'डायरी ऑफ विनायक पंडित' या वेबफिल्मचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही गोष्टी आपली पाठ कधीच सोडत नाहीत. संपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही संपत नाहीत. अशाच काही गोष्टी सोबत घेऊन निघालेल्या कलाकाराचा जीवनप्रवास 'डायरी ऑफ विनायक पंडित'मधून उलगडणार आहे. चित्रबोली क्रिएशन्स निर्मित, वन कॉम प्रॉडक्शन सहनिर्मिती आणि अक्षय विलास बर्दापूरकर सादर करत असलेल्या 'डायरी ऑफ विनायक पंडित' या वेबफिल्मचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच प्रदर्शित झाला असून मयूर शाम करंबळीकर दिग्दर्शित या वेबफिल्ममध्ये अविनाश खेडेकर, सुहास शिरसाट, पायल जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वेबफिल्मच्या नावावरून एका डायरीत काहीतरी रहस्य दडलेले दिसत आहे तर ट्रेलरमध्ये लळा लावणं यासारखं दुसरं कोणतच मोठ व्यसन नाहीये. माणसाला स्वतःलाही कधी कळत नाही, की आपल्याला याचा कधी लळा लागतो. अशी काही वाक्य आहेत, त्यामुळे याचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे गुपित 'डायरी ऑफ विनायक पंडित' पाहिल्यावरच कळेल. मयूर शाम करंबळीकर यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या या वेबफिल्मचे आदित्य विकासराव देशमुख, वेदांत विवेक मुगळीकर या वेबफिल्मचे निर्माते आहेत तर ऋषिकेश जोशी, व्यंकट मुळजकर समीर सेनापती अणि विनय देशमुख हे सहनिर्माते आहेत. येत्या १ सप्टेंबरपासून ही वेबफिल्म प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येईल.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “ही खूप हळवी अशी ही कथा आहे. आयुष्यात एखाद्यावर लळा लावल्याने काय होऊ शकते, हे या वेबफिल्ममध्ये दाखवण्यात आले आहे. यात प्रेम आहे, विरह आहे, रहस्य आहे आणि त्यातूनच काही गुपितंही उघड होणार आहेत.” तर निर्माते आदित्य विकासराव देशमुख म्हणतात, “काळजाला भिडणारी ही वेबफील्म प्रेक्षकांनी आवर्जून पाहावी. आम्हाला अत्यंत आनंद आहे, की आमची ही वेबफिल्म प्लॅनेट मराठीसारख्या नावाजलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.''