Close

सौदागर (Short Story: Saudagar)

  • मधुसूदन फाटक

धारवाडच्या ब्रँचमध्ये बदलीवर गेलेली वैदेही सुटका झाल्यावर परत येते.
गाठीला मारलेल्या पन्नास हजार डॉलर्ससह. सरोगसीचे नाटक करून. मालामाल झालेल्या
वैदेहीशी लग्न करायला विनय तयार झाला. मुंबईतील उपनगरात वैदेहीनेच एक ब्लॉक घेतला.
दोघांनी छानछोकीत संसार थाटला.

वैदेही आणि विनय कॉलेजातील एकमेकांचे सहाध्यायी. विनय स्मार्ट देखणा तर वैदेही चारचौघींसारखी. दोघांचे उफाड्याचे तरुण वय. दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले. वैदेही शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून, चांगल्या कॉर्पोरेटमध्ये नोकरीला लागली. विनयची अभ्यासातील गती पहिल्यापासून काहीशी मंद होती. पदवीच्या वर्षालाच वार्‍या करीत होता. तरीही लग्न करूया म्हणून त्याने वैदेहीच्या मागे लकडा लावला होता. वैदेही त्याला नेहमी समजावायची, “विनय, अरे तुझं शिक्षणही अजून पूर्ण झाले नाही आणि कमावत तर काहीच नाहीस. संसार उभा करणे आणि तो चालवणे इतकी सोपी गोष्ट आहे का? माझ्या घरच्यांचा या लग्नाला प्रचंड विरोध होईल. जरा संयम ठेव. मन लावून अभ्यास कर. ग्रॅज्युएट झालास ना तरी पुरे, मी तुझ्याशी लग्न करेन अगदी घरच्यांच्या विरोधात जाऊन.”
“नाही वैदेही, मला आता नाही धीर धरवत. केव्हा एकदा आपण एकत्र येतो आहोत असं मला झालंय. रात्ररात्र मी तळमळत असतो. सतत तुझा चेहरा डोळ्यासमोर असतो. आता कॉलेजमध्ये आपले मित्रही सतत मला चिडवत असतात.”
“वेडा आहेस का विनय? प्रेम आहे ना माझ्यावर तुझं? प्रेमाची खरी ताकद संयमात असते. लक्षात घे.” वैदेही समजावते.
विनयला समजावता समजावता, वैदेहीपण काहीशी अस्वस्थ होतेच. त्याचं राजबिंडं रूप आणि त्याच्यावरील प्रेम तिलाही आकर्षित करत असतं.
**
एका धुव्वाधार पावसाच्या दिवशी वैदेहीला ऑफिसमधून घरी जाणे मुश्कील होते. सगळी वाहतूक ठप्प झालेली असते. काय करावे या विचारात असतानाच, विनयचे घर जवळच आहे हे तिच्या लक्षात येते. अगदी वॉकिंग डिस्टन्सवर. विनयचे आईवडील गावाला गेले आहेत हे माहीत होते तिला. विनय एकटा असताना जावे का त्याच्या घरी? ती संभ्रमात पडते. तरीही तिची पावले अलगद त्याच्या घराच्या दिशेने वळतात. नाइलाजाने.
साखरझोपेत हरवलेला विनय डोअरबेलला रिस्पॉन्स देत बाहेर येतो आणि अक्षरशः अवाक् होतो.
“वैदेही तू? व्हॉट ए प्लेझंट सरप्राइज. खरंच वैदेही, बाहेर पाऊस कोसळतोय. बाहेर पडण्याची मुश्कील, मला प्रचंड एकटेपणा जाणवत होता आणि तू आलीस. वैदेही ऽऽ”
डोळ्यावर झोपेचा अंमल असलेला विनय, कापर्‍या आवाजात आपल्या भावना मोकळ्या करतो.
ओलेपणामुळे व आपल्या धाडसी निर्णयामुळे कापत उभी असलेली वैदेही, भेदरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे टक लावून पाहते.
“अग, पाहतेस काय वैदेही अशी? किती भिजल्येस? आत ये, कपडे बदल. मी कॉफी करतो. बी कम्फरटेबल, माय स्वीट हार्ट.” मधाळ बोलण्याने विनय तिला धीर देतो.
“अरेऽऽ पण मी कपडे कसे बदलू? दुसरे कपडेऽऽ“”
“अं.. अं.. माझ्या आईची एक साडी राहिली आहे इथे. देऊ..? अरे पण तुला साडी नेसता येत नाही ना? थांब, बहिणीची मिडी आहे.”
वैदेही मिडी घेऊन बाथरूममध्ये शिरते. काही वेळात बाहेर येते. त्या आखूड ड्रेसमध्ये, गोंधळलेल्या अवस्थेत. रोमांचित झालेल्या विनयच्या पुढे उभी राहते, आणि विनय अवाक्होतो. काळीसावळी असली तरी मादक भासणारी वैदेही… थरथर कापत असते. विनय नजरेने तिला डोळ्यात साठवून ठेऊ लागतो आणि त्याच्या संयमाचा बांध सुटतो. अचानक तिला मिठीत घेतो. बावरलेली वैदेहीदेखील सुखावते, विनयच्या पीळदार मिठीत.
बाहेर तडातडा पाऊस कोसळत असतो. वीज चमकली, गडगडाट झाला की, वैदेही विनयला घट्ट मिठीत घेई. तिचा हात त्याच्या दाट काळ्याभोर केसात फिरू लागला. विनयला हा रोमांचित संकेत वाटला आणि वैदेही त्याला समर्पित झाली.
बाहेर फटफटले होते. पाऊस कोसळून कोसळून शांत झाला होता. वैदेही बिछान्यातून ताडकन् उठून बसली. विनय अस्ताव्यस्त अवस्थेत गाढ झोपला होता. रात्री स्वप्नसृष्टीत गुरफटलेली वैदेही भानावर आली आणि थरारली. काय करून बसलो आपण? इतकी वर्षे आपली मनं जुळली तरी त्याला शरीराची ओढ येऊ दिली नव्हती आपण आणि आता? त्या शीतल हवेतसुद्धा तिला घाम


फुटला. तिने गदागदा हलवून विनयला जागे केले. तो दचकून जागा झाला.
“वैदेही, तू घाबरतेस का एव्हढी? अग गाड्या सुरू होतील आता.”
“विनयऽऽ अरे तू शुद्धीवर आहेस का? गाड्या गेल्या खड्ड्यात. आपण, आपण राडा केलाय. विनय, रात्रभर आपण या, या बेडवर.”
“अच्छा, म्हणून तू बावरल्येस?” विनय तिला उडवून लावतो. “काय बिघडले? आपण लग्न करणारच आहोत ना?”
“अरे मूर्खा, शुद्धीवर आहेस का तू? करणार आहोत, झाले नाहीये.” वैदेही त्याच्यावर आग पाखडते आणि “नवरा-बायको होईपर्यंत मी तुला चार हात दूर राहण्यास बजावले होते आणि आज…?”
“वैदेही, अग तूच तर रात्री माझ्या गळ्यात…”
“स्टॉप दॅट नॉन्सेन्स,” ओंजळीत तोंड लपवून हुंदके देऊ लागते. “चल मी ताबडतोब निघते. घरी किती काळजीत असतील?”
“थांब ग राणी”, विनय तिला पुन्हा कवेत घेण्यास झेपावतो. “मी कॉफी करून देतो तुला, तू होशील जरा उत्साहित. मग जा.”
“अरे, काय बडबडतो आहेस? तुला कल्पना आहे का काय झालंय ते? बाजूला हो. मला जाऊ दे… प्लीज.” वैदेही कपडे नीटनेटके करते आणि ताडकन् बाहेर पडते.
चेहरा उतरलेल्या अवस्थेत घरी परतते आणि विचारणा झाल्यावर लोणकढी
फेकते. “शेवटी ऑफिसच्या जवळ राहणार्‍या मैत्रिणीच्या घरी चालत गेले आणि तेथेच राहिले. इलाजच नव्हता.”
**
तीन चार महिने झाले आणि वैदेहीला जाणीव झाली. तिच्यात नाजूक बदल झालाय. विनय आणि ती अधूनमधून भेटत होतीच. बेदरकार विनय, मागचे सगळे विसरूनही गेला होता. अखेर एका अनोळखी डॉक्टरकडे जाऊन आल्यावर, वैदेहीने गौप्यस्फोट केला.
“विनयऽऽ अरे आपण तातडीने लग्न करणे आवश्यक आहे.”
“अग पण, आतापर्यंत तूच म्हणत होतीस, मी आर्थिक स्वावलंबी झाल्याशिवाय नो लग्न. मग त्या धुंद रात्रीनंतर इतका बदल? हाव सुटली?”
“काहीतरी बरळू नकोस. हाव मला सुटली नाही, निसर्गाने आपलं काम केलं आहे… समजतंय का नाही तुला? मी हल्ली गायनॅककडे का जाऊन येते ती? विनयऽऽ विनयऽऽ आय एम प्रेग्नंट.” विनयला ती धक्का देते.
“काय? ओ माय गॉड! म्हणजे त्या दिवशी तू काळजी….’ अवाक झालेला विनय गडबडतो. “आता ग.. आता काय करायचं?”
“लग्न करायचं. प्रेम करतोस ना माझ्यावर? मग आता लग्न कर.”
“कसं शक्य आहे ते डार्लिंग? अग मला नोकरी नाही, धंदा नाही.”
“नसू दे. मी चालवीन संसार तू मिळवता होईपर्यंत. पण आता लग्न लांबवणे अशक्य आहे. विनय प्लीज.” वैदेही काकुळतीला येते.
“अशक्य. त्यापेक्षा… आपण असं करूया? अल्पकाळच झालाय ना, यापासून सुटका करून घेऊ या, तसा एक डॉक्टर आहे माझ्या माहितीचा.” विनय सुचवितो.
“काय? सुटका? मी की तू सुटका करून घेतो आहेस? किती निष्ठुर आहेस रे तू? नाही.. नाही मला भ्रूणहत्येचे पाप नाही करायचे.’
‘मग मलाही सध्या लग्न नाही करायचे. चार पैसे गाठीला लागले म्हणजे करू ना लग्न. नंतर पण होईल आपल्याला मूल.” विनय समजावतो.
“खरं सांगायचं ना विनय, मलाही लग्न इतक्यात नाही करायचं. माझ्या जॉबमध्ये ते चालणार नाही. पण.. पण.. याशिवाय दुसरा काय मार्ग आहे?”
बराच वेळ विचारात पडल्यानंतर, विनय एक अनोखा उपाय सुचवितो, “आपण असं केलं तर? तू बेगडी सरोगेट मदर म्हणून सोंग घे. मूल झाले की ते.. ते आपण विकू. दणकट पैसे घेऊ. हल्ली परदेशी मंडळींमध्ये एक क्रेझ आहे, मुले दत्तक घेण्याची. एक एजंट आहे माझ्या ओळखीचा. काही महिने लांबच्या ब्रान्चमध्ये बदली करून घे. अनोख्या गावी मूल झाले की मी येतोच धावत.” विनय.
“धावत? मूल बघायला की विकायला? विनय किती स्वप्न पाहिली होती मी. मला एक मुलगी होईल, तुझ्यासारखी गोंडस, देखणी. मग तिचं मी नाव ठेवेन, वैविध्या. माझ्यातला ‘वै’ तुझ्यातला ‘वि’ आणि प्रेमाच्या ध्यासाचा ‘ध्या’. सगळी स्वप्नं धुळीला मिळवायची का रे?”
“बघ विचार कर वैदु? ह्या एका निर्णयाने आपण मालामाल होऊ. मग करूया ना लग्न? दोघांच्याही हिताचे आहे म्हणून सुचवतो. बघ.”
वैदेही सुन्न होऊन विचारात पडते. तिचा कलही या उपायाकडे सरकू लागतो. शेवटी पैशाशिवाय हे आयुष्य शुष्क आहे. मग काय हरकत आहे?
धारवाडच्या ब्रँचमध्ये बदलीवर गेलेली वैदेही सुटका झाल्यावर परत येते. गाठीला मारलेल्या पन्नास हजार डॉलर्सह. सरोगसीचे नाटक करून.
मालामाल झालेल्या वैदेहीशी लग्न करायला विनय तयार झाला. मुंबईतील उपनगरात वैदेहीनेच एक ब्लॉक घेतला. दोघांनी छानछोकीत संसार थाटला. गाठीच्या पंचवीस लाखांपैकी वीस लाख डाऊन पेमेंट केले आणि कर्जाचा इएमआय वैदेहीच्या बँकेच्या पगारातून जाऊ लागला. विनय अजून कफल्लकच होता. तरीही तो आज ना उद्या कामधंदा नक्की सुरू करेल, असा विश्‍वास वैदेहीला वाटत होता.
‘सध्या चालवू ना आपण संसाराचा गाडा, कधीतरी उलटे होऊ दे की, आमच्या रूपात नाही झालंय? तो गोरा हॅन्डसम आणि मी सावळी यथातथाच.’ वैदेही हा विचार करते आणि संसारात रमून जाते. घर सजविण्याच्या नादापायी विनय पैसे उडवतच होता. वैदेहीवर मात्र प्रेमाचा वर्षाव चालू असतो. आपल्या अनोख्या कल्पनेमुळे इतका पैसा आपण प्रथमच पाहत आहोत, यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेत होता.
प्रेमाने ओथंबलेल्या त्यांच्या संसारवेलीवर पुन्हा एक फूल उमलले. वैदेहीने एका गोड मुलीला जन्म दिला. ही सुंदर मुलगी आमची आहे, म्हणून उघडपणे मिरवता येईल या विचाराने ती मोहरली. विनय मात्र तिर्‍हाइतासारखा. मुलीचे लाडकोड करण्यासाठी विनयला पाठविले की, आता मात्र तो हात हलवत परत यायचा. “अगं, आहेत कोठे पैसे आता,” हे त्याचं टुमणं चालूच असायचे.
“एक उपाय आहे वैदेही. लाखभर रुपये गाठीला मारण्याचा. हे बघ. आपल्याला पुढला मुलगा होईलच. नाहीतरी ही मुलगीच. त्यामुळे मला वाटते, एका जर्मन माणसाला गोरी मुलगी हवी आहे. तीस हजार युरो द्यायला तयार आहे. तेव्हा ही नकोशीऽऽ”
“काय? विनय अरे काय बोलतो आहेस? शुद्धीत आहेस काय?” वैदेही संतापाने उसळते. “हे बघ, तुझी संमती घ्यायला मी बांधील नाही. मुलगी माझी पण आहे.” विनयचा निश्‍चयी स्वर.
“आण इकडे ते लेकरू. अधमा, मागल्या खेपेस मी अगतिक होते म्हणून, होऽ ऽ ऽ आता मात्र ठाम नाही.” वैदेही मुलीला खेचून घेते. “अरे, तू बाप आहेस की मुले विकणारा व्यापारी? नवरा म्हणून तो हक्क तू केव्हाच गमावला आहेस.” वैदेही संतापाने थरथरत असते. “जा माझ्या समोरून. पहिल्यांदा तोंड काळं कर. घर माझं आहे. तुझ्यासारख्या कसायाला येथे थारा नाही. गेट आऊट इमिजिएटली.” त्याची बॅग वैदेही त्याच्यावर फेकते. “अग वैदेही, तू एकटी कशी राहणार? एकट्या बाईला समाजाच्या रोषाला बळी पडावे लागते. प्लीज. आता पुन्हा नाही मी…”
“अरे समाज तुझ्याइतका नीच नाहीये. आम्ही दोघेही मजेत राहू. मी आणि वैविध्या. नाहीतरी दमडी कमावण्याची हिंमत नाही. ताबडतोब तोंड काळे कर. जा.”

Share this article