Close

६ सर्वोत्तम स्पर्धकांनी गाठली अंतिम फेरी : ‘सुपरस्टार छोटे उस्ताद २’ चा महाअंतिम सोहळा (6 Top Singers To Contest In The Finale Of ‘Superstar Chhote Ustad 2’ : Streaming Next Week)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून ६ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या ७ आणि ८ ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे.

जालन्याचा संकल्प काळे, अकोल्याची श्रुती भांडे, नाशिकची श्रेया गाढवे आणि सृष्टी पगारे, औरंगाबादची रागिणी शिंदे आणि भिवंडीचा काव्य भोईर या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगेल. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे.

छोट्या उस्तादांना या पर्वात मोलाचं मार्गदर्शन केलं ते सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय़ गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे यांनी. या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे संस्कार झालेत त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल दैदीप्यमान असणार यात शंका नाही.

महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके गायक अर्थातच रोहित राऊत, जुईली जोगळेकर, उर्मिला धनगर, प्रसेनजीत कोसंबी, मधुरा कुंभार, आणि शरयू दाते खास हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ जाधव देखिल या महाअंतिम सोहळ्यात धमाकेदार गाणं सादर करुन धिंगाणा घालणार आहे. यासोबतच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे.

Share this article