Close

खंडोबाच्या गडावर त्रिलोकाचे दर्शन (Khandobachya Gadavar Trilokache Darshan)

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात केवळ महाशिवरात्रीलाच घडते स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताळ लोक अशा त्रिलोकातील स्वयंभू शिवलिंगांचे दर्शन. हर हर महादेवऽऽ’ ‘सदानंदाचा येळकोटऽऽ’… महाशिवरात्रीनिमित्त सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा परिसर या जयघोषाने निनादतो. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त हजारोंच्या संख्येने भाविक खंडोबाच्या दर्शनाला येतात. कारण या दिवशी इथे स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताळ लोक अशा त्रिलोकातील स्वयंभू शिवलिंगांचे अनोखे दर्शन घडते.
जेजुरी गडावरील खंडोबाच्या मुख्य मंदिराच्या गर्भगृहात पाताळ लोकाचे शिवलिंग, गाभार्‍यामधील मुख्य शिवलिंग आणि मंदिराच्या कळसामधील स्वर्ग लोकाचे शिवलिंग अशी स्वयंभू शिवलिंग आहेत. मात्र यांपैकी केवळ मुख्य गाभार्‍यातील शिवलिंगच वर्षभर भाविकांना दर्शनासाठी खुले असते आणि पाताळ लोक व स्वर्ग लोक ही दोन्ही गुप्तलिंगे वर्षातून केवळ एकदाच, अर्थात महाशिवरात्रीलाच उघडली जातात.


त्यामुळे ही पर्वणी साधण्यासाठी भाविक मध्यरात्रीपासून गडावर हजर होतात.
महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री साधारण बारा-एक वाजता गर्भगृहातील पाताळ लोकाचे शिवलिंग
खुले करून, त्याची विधिवत पूजा करण्यात येते. त्यानंतर साधारण दीड-दोनच्या सुमारास मुख्य कळसामधील स्वर्ग लोकाच्या शिवलिंगाची विधिवत पूजा-अभिषेक होतो व गडाचे दरवाजे उघडण्यात येतात. हे सर्व अनुभवण्यासाठी रात्रीच्या या प्रहरीही मोठ्या संख्येने भाविक गडावर उपस्थित असतात.
मुख्य स्वयंभू खंडोबाचे दर्शन झाल्यावर, तेथेच उत्तर बाजूस असणार्‍या पाताळातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी तळघरात उतरावे लागते. त्याच्या दर्शनासाठी भाविकांना कर्मचार्‍यांच्या मदतीने तळघरात सोडले व पुन्हा वर काढले जाते. स्वर्ग लोकातील शिवलिंगाच्या दर्शनासाठी उंच शिडी चढून मंदिराच्या शिखरावर जावे लागते. मुख्य मंदिराच्या शिखरातील गर्भगृहात हे शिवलिंग आहे.


वर्षभरातून केवळ एकदाच उघडली जाणारी ही गुप्तलिंगे महाशिवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी रात्री बारा वाजता दगडी शिळा ठेवून बंद करण्यात येतात नि खंडोबाच्या मंदिरातील या अनोख्या महाशिवरात्र उत्सवाची सांगता होते.

Share this article