Close

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन (Jayant Savarkar Marathi Actor Passed Away age 88)

मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. नुकतीच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत त्यांनी कांचन यांच्या भावाची भूमिका साकारली होती. याबरोबरच 'समांतर' या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली ज्योतिषाची भूमिकाही विशेष गाजली होती.

त्यांच्या निधनामुळे अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. ३० हून अधिक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.

'प्रेमा तुझा रंग कसा', 'कथा नव्या संसाराची', 'बदफैली', 'वरचा मजला रिकामा', 'व्यक्ती आणि वल्ली’, 'सौजन्याची ऐशी तैशी' अशा एकापेक्षा एक सरस नाटकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. तर, 'वाहिनीची माया,' 'पैसा पैसा', 'आराम हराम है' आदी चित्रपट आणि 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'अरे वेड्या मना', 'अस्मिता' अशा गाजलेल्या मालिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपट किंवा नाटकांमधील त्यांच्या छोट्या मात्र महत्वाच्या भूमिकाही संस्मरणीय ठरल्या.

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अभिनेता जयंत सावरकर मागील १५ दिवस रुग्णालयात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. जयंत सावरकर यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात निर्माण झालेली पोकळी ही भरुन न येणारी आहे. सोशल मीडियावरुन जयंत सावरकर यांना चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी आदरांजली वाहिली आहे. यावेळी अनेक मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या २० व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), एकच प्याला (तळीराम) सारख्या मराठी नाटकात त्यांनी काम केलं. त्यांच्या या भूमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. त्या वेगवेगळ्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले.

Share this article