Close

आमिर खानच्या थ्री इडियट्सचा सिक्वेल येणार? (3 Idiots Sequel)

काही वर्षांपूर्वी गाजलेल्या थ्री इडियट्स या सिनेमाचा पुढचा भाग लवकरच येण्याची शक्यता आहे. २००९ साली आलेल्या व परंपरागत शिक्षण पद्धतीतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या ब्लॉकबस्टर ‘थ्री इडियट्स’ या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. थ्री इडियट्सच्या पहिल्या भागात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता शर्मन जोशी यानं दिग्दर्शकाच्या हवाल्यानं तसे संकेत दिले आहेत.

शर्मन जोशी हा सध्या त्याच्या 'कफस' या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनच्या एका कार्यक्रमातच त्याला ‘थ्री इडियट्स’च्या सिक्वेलबद्दल विचारण्यात आलं. त्यावर चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी चित्रपटाच्या कथेवर काम करत आहेत, असं त्यानं सांगितलं.

खरंतर राजकुमार हिरानी यावर काम करत आहेत. पार्ट २ साठी प्रेक्षक किती उत्सुक आहेत याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. ते प्रेक्षकांना निराश करणार नाहीत. त्यांनी एक-दोन कथा आमच्याशी शेअर देखील केल्या होत्या. मात्र, त्यानंतर गाडं पुढं सरकलं नाही. आम्ही त्याबद्दल विचारलं असता अजून नीट काही आकाराला येत नसल्याचं उत्तर त्यांनी दिल्याचं शर्मन जोशीनं सांगितलं.

मी स्वत: सुद्धा थ्री इडियट्सच्या पार्ट दोनसाठी उत्सुक आहे. तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही कथेवर काम करतोय. एकदा ही कथा पूर्ण झाली की आम्ही शूटिंग सुरू करू. आम्ही स्वत: त्याचा आनंद घेऊ आणि लोकांनाही आनंद देऊ, असं तो म्हणाला.

'थ्री इडियट्स' हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता आमिर खान प्रमुख भूमिकेत होता. त्याशिवाय, आर माधवन, शर्मन जोशी, करीना कपूर, बोमन इराणी, ओमी वैद्य आणि मोना सिंह यांनी यात भूमिका साकारल्या होत्या. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. आमिर खान याच्या 'तारें जमीन पर' या चित्रपटाप्रमाणेच 'थ्री इडियट्स'नंही शिक्षणाकडं बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन लोकांना दिला होता. या चित्रपटाचं समीक्षकांनीही प्रचंड कौतुक केलं होतं.

हा २००९ चा भारतीय हिंदी भाषेतील कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे जो राजकुमार हिरानी लिखित, संपादित आणि दिग्दर्शित आहे. या चित्रपटाचे सह-लेखन अभिजात जोशी यांचे आहे आणि विधू विनोद चोप्रा हे त्याचे निर्माते आहेत.

चेतन भगतच्या फाइव्ह पॉइंट समवन या इंग्रजी कादंबरीवरून अंशतः रूपांतरित करुन घेतलेली ही चित्रपटाची कथा भारतीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांच्या मैत्रीचे अनुसरण आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेतील सामाजिक दबावांबद्दल टीका करते.

२५ डिसेंबर २००९ रोजी प्रदर्शित झाल्यावर, 3 इडियट्सला समीक्षकांची व्यापक प्रशंसा आणि घवघवीत व्यावसायिक यश मिळालं. हा भारतातील त्याच्या सुरुवातीच्या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. अखेरीस जगभरात ₹४६० कोटी ($९० दशलक्ष) कमावलेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा १७वा भारतीय चित्रपट आहे.

५७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, सर्वोत्कृष्ट मनोरंजन प्रदान करणारा चित्रपट म्हणून ३ इडियट्सने ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. याव्यतिरिक्त चित्रपटाला ५५ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये 11 नामांकन मिळाले, ज्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता (खान), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (कपूर) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (माधवन आणि जोशी) यांचा समावेश आहे. 3 इडियट्स हा आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटांपैकी एक मानला जातो; या चित्रपटाचा पुढचा भाग पाहण्याची उत्सुकता आहेच दरम्यान हिरानी मात्र शाहरुख खानसोबत डंकीच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत.

Share this article