Close

वळवाचा पाऊस (Short Story: Valvacha Pause)

  • निशा नंदन वर्तक

हा अचानक आलेला वळवाचा पाऊस !! अवंतिकेचा उदासपणा कुठच्या कुठे पळून गेला.. तिला पाऊस खूपच आवडायचा. तिचं तनमन रोमांचित झालं… तिला आता अविनाशची खूप आठवण येऊ लागली. पाऊस वेड्यासारखा बेधुंद कोसळत होता आणि तिचा प्राणसखा तिच्या
सोबत नव्हता.
संध्याकाळचे पाच वाजले होते तरी सात वाजल्यासारखा अंधार दाटून आला होता. हा अचानक अवेळी पाऊस कसा काय भरून आला समजत नव्हतं. का कुणास ठाऊक पण आज अवंतिकेची खूप चिडचिड होत होती आणि अविनाशची आज खूपच आठवण येत होती. अवि मागच्या महिन्यात अमेरिकेहून दोन वर्षांनी परत येणार होता आणि त्याचं येणं अचानक पोस्टपोन झालं! अवंतिकाला हे अविनाश शिवायचे दिवस म्हणजे युगासारखे वाटू लागले होते. त्यात हे अंधारलेलं आभाळ अवंतिकेला उदासवाणं वाटतं होतं.
कळत नाही मन का इतकं सैरभैर व्हावं? जे क्षण आपले नव्हतेच कधी मग त्या क्षणासाठी का इतका अट्टाहास! पण ते क्षण आपले नाहीतच हे का पटत नाही? माझ्या मनाची घालमेल कोणालाच उमजू नये? म्हणून राग? मनस्वी माझा कोणावर राग नाही आणि असला तरी त्याचा काही उपयोग नाही हे कळतं मला.. पण तरीही का हा त्रागा? आपणच रंगवलेली स्वप्ने पाहण्याआधीच तुटून जावीत, कोणीतरी प्रचंड आघात करावा असंच काहीतरी होतंय..
एकदम अचानक वातावरणात बदल झाला आणि जोराचा वारा सुरू झाला, झाडे जोरजोरात डोलू लागली आणि झाडांची पाने झाडांपासून वेगळी होऊन अंवतिकेच्या गॅलरीत येऊन पडली. थंडगार वारे अवंतिकेला झोंबू लागले, आकाशात विजेची लकेर उमटली आणि जोरदार ढगांचा गडगडाट झाला. त्या आवाजाने अवंतिका इतकी घाबरली, दचकली आणि आत पळाली. जोरदार धो धो पाऊस सुरू झाला. वातावरण धुंदफुंद होऊन गेलं.


हा अचानक आलेला वळवाचा पाऊस !! अवंतिकेचा उदासपणा कुठच्या कुठे पळून गेला.. तिला पाऊस खूपच आवडायचा. तिचं तनमन रोमांचित झालं… तिला आता अविनाशची खूप आठवण येऊ लागली. पाऊस वेड्यासारखा बेधुंद कोसळत होता आणि तिचा प्राणसखा तिच्या सोबत नव्हता. अविनाशच्या आठवणीने तिच्या डोळ्यातूनच पाऊसधारा वाहू लागल्या. तिला खूप एकटं वाटू लागलं. तिचं मन म्हणत होतं, मला आज तू हवा होतास रे माझ्या सोबत…. का नाहीस तू माझ्या बरोबर? तुझं येणं असं का अचानक पोस्टपोन झालं. अरे हे क्षण पुन्हा पुन्हा मिळतील का? तू ये ना लवकर, घे ना मला तुझ्या मिठीत… विरघळून जाऊ दे मला तुझ्यात…. हा धुंद वेडा पाऊस…. मला वेड लागेल आता… तू मला आता ह्या क्षणी हवा आहेस. तुला फक्त काम काम आणि कामच दिसतं का रे! ! तुला कसं कळत नाही माझं मन? एकदा ये ना रे!! माझा पाऊस बनून.. तुझ्या पावसात चिंब भिजून जाऊ दे.. गळून पडू दे सारे प्रश्न.. वाहून जाऊ दे ना वेदना मनातल्या.. येशील ना रे..? मी सांधलेले हे ऋणानुबंध परत एकदा प्रेमाच्या धाग्यात गुंफण्यासाठी येशील ना रे? एकदाच परत ये प्लीज.. मला कवेत घेण्यासाठी.. अश्रूंची फुले करण्यासाठी!!!
तेवढ्यात पुन्हा वीज कडाडली आणि जोरात गडगडाट झाला. अवंतिकेला हे असं पावसाचं बेभान रूप फार आवडायचं. तिच्या मनात यायचं, असा पाऊस प्रेमिकांसाठीच असतो… ह्या अशा बेधुंद कोसळणार्‍या पावसात दोन प्रेमिकांनी सारं भान विसरायचं, सारे वाद मतभेद विसरायचे आणि एकरूप व्हायचं. हा खरा आनंद असतो, सर्वोच्च आनंद… ही खरीखुरी समाधी… हे खरं ध्यान लागणं असतं… एकरूप होणं. खरंतर हा पाऊसच तिचा खरा सखा होता. ती गॅलरीत येऊन धुंद बरसणार्‍या पाऊस सख्याला पाहत होती. गॅलरीतला मोगरा नुकताच उमलु लागला होता आणि तो धुंद करणारा मोगरीचा सुगंध आणखीनच अवंतिकेला चेतवत होता. पावसाचे गार तुषार अवंतिकेच्या अंगावर येत होते. तिचे केसही चिंब झाले होते. आता संध्या सरली होती आणि रजनीचं राज्य सुरू झालं होतं.
रात्र झाली होती, अवंतिकेने बेडवर अंग टाकलं तरी तिला झोप येत नव्हती. तिला ह्या पावसात चिंब भिजावं असं वाटतं होतं. हा असा ओला ओला पाऊस तिला खूप आवडायचा. आपल्या उघड्या अंगावर त्याला झेलावा आणि पिऊन टाकावा
असं वाटायचं.
*
अवंतिकेला तिची आणि अविनाशची ती लग्नापूर्वीची पावसाळी रात्र आठवली आणि तिच्या सर्वांगातून एक शिरशिरी सरसरून गेली. तिला झोप येणं शक्यच नव्हतं. अविनाशच्या विरहानं ती जळत होती, तळमळत होती. तिने अविनाशला फोन लावला पण फोन लागत नव्हता. फोन नॉट रिचेबल येत होता म्हणून तिची आणखीनच घुसमट होत होती. तिने अविनाशची ती मऊशार उशी उराशी घट्ट पकडली आणि तिला खूप रडू आलं. उशीही ओली झाली होती आणि अवंतिका ही आत बाहेरून चिंब ओली झाली होती. पावसानं तिचं अंग अंग चेतवून टाकलं होतं पण…. अविनाश नसल्यानं तिचं मन तडफडत होतं, उदास, निराश विचारांनी तिला घेरलं होतं… ती विचार करत होती… चांदण्या रात्रीत चांदण्यांची आरास मांडतांना अचानक चंद्र कोणीतरी हिरावून घेऊन जावा आणि चांदण्यांना विरहाचा शाप मिळावा. असंच काहीतरी आयुष्य वाट्याला आलं आहे माझ्या! वाळूचे कण हातातून निसटून जावेत आणि ओंजळ पुन्हा रीती व्हावी अगदी तसंच आनंदांचे क्षण निसटून चाललेत की काय? असं वाटू लागलंय खरं… न गवसणार्‍या मृगजळामागे धावता धावता, कस्तुरीगंधाच्या शोधात दमछाक व्हावी अगदी तसंच होतंय..
भूतकाळातल्या त्या गोड आणि कटू स्मृतीनी ती तळमळत होती. तिला आठवत होतं… लग्नाला सहा महिने अवकाश होता आणि ती अशीच आई-बाबांच्या परवानगीनेच अविनाशला भेटायला आली होती आणि …. जोरदार पाऊस सुरू झाला होता. सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. सर्व वाहतूक ठप्प झाली होती, मुंबई अर्धी पाण्यात बुडाली होती. अवंतिकेला घरी परतणं शक्यच नव्हतं. अवंतिकेच्या आई-बाबांना काय करावं समजत नव्हतं, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती!! फोनही लागत नव्हते. अविनाश भाड्याच्या घरात एकटाच राहात होता. इकडे अवंतिकेलाही रडू कोसळलं होतं. अविनाश तिला धीर देत होता… ’अगं घाबरू नकोस, तू आज इथेच राहा आणि सकाळी लवकर मी तुला सोडतो. आईबाबांचा फोन तोपर्यंत लागला तर आपण बोलूच. येवढ्या पावसात तुला मी जाऊ देणार नाही. आई-बाबाही समजूतदार आहेत ते समजून घेतील.’ ’मी काय तुला खाणार नाही, हवं तर तू बेडरूमची कडी लाव आणि आत झोप, मी बाहेर हॉलमधे झोपतो मग तर झालं.’ अवंतिकेचा आता नाइलाजच होता, तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच आणि पावसातून कसेबसे ते दोघेही भिजतच घरी पोहचले होते त्यामुळे अवंतिकेचे कपडेही पूर्ण भिजले होते. तिचा चेहरा इतका भेदरलेला रडवेला असतानाही अविनाश तिला म्हणाला होता,” ह्या चिंब भिजलेल्या कपड्यात आणि चिंब ओले केस….तू इतकी सुंदर दिसतेस की मला राहवत नाही. तू आधी कपडे बदल. माझी ट्रॅकपँट आणि टि शर्ट देतो ते घाल, तोपर्यंत तुझे कपडे वाळतील. अशी ओली राहू नकोस.” अवंतिकेला हे दहा वर्षांपूर्वीचं सारं सारं आठवू लागलं आणि तिला आणखी रडू आलं. दहा वर्षापूर्वी त्या रात्री जे घडलं ते ती विसरूच शकत नाही. त्या एका चुकीमुळे त्या दोघांना अजूनही भोगावं लागतंय. त्या पावसाळी रात्री जे घडायला नको होतं तेच घडलं!! अग्नीजवळ लोणी ठेवलं तर ते वितळणारच!


लग्नाला अजून सहा महिने होते आणि अवंतिकाला आपण गरोदर असल्याची चाहूल लागली! अवंतिका फक्त 22 वर्षांची होती, बिचारी बावरली, घाबरली!! आई-बाबांनाही ती सांगू शकत नव्हती. अविनाशला मात्र तिनं सांगितलं. दोघांनीही घरच्यांना न विचारता गुपचूप निर्णय घेतला!! अवंतिका आणि अविनाशचं पहिलवहिलं बाळ, पहिल्या प्रेमाचं प्रतीक … पाऊस सख्याच्या कृपेने लाभलेलं बाळ जन्माला येण्याआधीच गेलं. पण त्यांच्या ह्या चुकीच्या निर्णयामुळे नंतर मात्र अवंतिकाची कूस उजवलीच नाही. त्यानंतर अनेक रात्री आल्या अन् गेल्या पण पहिल्या मीलनासारख्या फुलल्याही नाही आणि फळल्याही नाहीत. पाच वर्षे वाट पाहण्यात सरली. दोघेही निराश झाले होतेच पण अवंतिकेला तर ह्या गोष्टीचा खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. सारखी टोचणी.. बोलणी .. अपमान तिच्या वाट्याला आला. शेवटी अविनाशने सर्वांपासून दूर अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला.
आज पुन्हा दहा वर्षांनी तो तिचा सखा पाऊस पुनरावृत्ती करू पाहत होता पण तिचा प्राणसखा कुठे होता? त्याचं येणं का लांबलं असावं?…..तिच्या मनात अनेक शंका येत होत्या…. पण नाही!! मेघराजाने सारी सूत्रं आपल्या हातात घेतली. जोरदार वादळी पाऊस सुरू झाला. आकाश ढगांनी व्यापून टाकलं. अविनाशचं विमान पुन्हा मुंबईत लँड झालं होतं. मेघदूतानं आपलं काम चोख बजावलं होतं. अवंतिकेचा प्यारभरा संदेश अविनाशला पोहचवला होता आणि अविनाशला खेचून अवंतिकेकडे घेऊन आला होता. अविनाशला त्याच्या कंपनीनं तातडीनं भारतात पाठवलं होतं आणि अविनाशनेही अवंतिकेला सरप्राइज द्यायचं ठरवलं होतं..
रात्रीच्या वेळी अकरा वाजता धो धो कोसळणारा पाऊस आणि दारावरची बेल जोरात वाजली. अवंतिकानं पिपहोल मधून पाहिलं आणि … तिला विश्वास बसेना, प्रत्यक्ष अविनाश दारात उभा!! तिच्या प्रबळ इच्छा शक्तीने अविनाशला खेचून आणलं होतं. पाऊस सख्याच्या साक्षीनं आज पुन्हा एकदा पुनर्मीलन होणार होतं. अवंतिकेनं दार उघडलं आणि दरवाजातच अविनाशला मिठी मारली, अविनाश तिच्याकडे बघतच राहिला… दहा वर्षांपूर्वीची ती त्याला दिसत होती…. तेच भाव .. तोच आवेग.. त्या स्पर्शातला तो रोमांचक थरार, तिच्या ओल्या केसांना येणारा तो स्रीत्वाचा गंध… तिची गहिरी, मधाळ खोडकर नजर!! त्यानं तिच्या मऊसूत पाठीचं चुंबन घेतलं आणि तिला उचलूनच आत नेलं आणि… पावसाच्या साक्षीनं भूतकाळाची पुनरावृत्ती झाली.. अवंतिका अविनाशला म्हणाली, तूही अगदी ह्या वळवाच्या पावसासारखाच आहेस. कधीही न सांगता, चाहूलही न लागू देता येतोस आणि त्याच्या सारखाच धो धो बरसतोस आणि तृप्त करून टाकतोस. पावसाच्या साक्षीनं आज दहा वर्षांनंतर दोघांचं खरंखुरं पुनर्मीलन झालं होतं. मेघदूतानं यक्ष आणि त्याच्या प्रियेचं मीलन घडवून आणलं होतं.

Share this article