आमिर खानने थ्री इडियट्स या चित्रपटामध्ये १८ वर्षाच्या कॉलेज तरुणाची रँचोची भूमिका साकारली होती. ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी त्याला लोकं आपल्याला हसतील अशी भिती वाटत होती. परंतु तरीही आमिरने ही भूमिका स्वीकारली यामागचे कारण त्याने नुकतेच द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये सांगितले.
आमिर भरमसाठ चित्रपट करत नाही. त्याला कथानक पसंत पडले तरच तो चित्रपट करतो आणि म्हणूनच त्याला परफेक्शनिस्ट असं म्हणतात. तो चित्रपटातील आपली व्यक्तिरेखा अतिशय विचारपूर्वक स्वीकारतो. त्याने राजू हिरानी यांच्या थ्री इडियट्समध्ये १८ वर्षांच्या रँचोची भूमिका केली होती. त्यावेळेस आमिर खानचं खरं वय ४४ होतं. चित्रपटाच्या उत्तरार्धात तो फुनसुक वांगडू या व्यक्तिरेखेत दिसला होता. आपण तरुण व्यक्तिरेखा साकारण्यासाठी योग्य नाही, त्यासाठी कोणत्यातरी तरुण कलाकाराची निवड करावी, असं आमीरचं मत होतं. परंतु दिग्दर्शक राजू हिरानीने ते मान्य केलं नाही. आमीरला या व्यक्तीरेखेसाठी तयार करण्यास त्याला खूप प्रयत्न करावे लागले होते.
आमीर म्हणाला, मी तर थ्री इडियट्स करणारच नव्हतो, कारण मी तेव्हा ४४ वर्षांचा होतो आणि मला १८ वर्षाच्या तरुणाचा रोल करायचा होता, पब्लिक मला हसेल असं मला वाटायचं. थोडं विचित्र होतं. मी राजूला सांगितले की, तू तीन तरुण कलाकारांना घे पण त्याने माझा पिच्छा सोडला नाही. मी यापूर्वी कधीही राजूसोबत काम केलं नव्हतं. पण मी नेहमी त्याचा चाहता होतो. राजू माझ्याकडे जी कथा घेऊन आला, ती वाचल्यानंतर ही तरुण व्यक्तीरेखा मी कशी करणार अशा संभ्रमात मी होतो.
आमिर पुढे म्हणाला, चित्रपटामध्ये माझी एक लाइन आहे, ‘यशाच्या मागे धावू नका, काबिल बना, यश तुमच्या मागे येईल.’ हा राजूचाच विचार होता. राजू बोलला, “तू असे चित्रपट केले आहेस की जे कधीही हिट होऊ शकणार नव्हते. तारे जमीन पर, लगान यांसारखे चित्रपट हे त्यांची घोषणा झाली त्यावेळीच फ्लॉप होते. हे चित्रपट तू का केलेस? तूला यश मिळावं म्हणून तू हे चित्रपट केले नाहीस. ती तूझी पॅशन होती. तू ते केलेस आणि त्यामुळे ते यशस्वी ठरले. आतापर्यंतचं तूझं पूर्ण करियर हेच दर्शवितं. असं असताना तू जर हे वाक्य बोललास तर लोक विश्वास ठेवतील.”
त्याचं अशाप्रकारे मला होकारासाठी तयार करणं पाहिल्यानंतर मला राजू खरोखर एक चांगला दिग्दर्शक आहे असं वाटलं. कारण जोपर्यंत माझा विश्वास बसत नाही तोपर्यंत मी सिनेमा स्वीकारत नाही. ही पहिली वेळ असेल ज्यावेळेस मी फक्त त्याच्यासाठी डोळे झाकून चित्रपट स्वीकारला.
आणि रिझल्ट आपल्या सगळ्यांना माहितच आहे. थ्री इडियट्स हा २००९ सालातला सगळ्यात हीट चित्रपट होता. चित्रपटामध्ये आमिर खानसोबत आर माधवन, शरमन जोशी, करीना कपूर आणि बोमन ईराणी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.