गायक आदित्य नारायण सध्या चर्चेत आहे.त्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, त्यात तो लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याचा फोन हिसकावून फेकताना दिसला. त्याच्या या वागण्यावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली. या घटनेवर त्याच्या इव्हेंट मॅनेजरने प्रतिक्रिया दिली होती. आता गायकाचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
आदित्य नारायणने कॉन्सर्टच्या वादावर आपली प्रतिक्रिया देताना टाईम्स नाऊला सांगितले की, 'खरं सांगायचं तर मला यावर काहीच बोलायचे नाही, मी केवळ देवाला उत्तर देण्यास बांधील आहे... बस आता मी एवढंच बोलू शकतो...’
आदित्य नारायणच्या मॅनेजरने या प्रकरणावर भाष्य केले होते. मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, ती व्यक्ती कॉलेजची नसून बाहेरील होती. तसेच ती व्यक्ती सतत आदित्यचे पाय ओढत असल्याचे टीमकडून सांगण्यात आले. त्याने अनेकदा फोनही पायावर फेकला होता. यामुळे गायकाचा संयम सुटला.
या घटनेशिवाय संपूर्ण कॉन्सर्टमध्ये सर्व काही व्यवस्थित पार पडल्याचेही टीमकडून स्पष्ट करण्यात आले. या घटनेनंतरही २ तास कॉन्सर्ट सुरूच होता. जर ती व्यक्ती कॉलेजची असती आणि त्याच्यासोबत काही चूकीचे झाले असते तर त्याने प्राधिकरणाकडे तक्रार केली असती, जी त्याने केलीच नाही!