विद्यार्थ्यांचा एक गट नृत्याच्या स्पर्धेत भाग घेतो आणि पहिले बक्षीस पटकावतो. जागतिक परिषदेसाठी त्यांची निवड झाली असून भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे, असे एका वृत्तपत्राचा वार्ताहर त्यांना सांगतो. पण भारत म्हणजे काय, हे जगासमोर तुम्ही कसे मांडाल, असा प्रश्न तो करतो. अन् त्या विद्यार्थ्यांजवळ त्याचे उत्तर नसते, म्हणून तो भारताचा शोध घेण्याची सूचना त्या विजेत्या विद्यार्थ्यांना करतो.
भारताचा शोध घेण्यासाठी मुलांच्या या गटाचा जादुई प्रवास सुरू होतो. कारण त्यांना एका जादुच्या झाडात ‘द कॉन्फरन्स ऑफ द बर्ड’ हे गूढ पुस्तक सापडते. परदी उद – दिन अत्तर या कवीने लिहिलेल्या या पुस्तकातील पक्ष्यांकडून प्रेरणा घेऊन त्यांचा प्रवास पुढे जातो. विविध पक्ष्यांच्या रुपात, पुस्तकातील संकेतांच्या आधारे समता, न्याय, बंधुत्व आणि स्वातंत्र्य यांच्या सांकेतिक दऱ्यांमधून ते जातात. अखेरीस त्यांना भारताचा शोध लागतो.
इंडिया या इंग्रजी शब्दातील आय ॲन्ड आय, फ्लाय इंडिया फ्लाय, आय ॲन्ड आय मेकअप इंडिया; असा अर्थबोध या पक्षीरुपी विद्यार्थ्यांना होतो. असे प्रबोधनपर कथानक या इंग्रजी संगीतिकेत मांडण्यात आले आहे. लहान कलाकारांचा सांघिक अभिनय, नृत्य आणि गायनामधील एकरुपता वाखाणण्याजोगी आहे.
शाळकरी मुलांच्या शिक्षणविश्वात क्रांती आणण्याच्या उद्देशाने झटणाऱ्या ‘टीच फॉर इंडिया’ या सेवाभावी संस्थेने हा संगीत जलसा उत्कृष्टपणे सादर केला आहे. उच्च निर्मितीमूल्ये, तांत्रिक करामती व नेपथ्य यात कसलीच कसूर ठेवलेली नाही. कृत्तिका रावत यांच्या नेतृत्वाखाली ‘द कॉन्फरन्स ऑफ द बर्डस्’ हा जलसा सादर केला जात असून कौटिल्य जैन आणि प्रियंका पाटील यांचे दिग्दर्शन आहे. तर कथा व संहिता शाहीन मिस्त्री आणि प्रियंका पाटील यांनी लिहिली आहे. अनुराज भगत व निमो पटेल यांच्या श्रवणीय संगीताची जोड त्यास लाभली आहे. या कार्यक्रमाचे समर्थक जेएसडब्लू फाऊंडेशन आहे. १८ महिन्यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम साकारला आहे. मुंबईमध्ये उत्तम प्रयोग सादर केल्यानंतर पक्ष्यांची ही परिषद जुलैमध्ये बेंगलुरू व ऑगस्ट महिन्यात दिल्लीमध्ये सादर करण्यात येईल.
या नवीन सुफी आणि हिप-हॉप साऊंड ट्रॅकवर सादर झालेल्या कार्यक्रमातील गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उद्योगपती नादिर गोदरेज, अभिनेता बोमन इराणी, रजित कपूर, तारा शर्मा आणि संगीतकार ए. आरी. रहमान आले होते. रहमान म्हणाले, “मी ज्याचा चाहता आहे त्या सुफीसारख्या साहित्याचा ‘कॉन्फरन्स ऑफ बर्ड’ मध्ये समावेश करणे; हे महत्त्वाकांक्षी व धाडसी पाऊल आहे.”