच्या दारी पडत होती… हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं होतं… स्तुती सुमनांचा ओघ प्रत्यक्ष मीनलवरच होऊ लागला होता. त्यात ती पुरती सजली होती. त्याच्या सुगंधाने भारीत झाली होती. या जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी ना कुणा डॉक्टरकडे जाऊ
    शकत होतो, ना कुणाच्या मदतीचं औषध घेऊ शकत होतो… दैवाने माझी विचित्र कोंडी केली होती…
    विचित्र सापळ्यात अडकवून ठेवलं होतं.
    जीवनाच्या अत्यंत नाजूक, तरल अशा बाजूकडे मी कधी गांभीर्याने पाहिलंच नव्हतं. लोकलच्या डब्यात समोरच्या बाकावर बसलेल्या आणि प्रणयात मग्न असलेल्या… जगाचं, स्थळ-काळाचं भान नसलेल्या तारुण्याला मनातल्या मनात लाखोली वाहत होतो… आता निवृत्तीनंतर मिळालेल्या मोकळ्या वेळाने, मोकळ्या संधीने विचार प्रवृत्त केलं होतं. त्या बाजूकडे पाहण्याची ऊर्मी जागृत केली होती. पण वयाने आणि काळाने कोलदांडा घातला होता. त्या तारुण्याइतका उन्मुक्त, उत्स्फूर्त प्रणय तर सोडाच, विचारही विचार करायला लावत होता. पण आता निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पाहून त्या विचारावर प्रश्‍न करून मीच दिलेली उत्तरं किती निरर्थक होती,
    हे दिसून आलं होतं.
    त्याने जरी एका शरात दोन पक्षी घायाळ केले होते, तरी मला तसं करून चालणार नव्हतं. त्या पैकी एक माझा मित्र होता आणि दुसरी होती माझी पत्नी मीनल… दुखणं होतं अवघड जागी! बरं, विनयच्या पत्नीला सांगूनही काही उपयोग नव्हता… माझीच बदनामी माझ्याच तोंडून केल्यासारखं झालं असतं. शिवाय याला बायकोही सांभाळता येत नाही, असंही म्हणाली असती ती किंवा तो तात्पुरता इलाजही ठरला असता, कदाचित! आणि ठरलं… ठरल्याप्रमाणे घडलं, तर एकदाच बदनामी होणार होती. व्यसन, मारपीट, घरातला त्रास नसताना स्त्री जेव्हा विभक्त होते, तेव्हा तिला न मिळणारं स्त्री-सुख हेच प्रभावी कारण असतं. समाजात
    त्याची चर्चाही सुरू होते. माझं ठरल्याप्रमाणे घडलं, तर चर्चेचं कारणच खरं होतं आणि ते मला माहीत होतं. त्यामुळे समाजाला घाबरण्याचं कारण नव्हतं.

  • माझं ठरल्याप्रमाणे मी, माझ्या दोन्ही मुलींना, विनयला आणि त्याच्या बायकोला बोलावून घेतलं… दोन हार, गुच्छ आणले… तोंड गोड करण्यासाठी मिठाई आणली…
    “आज आपणा सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारा दिवस असला, तरी त्याचं आनंदाने स्वागत करूया… धुमसणार्‍या लाकडातून निघणार्‍या धुराने घुसमटत राहण्यापेक्षा त्यावर फुंकर घालून पेटलेल्या आगीचा विधायक उपयोग करूया. मी, तुम्हाला जास्त वेळ बुचकळ्यात ठेवू इच्छित नाही. माझी निवृत्ती… माझा अपघात… त्यात गमावलेलं पुरुषत्व… परिस्थिती व काळ कोणासाठी थांबत नाही. त्या परिस्थितीने निर्माण केलेल्या प्रश्‍नावर मी खूप विचारांती उत्तर शोधलं आहे. त्याचा आपण सर्वांना त्रास होणार आहे. पण, तो तात्पुरता असेल, असं माझं प्रामाणिक मत आहे. माझ्या अपघातात माझ्या या मित्राने मला सर्वतोपरी मदत केली. मी उभा राहिलो, त्याबद्दल त्याचे उपकार न फिटणारे आहेत. त्यात माझ्या पत्नीने मला दिलेली साथ, हे तिचं कर्तव्य असलं तरी तीही मोलाचीच आहे. मात्र त्यातून एक विचित्र गोष्ट घडत गेली. त्यात विनयची वा मीनलची कोणतीही चूक नाही. असलीच तर ती माझीच आहे. मी माझ्या पत्नीला परिपूर्ण स्त्री-सुख देऊ शकलो नाही. तिच्या गुणांची पारख करू शकलो नाही. तिच्या सौंदर्याची स्तुती करू शकलो नाही. घरच्या गुलाबाला वास नसतो आणि ते कधीही तोडता येतं, या भ्रमात मी होतो. पण आता उद्भवलेल्या परिस्थितीने मला याची जाणीव करून दिली. मीनलमध्ये विनय अडकत गेला… मी हे पाहत होतो. असहाय होतो. काय करावं काही सुचत नव्हतं. कुणाला काय सांगणार होतो…? म्हणूनच मी निर्णय घेतला… या परिस्थितीतून मनापासून सुटका मिळविण्याचा… विपरीत काही घडण्याआधी त्या दोघांना एकत्र आणण्याचा. निर्णय जरी विचित्र वाटत असला, तरी तो पुढे आनंददायीच असेल. म्हणून मी त्यांचा विवाह करून देणार आहे. मीनल याचा तुला खूप त्रासही होईल बहुधा, पण मला माफ कर! विनयचं वारंवार येणं, तासन्तास थांबणं, माझ्या डोळ्यावर येत होतं. तो जे तुझ्याबद्दल, तुझ्या गुणांबद्दल, सौंदर्याबद्दल बोलत होता, ते सर्व केव्हापासून माझ्याही मनात होतं. पण मी माझ्या वयाकडे पाहत होतो. पण असलं काही व्यक्त करण्याचं विशिष्ट वय असतं, असं मला वाटत होतं. व्यक्त झाल्यावर विपरीत काही घडणार नाही ना?… तीस वर्षांच्या बिनबोभाट संसारात काही बिघाडी होणार नाही ना? याची सतत भीती वाटत होती. पण हीदेखील एक गरज आहे आणि त्याला वयाचं बंधन नसतं, हे विनयच्या आणि तुझ्या संवादातून मला जाणवत गेलं… त्यामुळे मी माझ्या समजुतीवर चिडलो होतो. पण एव्हाना खूप उशीर झाला होता. सगळंच हातातून निसटत होतं. समाजात होणार्‍या बदनामीला घाबरलो होतो. निर्णयावर येत नव्हतो. वहिनींना काही सांगावं, तर त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला असता का? किंवा त्यातून काही विपरीत घडलं असतं तर?… विनयला काही बोललो असतो, तर कदाचित त्याने आपला मार्ग बदलला असता, स्थळ बदललं असतं आणि मग बोभाटा व्हायला वेळ लागला नसता. मीनलला काही सांगावं तर महाभयंकरही घडू शकलं असतं… तीस वर्षांच्या सहवासानंतर असं काही माझ्या तोंडून ऐकून तिला कदाचित धक्का बसला असता… गेले काही दिवस या सर्वांचा विचार करत होतो. आणि आता या निर्णयावर ठाम झालो आहे. वृद्धाश्रम या संकल्पनेला नावं ठेवता ठेवता, वृद्धपणाच्या वळणावर केव्हाही काहीही घडू शकतं आणि त्याचाच आधार, आसरा घ्यावा लागतो. या प्रकरणातून मीही माझा आधार ठरवला आहे. बाळांनो-”, म्हणत मी दोन्ही मुलींना जवळ घेतलं. सद्गदीत झालो.
    “मला कळतंय तुमच्या मनातील उलथापालथ. तुमचे अश्रू कोणत्या कड्यावर उभे आहेत.” आणि त्यांच्या अश्रूंचा कडेलोट झाला. मी त्यांना थोपटत राहिलो. विचारांती ही गोष्ट मला सोपी वाटत होती. त्या वेळी या जोडलेल्या, जुळलेल्या दुव्यांचा विचारच केला नव्हता.
    हे भडाभडा ओकत असताना कुणाच्याही नजरेला नजर देण्याचं धाडस मी करू शकलो नाही. मात्र आता एकदाच सर्वांवर नजर फिरवली. माझेही डोळे अश्रूंनी भरल्यामुळे अंधुकसं दिसलं, तरी त्यांच्यात मीनल कुठेच नव्हती. माझ्या या निर्णयाने ती कोसळली असावी. मुलींसमोर राहणं तिला असह्य झालं असावं. मी, विनयच्या बायकोकडे पाहिलं. ती सोफ्यावर शून्यात नजर लावून बसली होती. नको तो प्रसंग, नको त्या वयात समोर उभा राहिल्यानंतर आणखी काय होणार? खरं म्हणजे,
    ती कोसळलीच होती. आणि विनय खाली मान घालून पायांचे अंगठे एकमेकांवर उभा घासत होता. आपला मित्र असा काही निर्णय घेईल, हे त्याच्यासाठी कल्पनेपलीकडचं असावं. त्याला वाटलं असावं, असहाय, गलीतगात्र, पुरुषत्व हरवलेला माणूस काय करणार आहे?… शिवाय सामाजिक भीती होतीच. पण, त्याचे सगळे अंदाज कोसळले होते. नको त्या वेळी, नको त्या वयात समजून उमजून बहकला होता. आता कदाचित त्याच्या मनात असंख्य प्रश्‍नांचं तांडव उभं राहिलं असावं… हे त्याच्या पायाच्या अंगठ्यातून प्रतीत होत होतं.
    मी निर्णायक क्षणावर आलो… डोळ्यांत उभा राहिलेला अश्रूंचा पडदा दूर केला. पण कुणीही
    स्वतःच्याही ताब्यात राहिलं नव्हतं, हे माझ्या लक्षात आलं. या विचित्र गोष्टीला कुणाचीही साथ मिळणार नाही, याची एव्हाना मला कल्पना आली होती. पण मला माझं कर्तव्य पार पाडावंच लागणार होतं. मी माझं सारं धैर्य एकवटलं… आत्तापर्यंतच्या प्रसंगाने ते डळमळीत झालं होतं. आणि निर्धारपूर्वक विनयला हाक मारली. त्याने माझ्याकडे करुण पाणावलेल्या नजरेने पाहिलं. त्याच्या डोळ्यांत अपराधीपणाची भावना होती आणि काय होतंय हे कळण्यापूर्वीच त्याने माझ्या पायांवर लोटांगण घातलं. मी त्याला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. महत्प्रयासाने तो उठला आणि घट्ट बिलगला. आम्ही दोघं बराच वेळ त्याच अवस्थेत होतो. त्याची बायको, माझ्या मुली या प्रकाराने अचंबित झाल्या. अवाक् होऊन पाहत राहिल्या आणि त्याने मिठी सोडून हात जोडले.
    “मला क्षमा कर. मी तुझा शतशः अपराधी आहे. हा अपराध नव्हेच, मी पाप केलंय. आणि त्याला क्षमा कर असं म्हणण्याचाही मला अधिकार राहिलेला नाही. पण, तुझे उपकार कसे मानू हेच मला कळत नाही आहे. काही विपरीत घडण्याआधी तू माझे डोळे उघडलेस… याचा परिणाम तुलाच नाही, मलाही भोगण्यापासून वाचवलंस… तुला, मला काय शिक्षा द्यायची आहे, ती देऊ शकतोस. मी त्याच्याही लायकीचा राहिलेलो नाही, याची मला कल्पना आहे तरीही…” आणि पुन्हा तो माझ्या पायावर पडला. मी त्याला उठवला आणि आलिंगन दिलं.
    “मित्रा, तुझी काहीच चूक नाही रे, खरा अपराधी मीच आहे. काही गोष्टी आपण गृहीत धरून चालतो… काही गोष्टीत समोरच्या व्यक्तीला गृहीतच धरलं जात नाही. एकमेकांच्या गरजांचा विचारही करीत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भावनिक पातळीवर सहमत होण्याचा प्रयत्नही करत नाही. ही गोष्टच माझ्या बाबतीतल्या या प्रसंगाला कारणीभूत आहे. म्हणून मी तुम्हाला दोष देणार नाही. मुलींची लग्न झाल्यानंतर आलेलं रितेपण… तरीही त्याच वेळी माझी निवृत्ती झाली होती. खरं म्हणजे, मी घरात असताना हे असं व्हायला नको होतं, पण तरीही ते घडलं. म्हणूनच सगळा दोष माझ्याकडे जातो. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचीच माफी मागतो.”
    “मीनल…”
    “मम्मा”, म्हणत मुली घरात गेल्या. मीनल, अपराधीपणाच्या महापुरात वाहत होती. मुलींनी तिला बाहेर आणलं. हमसाहमशी रडतच ती मला बिलगली. बराच वेळ कुणी काहीच बोललं नाही. मग मीच त्या शांततेचा भंग केला.
    “वहिनी, कसला विचार करताय?” असं विनयच्या पत्नीला विचारताच त्या दचकल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. बर्‍याच वेळानंतर त्यांनी पदराने डोळे पुसले. म्हणाल्या, “भावोजी काय हो झालं हे?… मला याची कल्पना तरी द्यायची होती.”

  • “त्यामुळे तुमच्यासमोर असंख्य प्रश्‍न निर्माण झाले असते, जे मी आत्तापर्यंत भोगले आहेत. समजा
    माझ्यावर विश्‍वास ठेवून तुम्ही विचारलं असतं, तर त्याच्या उत्तरातून अनेक प्रश्‍न तुमच्यासमोर उभे ठाकले असते… विश्‍वास-अविश्‍वासाच्या खेळात तुमची दमछाक झाली असती.”
    “आता वेगळं काही होणारेय का?”
    “ते होऊ नये म्हणून हा प्रपंच पूर्ण विचारांती केलाय. शरीरावरच्या पुवारलेल्या जखमेतून पू काढून टाकावा लागतो, पण तो काढण्यासाठी कळा सोसाव्या लागतात… आणि त्यानंतरच पूर्ण आराम मिळतो… जखमही बरी होते. या प्रपंचातून एकच प्रश्‍न सर्वांसमोर आला… त्याची दाहकता प्रत्येकाला जाणवली. हे केलं नसतं, तर प्रत्येकाच्या मनतरूवर तर्काचे धुमारे फुटले असते. त्यांना संशयाची भुते लटकली असती. प्रत्येकासमोर एकच प्रश्‍न आला असता… त्यातून तो परस्परांवर अवलंबून असल्यामुळे मार्ग सापडणे दुरापास्त झालं असतं, नव्हे मार्गाची लांबी वाढतच गेली असती. कदाचित मार्ग कड्यापर्यंत जाऊन कडेलोटही झाला असता… आता ती दोघं निर्विघ्नपणे आपलं सहजीवन सुरू करतील. मीही आपल्या दिनक्रमाची दिशा ठरवीन. तुम्हालाही आपला जीवनक्रम ठरवता येईल, एका प्रश्‍नाचा निचरा झाल्यामुळे…!”
    “भावोजी, म्हणजे हे एक शुभमंगलच झालं की…” वहिनीच्या चेहर्‍यावर विरहमिश्रित हसू आलं होतं… विनय याचीच वाट पाहत होता… त्याने पत्नीचे दोन्ही हात हातात घेतले, पण तिच्या नजरेला नजर देऊ शकला नाही. बर्‍याच वेळानंतर त्याची नजर वर वर येत राहिली. आणि जेव्हा नजरेला नजर भिडली, तेव्हा तिने त्याला घट्ट मिठी मारली.
    जीवनाच्या वाटेवर काही गोड प्रसंग, काही अतिप्रसंग, अडचणी, अडथळे येतच असतात. त्यापैकीच हा प्रसंग घडून विरून गेला होता. आलेली मळभ नुसतीच निघून
    न जाता, तृषार्त करून गेली, सुखावून गेली होती.
    …आणि मी, मीनल व दोन्ही मुली एकत्रितपणे पाहत राहिलो… विनय व वहिनी हातात हात घालून चालत होते… ती अदृश्य होईपर्यंत… स्वप्नातून जाग यावी, तशी माझी नजर टेबलाकडे गेली. हार, गुच्छ आणि मिठाईचा पुडा बापुडवाणा पडला होता.
shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खानची आई मेनका इराणी यांचं निधन (Farah Khan Mother Menaka Irani Died In Mumbai)

सुप्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शिका व कोरिओग्राफर फराह खान आणि दिग्दर्शक साजिद खानची आई मेनका इराणी यांचं…

July 26, 2024

ब्रेकअप की अफवाहों के बीच एयरपोर्ट पर अलग- अलग स्पॉट हुए अर्जुन कपूर और मलाइका अरोड़ा (Amidst Breakup Rumours, Arjun Kapoor And Malaika Arora Seen Separately At The Airport)

मलाइका अरोड़ा और अर्जन कपूर के ब्रेकअप की अफवाहें काफी दिनों से सोशल मीडिया की…

July 26, 2024

कहानी- एक खाली पृष्ठ (Short Story- Ek Khali Prishth)

उन्हीं दिनों एक बार मैंने आटोग्राफ बुक खोल कर उनके सामने रखी. वे उस खाली…

July 26, 2024
© Merisaheli