Close

साहिबा (Short Story: Sahiba)

अपर्णा देशपांडे


अचानक जोरात हसण्याचा आवाज आला. काही मुलं कँटीनमध्ये घोळका करून बसली होती. टेबलाच्या मध्यभागी एक मुलगा काहीतरी सांगत होता आणि बाकीचे दाद देत होते. कुणाचंही चटकन लक्ष जावं असाच होता तो, आकर्षक… प्रभावी… कुणालाही आवडेल असा.
पालवी अतिशय खूश होती, कारण तिला मानाच्या समजल्या जाणार्‍या आय.एम.एस.मध्ये एम.बी.ए.ला प्रवेश मिळाला होता. तिच्या अथक मेहनतीचं, आईवडिलांच्या अपार कष्टाचं चीज झालं होतं. कॉलेजमध्ये प्रवेश केल्याबरोबर तिला तिथल्या भव्यतेची जाणीव झाली. अनेक आघाडीचे उद्योजक इथे घडले, आपणही आपलं भविष्य असंच… अचानक जोरात हसण्याचा आवाज आला. काही मुलं कँटिनमध्ये घोळका करून बसली होती. टेबलाच्या मध्यभागी एक मुलगा काहीतरी सांगत होता आणि बाकीचे दाद देत होते. कुणाचंही चटकन लक्ष जावं असाच होता तो, आकर्षक… प्रभावी… कुणालाही आवडेल असा. तिने डोळ्यांच्या कोपर्‍यातून बघितलं आणि वर क्लासरूममध्ये जाऊन बसली. बेल झाली, तसे सगळे वर्गात आले.
“हे काय, हा माझ्याच क्लासमध्ये?”
“हाय!” त्याने हसत हात पुढे करताच तिनेही नकळत हात पुढे केला.
“हॅलो. मी…”
“पालवी. माहीत आहे.”
“माझं नाव… कसं?”
“अ‍ॅडमिशननंतर लिस्ट मिळाली होती.”
“ओह.”
प्रोफेसर आले. इतर सगळं विसरून ती मन लावून ऐकू लागली. आजची सगळीच लेक्चर्स खूप छान झाली. तिला खूप आवडले विषय सगळे. आपल्याच नादात ती घरी जायला निघाली. घर तसं फार लांब नव्हतं. अचानक त्याची गाडी शेजारी येऊन थांबली.
“मी ड्रॉप करू का?”
“नो नो थँक्स. जाईन मी.” तसा सफाईने गाडी चालवत तो पुढे निघून गेला. का मागे लागलाय हा? तेही आपल्यासारख्या मुलीच्या? तिच्या मनात आलं. पालवी दिसायला सुमार होती. उंची बर्‍यापैकी. पण डोळे फार बोलके होते तिचे.
दुसर्‍या दिवशी ती कॉलेजमध्ये येते तो, हा समोरच उभा. हाताच्या ओंजळीत काहीतरी घेऊन,
“हे तुझ्यासाठी.”
“प्राजक्ताची फुलं? ओह मला खूप आवडतात. तुला कसं माहीत?”
“तू मला ओळखलं नाहीस साहिबा?”
साहिबा… साहिबा… असं मला फक्त आशिष म्हणायचा… ओह नो!! तिचा गळा दाटून आला, “आशिष! किती वर्षांनी!” तिला कसं व्यक्त व्हावं कळेना.
“बारा! पूर्ण बारा!” त्याच्या चेहर्‍यातला आनंद लपत नव्हता.
किती देखणा आहे हा. तेव्हाही राजकुमारच दिसायचा. पिंगट मिस्कील डोळे, केस अगदी मोठ्या साहेबांसारखे… आणि ती भानावर आली,
“मला… म्हणजे… माझं ते ऑफिसमध्ये फीचं काम आहे. मी जाते.”
तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे
बघत तो स्वतःशी म्हणाला,
“शेवटी सापडलीसच ना, साहिबा!”
पालवीला काही सुचेनासं झालं होतं. काही काळापूर्वी अनेक वर्षं ज्याच्या आठवणीत आपण तासन् तास रमत होतो, तो आज असा अचानक समोर आला होता. आत्ता जेव्हा निग्रहाने आपण त्याच्यापासून दूर गेलो… तेव्हा हा ओंजळीत प्राजक्ताची फुलं घेऊन… किती वेड होतं आपल्याला फुलांचं! साहेबांच्या बंगल्यात मोठ्ठं अंगण होतं आणि एका बाजूला पारिजातक. सकाळ झाली की, टोपलं भरून फुलं गोळा करायचो आपण. मॅडमना नेऊन द्यायचो. मग कितीही नको म्हटलं, तरी मॅडम काहीतरी खाऊ द्यायच्या. मग आशू बाबाला शाळेत सोडायला बाबा गाडी काढायचे. मॅडम मलाही गाडीत बसवायच्या. साहेबांना आवडत नसणार, पण बोलले नाहीत कधी. डबा खाताना आशू हमखास माझ्या बरोबर खायचा. त्याला आईच्या हातचं लोणचं आणि झणझणीत ठेचा फार आवडायचा.
घरी मोठे साहेब खाऊ देत नसत. असल्या गावठी गोष्टी खाऊ नको म्हणायचे… आणि ती दणकून कोणाला तरी धडकली. दिव्या होती.
“अगं कुठे लक्ष आहे तुझं? आणि तो हँडसम तुझ्याशी बरा बोलतो गं? आम्हाला भावच देत नाही. आणि ही
फुलं कुणी दिली? त्याने?”
“ए बाई, फुलं मी आणलीत गोळा करून येताना. तो काय जस्ट विचारत होता. लायब्ररी कुठे आहे वगैरे.” तिने विषय सावरला.
ती आणि दिव्या लेक्चरला बसल्या. आज तिचं लेक्चरमध्ये अजिबात मन नव्हतं. आज अचानक आशिष समोर. मोठ्या मुश्किलीने भरलेल्या जखमा
पुन्हा नको उसवायला. आशू…आशू,
अरे किती प्रश्‍न आहेत मनात. किती किती आठवणी. तू कधीतरी भेटावं म्हणून देवाजवळ कितीदा हात जोडले होते रे…
अभ्यासात आपण अव्वल म्हणून मॅडम मुद्दाम अभ्यासाला बोलवायच्या. तिसरी ते आठवी आपण कायम एकत्र अभ्यास केला. तू डावखुरा, असा अंगठा वर करून दोन बोटात पेन पकडून लिहायचास. अभ्यास, मग खाणं आणि मग तासभर खेळणं, हा क्रमच होता. लहानपणी सकाळी उठला की, तू ब्रश करतच आमच्या आउट हाउसमध्ये यायचास. मग कुणी कामवाली येऊन तुला घेऊन जायची. एकदा तुझ्या वाढदिवसाला बाबांनी मला शंभर रुपये दिले होते, काहीतरी छान घेऊन या म्हणाले. मी तुला विचारलं, काय हवं म्हणून, तर तू माझ्याचसाठी चप्पल आणली होती, माझी झिजली होती म्हणून. आशू, आपण तसेच का नाही राहिलो? का मोठे झालो रे?
माझे शाळेच्या सहलीचे पैसे तूच भरायचास. आईला गळ घालायचा, दत्तूकाकांना सांगू नका म्हणून.
आईलाही ते नकोच वाटायचं, पण
तुझ्या हट्टापुढे गप्प बसायची. फुलपाखराप्रमाणे बागडायचो आपण. मनात दुसरं काही येण्याचं वय नव्हतं. आपल्याला एकमेकांची इतकी सवय झाली होती की, दुसर्‍या कुणाची गरजच वाटायची नाही. मग अचानक एक दिवस साहेबांनी बाबांना बोलावलं. काय बोलले माहीत नाही. त्यांनी बहुतेक दुसरा ड्रायव्हर आणला होता. आईनं शांतपणे सामान बांधायला सुरुवात केली. मला मात्र कुणीही रागावलं नव्हतं. मी मोठ्यानं गळा काढला. मला तुला न भेटता जाणं मंजूर नव्हतं. तू मावशीच्या लग्नाला गेला होतास. तू येण्याआधीच आम्हाला निघायचा हुकूम होता.
काय अवस्था झाली असेल तुझी आल्यावर? मी तर आठवडाभर आजारीच पडले होते. आम्हाला घेऊन बाबा खूप दूर इथे मुंबईला आले. त्या वयात अशिक्षित माणसाला कोण नोकरी देणार? त्यांनी टॅक्सी चालवायला घेतली. लवकरच एकाच्या दोन, मग चार करत आज सोळा टॅक्सी आहेत. आईही कॉलेजच्या मुलांसाठी खानावळ चालवते. हाताखाली सहा बायका आहेत तिच्या. इथे आल्यावर काय भयानक अवस्था झाली होती माझी. शाळा नवीन, कुणी मैत्रीण नाही. किती पत्रं लिहिली मी आशू तुला. न पोस्ट करता सर्व जपून ठेवली. आईबाबांचा खूप अपमान झाला होता, एवढंच कळलं होतं मला. तेही मी इंजिनिअरिंगला गेल्यावर, आईला खोदून खोदून विचारलं तेव्हा.
शेवटचे लेक्चर झाले. आशू वाटच पाहत होता.
“साहिबा, प्लीज चल. मला तुझ्याशी बोलायचंय. नाही म्हणशील, तर मी जोरात ओरडेन इथेच.”
“शूऽऽ तमाशा करू नकोस. येते मी.”
दोघं कँटीनमध्ये बसले होते. आशू नुसता तिला डोळे भरून पाहत होता, एकही शब्द न बोलता. तिला त्याची भावना नक्कीच कळली होती, पण तिला कमजोर पडायचं नव्हतं. म्हणाली,
“बोल, तुला काय बोलायचंय?”
“तू इतकी थंड कशी बोलू शकतेस? मला त्या सगळ्या आठवणींतून कधी बाहेरच यावंसं वाटलं नाही गं. नेमकं
काय झालं आणि…”
तिला वाटलं याला हळुवार जवळ घ्यावं. प्रेमाने थोपटावं आणि सांगावं, मला पण फार फार जड गेले रे ते दिवस… पण ती म्हणाली,
“आपण त्यावर नको बोलायला. उगाच जखमांना कुरवाळत बसायचं नाहीये मला. आत्ता आपण क्लासमेट्स आहोत, बस्स. येते मी.” बॅग उचलून
ती चालायला लागली.
संध्याकाळी स्वयंपाक तयार झाल्यावर नेहमीसारखी भाजीची चव पाहण्याकरता ती आईच्या मेसमध्ये गेली, तर आई नवीन मेंबर्सचा फॉर्म भरत होती. कोण आहे म्हणून तिने डोकावून बघितलं तर… आशू!!
आशू, इथे? याला हा पत्ता कुणी दिला? पण आई नाही ओळखू शकणार. मला तरी कुठे ओळखायला आला तो. हा काय बोलतोय आईशी?… तो गेला हे पाहून ती बाहेर आली.
“कोण होता गं आई?”
“अगं नवीन मेंबर. आज जेवणार का विचारलं, तर म्हणाला आजच्या मेन्यूमध्ये ठेचा आहे का? मी म्हटलं हो, तो काय कधीही तयारच असतो की.”
पालवीच्या पोटात कालवाकालव झाली. किती गोष्टी उराशी बाळगून ठेवल्यात याने. सुखाला शोधत फिरतोय… का आला हा पुन्हा…
तिला वाटलं आईला म्हणावं, आज जेवला तरी काय होणार आहे, किती वर्षांचा मायेचा भुकेला आहे हा. ती आपल्याच विचारात होती.
“पालवी… ए पालवी… अगं
काय बोलतेय मी? तो उद्यापासून
येतो म्हणाला.”
“अं? आई, भाजी मस्त झालीय बरं का.” तिने हळूच रजिस्टरमध्ये नाव बघितलं. त्याने अंकित वझे असं नाव लिहिलं होतं.

स्वतःचं ताट वाढून घेऊन ती आत टीव्हीसमोर जाऊन बसली. 26 वर्षांची पालवी एक परिपक्व मुलगी होती. तिच्या लक्षात आलं होतं की, आता आशूला टाळणं शक्य नाही. आपली भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. खरं तर त्या वयात तिने त्याला स्वतःपासून वेगळं समजलंच नव्हतं. ती निर्व्याज मैत्री होती. दूर गेल्यावर तीव्र ओढ होती. फार त्रासही झाला, पण तेव्हा बाहेरच्या जगाचा स्पर्श नव्हता झालेला. आज मी त्या नात्याला न्याय देऊ शकेन? अनेक विषयांचा शिरकाव झालेलं मन आता तसंच कसं असेल… पहिल्यासारखं. आणि आईबाबांचा झालेला घोर अपमान? त्यानंतर त्यांची भयानक फरपट? कामासाठीची वणवण? माझ्या शाळेसाठी बाबांनी मुख्याध्यापकांचे पाय पकडणं… नाही… नाही… नॉट अगेन!!! तिला सकाळी कॉलेजला जावंसं वाटेना. तिच्यात ती हिंमत नव्हती. तिचा फोन वाजला.
“तयार राहा. घ्यायला येतोय.”
“आशू, बी सेंन्सिबल. माझं घर कॉलेजपासून जवळच आहे.”
“मी बाहेर उभा आहे.”
अरे देवा, काय करू मी याचं? “मी आईला सांगून येते की, तू माझा क्लासमेट आहेस.”
हेच… हेच तिला नको होतं. या आधी कधी अशी लपवालपवी केली होती का? नाही नं. कारण मन स्वच्छ होतं. आता या वयात त्याचे सरळ अर्थ निघत नाहीत.
ती मुकाट गाडीत बसली. प्रचंड द्वंद्व मनात… याला खडसावून उपयोग नाही, प्रेमानेच समजवावं लागेल.
“इथे एकटाच असतोस?”
“हो. मॉम डॅड तिथेच आहेत, नागपूरला.”


“बघितलं मी तुला काल मेसमध्ये.”
“मग का बोलली नाहीस?”
“आईला
कळू नको देऊ,
तू कोण ते.”
“खूप दुखावले गेले आहेत ना ते?”
“फक्त तेच आशू?”
“आपल्या नात्यात गैरसमजाला जागा
नाही साहिबा.”
साहिबा… शाळेत असताना भरतने खोडी काढली आशूची, तर त्याच्याऐवजी आपणच चोपला होता भरतला. म्हणालो होतो, तुला नाही का रे भांडता येत? मी काय बॉडीगार्ड आहे का तुझी? तर म्हणाला होता, बॉडीगार्ड नाही, तू साहिबा आहेस. साहिबा? हे काय? आहेसच तू साहिबा… तेव्हापासून हा साहिबाच म्हणतो…
“कॉलेजमध्ये नको घेऊ गाडी. आपण कॅफेत बसू. मला बोलायचंय.”
“वॉव, आज मॅडम कशा काय
तयार झाल्या?”
“आशू, तू नसताना मोठ्या
साहेबांनी आम्हाला बाहेर काढलं.
चिंध्या झाल्या होत्या मनाच्या. तूही त्यातूनच गेला आहेस. त्यामुळे त्यावर नको बोलूया. पण तुला वाटतं, आता पुन्हा तशी मैत्री जमेल?”
“तुला शंकाच कशी वाटते, साहिबा?”
“तुझी माझी मैत्री जगावेगळी होती. माझ्या आयुष्यातलं सर्वांत सुंदर पान. ते मिटून मनात ठेवलंय मखमली डबीत. ते आता पुन्हा उघडायचं नाहीये मला. माझ्या आणि तुझ्या नात्यात कुणालाच प्रवेश नाही. आत्ताच्या तुलासुद्धा!!”
“त्या पानाचा मी अविभाज्य भाग आहे. नव्हे, ते पान माझंच आहे. तुझं नाहीच. त्यात प्रवेश घेण्यासाठी मी एक्झिट कधी घेतली होती, साहिबा?”
“पण तो आशू अल्लड आहे,
26 वर्षांचा तरुण नाही. आता मला
वाटतं की, बरंच झालं त्या अलवार वयातच आपण दूर गेलो. उगाच त्या नात्याला लेबलं लावली गेली असती, आणखी घायाळ करणारी.”
“साहिबा, परिस्थिती, वय आणि मानसिकता कालानुरूप बदलते, नाही बदलावीच लागते. तिथेच नागपूरला राहिलो असतो, तर नसती का टिकली आपली मैत्री? आणि मला प्रामाणिकपणे सांग, दत्तूकाका, रुखमीकाकू आज
जिथे पोहोचले, तिथे असले असते? अजूनही बाबांनी ड्रायव्हर बनूनच राहायचं होतं का? निसर्ग नियम चुकतो का साहिबा? आईबाबांचा अपमान केला डॅडनी, वाईट झालं. या पद्धतीने व्हायला नको होतं. मान्य!! मी खूप मोकळेपणाने बोललो त्यांच्याशी. 14 वर्षांचा आपला मुलगा वेड्यासारखा आपल्या ड्रायव्हरच्या मुलीसोबत असतो, तिला साहिबाऽऽ साहिबाऽऽ अशा हाका मारतो, सहन
झालं नाही त्यांना… तू असं बघू नकोस गं!! मी मान्य करतो न की, ते चुकले. पण ती हरवलेली वर्षं मला परत दे साहिबा. तू एकटीच कुठलाही निर्णय घेऊ शकत नाहीस.”
त्या दिवसापासून पालवी आशूला टाळू लागली. आशू मेसमध्ये यायचा. कधी दत्तूकाकांशी, कधी काकूशी बोलायचा. गाडीतून भाज्या आणून द्यायचा. दोघांचा लाडका झाला होता तो. कॉलेजच्या बर्‍याच मुलांनी त्याच्या सांगण्यावरून हीच मेस लावली होती. त्याचं खरेपण पालवीला कळत नव्हतं, असं नाही; पण तिला नवीन अध्याय नको होता.
“पालवी, ए पालवी…”
“काय बाबा?”
“तुला कुणी समीर तारे माहीत
आहे का?”
“हो, इंजिनिअरिंगला मला एक वर्ष सिनिअर होता.”
“छान. त्याचं स्थळ सांगून आलंय. तू किती ओळखते त्याला? चांगला असेल, तर आता नाही म्हणू नकोस.
हेच योग्य वय आहे.”
“लग्नाला माझी ना नाहीये बाबा. एम.बी.ए. तर होऊ द्या.”
“अगं, आता मुलींना शिकवायला नाही म्हणत नाहीत. तू भेट तर खरं त्याला. पुढे बघू. चांगला, मनासारखा जोडीदार मिळणं नशिबात असायला हवं.”
“ठीक, हरकत नाही, मी
भेटेन त्याला.”
“ठीक आहे. अंकितला घेऊ
जा सोबत.”
अंकित… म्हणजे आशूच… झालंच मग तर…
“अंकितला कशाला?”
“अगं मी आलो तर तुम्हाला मोकळं बोलता येणार नाही, म्हणून.”
“काही गरज नाही. मी जाईन एकटी. तुम्ही त्या अंकितच्या जास्त नादी लागत नका जाऊ हं बाबा.”
“पण मी ऑलरेडी बोललोय
त्याला, म्हणून…”
“तुम्ही पण न बाबा!! गाव
गोळा करायचंय का? बरं ठीक आहे, जाईन मी.”
हे बरंच झालं. यातून आशूला योग्य तो संकेत मिळेल…
ती आशूसोबत ‘फाइन डाइन’मध्ये गेली. आशू अगदी गप्प होता. समीर त्यांची वाट बघत होता. अगदी अदबीने उठून त्याने स्वागत केलं.
“हाय!! कॉलेजमध्ये वाटलं नव्हतं अशीही भेट होईल म्हणून.”
“हो ना, काळ माणसाला कसा
कुठे नेईल सांगता येत नाही. बाय द वे, हा आशू…”
“अरे ओळखतो आम्ही. रादर यानेच तुझं स्थळ सुचवलं…”
तिने चमकून आशूकडे बघितलं. तो शांतपणे कॉफी पीत होता. उठून म्हणाला, “तुम्ही बोला, मी आलोच.” आशू हॉटेलच्या लाउंजमध्ये जाऊन बसला. वेडी कुठली… हिला कळत नाहीये की, ती स्वतःला उगाच शिक्षा करून घेते आहे. तो स्वतःशीच गोड हसला.
पालवीला समजेना… आपण ज्यासाठी याला टाळतोय, ते याच्या मनात नाहीच आहे. मग आपण इतकी तगमग का करून घेतली. आपल्याला नेमकं काय हवंय? आशूची पुन्हा मैत्रीच का… मग त्या दिवशी हा का म्हणाला की, काळानुसार नातं बदलू शकतं…
अन् आता समोर समीर…
“पालवी, मला कॉलेजमध्येही आवडायचीस तू. म्हणजे असं प्रेम वगैरे नाही, पण इतर मुलींपेक्षा खूप वेगळी होतीस. जाणवायचं. मला आवडलीस तू. लग्नाची घाई नाहीये मला. तू विचार करून तुझा निर्णय सांग.”


“हो, मला थोडा वेळ लागेल.
तिला अतिशय अवघडल्यासारखं झालं होतं. बोलत होती समीरशी, पण… तिची नजर मात्र आशूला शोधत होती.
“काय गं, कसा वाटला समीर?” आल्या आल्या आईने विचारलं.
“चांगला आहे, म्हणजे ठीक आहे.”
“पण… आशूला कसा वाटला?”
केवढी दचकली ती, “आशू? कोण?” तिने प्रश्‍नार्थक आईकडे बघितलं.
“त्या दिवशी त्याने मेसमध्ये ठेच्याबद्दल विचारलं आणि मग त्याच्या विशेष स्टाईलने
डाव्या हाताच्या अंगठा वर करून दोन बोटात पेन धरून खोटं नाव लिहिलं… मला पुरेसं होतं तेवढं ओळखायला.”
म्हणजे, आईला माहीत होतं तर…
“तू माफ केलंस आई आशूला?”
“जे झालं त्यात त्याची काय चूक गं? घडतात गोष्टी आयुष्यात, मग तेच धरून बसायचं का? मला तर साहेबांचाही राग येत नाही आता.”
आपल्या रूममध्ये विमनस्क बसली होती पालवी. समीरला कसं सांगू की, मला सवयच नाही दुसर्‍या कुणा मित्र-मैत्रिणीची. माझ्या सोनेरी पानातून आशू गेलाच नाही कधी. माझं तर सगळं जग आशूभोवती… तिच्या मनाने आर्त हाक मारली,
“आशूऽऽ आशूऽऽ…”
“मी इथेच आहे, साहिबा,” आवाज आला. तिने चमकून वर बघितलं.
आशू मिस्कील चेहर्‍याने बघत होता. कसला मनकवडा आहे हा. ताडकन
उठून ती त्याच्याकडे झेपावली.
त्याने हात पसरून तिला अलगद मिठीत घेतलं.
“मला जराही शंका नव्हती साहिबा, कुतरओढ तुझीच चालू होती. आपण न तुझ्या त्या मखमली डबीत माझं पान तसंच ठेवू आयुष्यभर. काय?”
पालवी त्याला अजूनच बिलगली, पूर्ण भरून पावून.

Share this article