शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी जगभरात ‘इंटरनॅशनल चाइल्डहूड कॅन्सर अवेअरनेस डे’ साजरा करण्यात आला. त्याचा एक भाग म्हणून मुंबईच्या हाजी अली स्थित नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये बालपणीच्या कर्करोगाने पीडित योद्धांनी आपले शौर्य व कलागुण सादर करणारा ‘मुस्कान की मेहफिल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये या तरुण पीडित मुलांनी संगीत, नृत्य, चित्रकला, वेशभूषा सादर करून आनंद मिळवला. प्रवक्त्यांनी प्रेरणादायी भाषणे केलीत व प्रमुख अतिथींनी विजेत्यांना सन्मानित केले.


“दरवर्षी जगभरात सुमारे ४ लाख मुलांचे कर्करोग निदान होते. त्यापैकी एकट्या भारतात ६० हजारांहून अधिक नवीन केसेस आढळून येतात. या कर्करोग दिनाच्या निमित्ताने समाजात जागरुकता निर्माण केली जाते. हे या दिवसाचे ध्येय आहे. निदान झालेल्यांपैकी सगळेच हॉस्पिटलात जात नाहीत. त्यात असमानता आहे. मात्र आमच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना मदत मिळते, संगोपन केले जाते,” अशी माहिती एसआरसीसी हॉस्पिटलच्या विभाग प्रमुख डॉ. पुमा कुरकुरे यांनी दिली. तसेच आमच्या देणगीदारांपैकी प्रमुख स्व. गायक पंकज उधास होते, असे सांगून त्यांच्या पत्नी नायाब उधास व इतर देणगीदारांचा सत्कार केला.

सदर हॉस्पिटलचे डॉ. किर्ती हेगडे व डॉ. झुबीन परेरा यांनी पण समयोचित मार्गदर्शन केले. गणेश वंदनाने कार्यक्रमाची सांगता झाली.