अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या आणि अनाथांची माय या नावानेच ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित असलेली ‘सिंधुताई माझी माई’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. १५ ऑगस्टला ‘कलर्स मराठी’वर सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता मालिकेचं नवं पर्व सुरू होणार आहे. याचा प्रोमो समोर आला असून मोठी चिंधी कोण साकारणार हे आता उघडं झालं आहे.
‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत सुरुवातीला छोट्या चिंधीची गोष्ट दाखवण्यात आली होती. पण लवकरच आता मालिकेचं नवं पर्व सुरू होणार आहे. छोटी चिंधी मोठी दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोठी चिंधी कोण साकारणार याची चर्चा सुरू होती. पण आता नव्या प्रोमोमधून मोठी चिंधी कोण साकारणार हे उघडं झालं आहे.
‘राजा रानीची गं जोडी’ फेम अभिनेत्री शिवानी सोनार ही मोठ्या चिंधीच्या अर्थात सिंधुताईंच्या भूमिकेत झळकणार असल्याचं मालिकेच्या नव्या प्रोमोमधून स्पष्ट झालं आहे. ‘कलर्स मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपासून मालिकेचं नवं पर्व सुरू होणार आहे. ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत अभिनेते किरण माने यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री योगिनी चौक सिंधुताईंच्या आईच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच प्रिया बेर्डे यांनी सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे यांची भूमिका साकारली आहे.