डाएट म्हटलं की अनेकांचे चेहरे उतरतात. कारण डाएट हे निरसच असते, असे आपल्या मनात पक्के बसलेय. पण हा निव्वळ गैरसमज आहे. डाएट… तेही अॅण्टी एजिंग, अर्थात वय कमी करणारे डाएट किती रंगतदार होऊ शकते, याविषयी- आरोग्य आणि सौंदर्य यांचा थेट संबंध हा आहाराशी असतो. म्हणूनच आहाराचे संतुलन बिघडले की त्याचे परिणाम आरोग्य आणि सौंदर्यावरही दिसू लागतात. आणि तेच आरोग्य व सौंदर्याच्या दृष्टीने आहारात बदल केल्यास त्याचेही सुयोग्य परिणाम शरीरामध्ये दिसतात. वयानुसार तनामनात येणार्या बदलांचंही आहाराशी असंच नातं आहे. आहारात योग्य घटकांचा समावेश केल्यास वयानुरूप होणार्या या बदलांचा वेग कमी करणं… अगदी त्या बदलांना प्रतिबंध करणंही शक्य होऊ शकतं. चीझ कोणत्याही पदार्थावर चीझ पेरलं की त्याची लज्जत काही औरच असते, नाही? तरीही त्यातील कॅलरीजचा विचार करून आपण स्वतःला रोखतो. पण वय कमी करायचं असेल, तर हे चीझही खायला (अर्थात प्रमाणात) हवं. कारण एका संशोधनानुसार, वयानुरूप कमकुवत होणार्या हाडांना बळकटी देण्यासाठी चीझमधील कॅल्शिअम अत्यंत उपयुक्त आहे. चीझ अस्थिसुषिरता (अॅस्टिपोरोसिस) या आजाराला प्रतिबंध करण्यास मदत करतं. तज्ज्ञांनुसार, आपल्या एका दिवसाचं कॅल्शिअम आणि अर्धी प्राणिजन्य चरबी यांची गरज 100 ग्रॅम चीझमुळे पूर्ण होऊ शकते. यासाठी चीझ नुसतंच खायला हवं असं नाही, तुम्ही ते ऑलिव्ह ऑईलसोबत गरम करून त्यावर विविध भाज्या परतवूनही खाऊ शकता. मध मध हे एक अतिशय प्रभावशाली अॅण्टी-ऑक्सिडंट आहे. ते रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासोबतच, कर्करोगाचा प्रतिबंध करण्यासही मदत करतं. तसेच मध चेहर्यावर लावल्यास उत्तम जंतुनाशकाचं कार्यही करतं. मटार मटार हे तांब्याचे उत्तम स्रोत आहे. शरीरातील पेशींचं वयानुसार होणारं विघटन कमी करण्यासाठी तांबे मदत करतं. मटार आवडत नसल्यास, तुम्ही शिंपल्या, खेकडे, सोयाबीन, धान्य, डाळी यांचा आहारात समावेश करू शकता. यांमध्येही तांब्याचं प्रमाण अधिक असतं. ग्रीन टी आरोग्याच्या दृष्टीने ग्रीन टी हे एक उत्तम पेय आहे. शरीरातील सर्व टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास ते मदत करतं. तसेच शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्याचं कार्यही करतं. म्हणूनच नियमितपणे ग्रीन टीचं सेवन केल्यास त्वचा उजळ होते. तसेच ग्रीन टी वयानुरूप शरीरात येणार्या बदलांची गती कमी करण्यासोबतच, शरीरातील कॉलेस्टेरॉलच्या पातळी नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. जर्दाळू एका सर्वेक्षणानुसार, आपल्या आहारात सामान्यतः असणारी विविध फळं आणि भाज्या यांच्या तुलनेत जर्दाळूमध्ये सर्वाधिक प्रमाणात अॅण्टी-ऑक्सिडंट असते. जर्दाळूमध्ये असणारे मॅग्नेशिअम हे शरीरातील हाडं, स्नायू आणि मज्जासंस्था यांना सुस्थितीत राखण्यास मदत करते. अर्थात यामुळे शरीर अधिक काळासाठी तरुण आणि निरोगी राहण्यास मदत होते. त्यातही केलिफोर्नियाचे जर्दाळू सर्वोत्तम मानले जातात. पपई पपईतही प्रभावशाली अॅण्टी-ऑक्सिडंट्स असतात. हे अॅण्टी-ऑक्सिडंट्स त्वचेच्या लवचीकपणासाठी आवश्यक असणारे कोलिजीन आणि इलास्टिन यांना हानी पोहचविणारे फ्री रेडिकल्स नष्ट करण्यासाठी मदत करतात. तसेच पपई हे अ जीवनसत्त्वाचं उत्तम स्रोत आहे. ते वयानुसार येणार्या पिग्मेंटेशनला प्रतिबंध करण्यासोबतच, त्वचेला हानिकारक ठरणार्या फ्री रेडिकल्स विरुद्ध लढाही देतं. पपईमधील क जीवनसत्त्व त्वचा कोमल आणि लवचिक राखण्यास मदत करतं. तसेच त्वचेचं संसर्गापासून रक्षणही करतं. चॉकलेट लहानग्यांच्या निमित्ताने घरात येणार्या चॉकलेटमध्ये घरातील प्रत्येकाचा वाटा असतो. अर्थात चॉकलेटचे चाहते हे प्रत्येक वयोगटात असतात. सर्वांची आवडती ही चॉकलेटही तारुण्य टिकविण्यास मदत करते. डार्क चॉकलेट उच्च रक्तदाब आणि वाईट कॉलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. तसेच हृदय निरोगी आणि तरुण ठेवते. चॉकलेटमुळे मेंदूला मिळणार्या रक्त पुरवठ्यातही सुधारणा होत असल्यामुळे, ते मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासही मदत करते. अर्थातच वाढत्या वयाची लक्षणं असणार्या स्मृतीभ्रंशसारख्या समस्यांची शक्यताही कमी होते. मूग मुगामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. ते शरीर सुडौल ठेवण्यास मदत करतात. तसेच मुगातील प्रथिने शरीरातील वाईट फॅट्स कमी करून स्नायूंना बळकटी देण्यास मदत करतात. यामुळे शरीराला शक्ती मिळते आणि ते तरुणही दिसते. सुरकुत्यांविरुद्ध लढा वय वाढू लागलं की सर्वांना सुरकुत्यांची काळजी अधिक अस्वस्थ करते. मग त्यासाठी प्रतिबंध म्हणून किंवा उपचार म्हणून अॅण्टी एजिंग क्रीमची वाट धरली जाते. पण आपला आहारही अॅण्टी एजिंग क्रीमसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? त्यासाठी आहारात मुद्दामहून काही घटकांचा समावेश करायला हवा. बीटा कॅरोटीन : त्वचेखाली असणारे हे बीटा कॅरोटीन त्वचेचे अतिनील सूर्यकिरणांपासून बचाव करते. स्रोत : रताळे, टोमॅटो, कलिंगड, पपई, ब्रोकोली, पालक इत्यादी. ब1 जीवनसत्त्व : वृद्धापकाळामुळे होणार्या परिणामांवर ब1 जीवनसत्त्व मात करते. तसेच ते चेतासंस्था कार्यक्षम करण्यासाठी आणि मानसिक स्थिती सुधारण्यासाठी लाभदायक आहे. याशिवाय रक्तनिर्मिती, रक्ताभिसरण आणि पचन ही कार्यं सुलभ होण्यासाठीही मदत करते. कॅलरीचे ऊर्जेत आणि एन्झाइममध्ये रूपांतर करण्यास मदत करते. स्रोत : मांस, मासे, अंडे, केळे, तृणधान्य, पीनट बटर, कडधान्यं, मटार, शेंगभाज्या, संत्री इत्यादी. द्रव पदार्थ : शरीर निरोगी आणि त्वचा नितळ व उजळ ठेवण्यासाठी शरीरातील द्रवाची पातळी योग्य राखणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या दररोजच्या आहारात द्रव पदार्थांचा समावेश भरपूर प्रमाणात व्हायला हवा. स्रोत : फळांचा रस, नारळ पाणी, ताक, लिंबूपाणी इत्यादी आणि दररोज किमान 8 ग्लास पाणी. सेलेनियम : हानिकारक अल्ट्रा व्हायोलेट किरणांचा त्वचेवर होणारा परिणाम सेलेनियम कमी करते. स्रोत : गव्हांकुर, तीळ, तृणधान्य, ओट, मका, सुकामेवा, चीझ, टुना मासा इत्यादी. झिंक : त्वचा सैल होणे व सुरकुत्या अशा वयानुरुप येणार्या समस्यांना झिंक प्रतिबंध करते. तसेच ते जखम भरून येण्यासही अतिशय मदतशीर ठरते. स्रोत : दूध, दही, अंडे, मांस, मासे, सोयाबीन, मशरूम, मसूर, मटार, द्विदल धान्ये, भोपळ्याच्या बिया, गव्हाचे पीठ इत्यादी.
Link Copied