संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या सीरिजमध्ये आलमजेबची भूमिका साकारणारी शर्मिन सेहगल ही त्यांची बहीण बेला सेहगल यांची मुलगी आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी : द डायमंड बझार' ही सीरिज सध्या प्रचंड गाजली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमधील आलमजेबच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या अदा, लूक आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की तिची आईही संजय भन्साली यांची बहीण बेला सेहगल आहे. पण बेला सेहगल आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया आलमजेबच्या आईविषयी…

बेला सेहगल यांच्या कामाविषयी

बेला सेहगलने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात भाऊ संजय सोबतच केली आहे. तिने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'खामोशी: द म्युझिकल' (१९९६), 'हम दिल दे चुके सनम' (१९९९), 'देवदास' (२००२), 'ब्लॅक' (२००५) आणि 'सांवरिया' (२००७) या चित्रपटांसाठी बेलाने संजय यांच्यासोबत काम केले आहे.

२०१२ मध्ये बोमन इराणी आणि फराह खान अभिनीत 'शिरीन फरहाद की तो निकल पडी' या रोमँटिक विनोदी चित्रपटातून बेलाने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा चित्रपट दक्षिण मुंबईतील पारशी समुदायावर आधारित असून ४० वर्षांहून अधिक वयाच्या दोन पारशी लोकांच्या प्रेमात पडण्याभोवती फिरतो.