सध्या रणबीर कपूर - आलिया भट्ट मनोरंजन विश्वात चांगलेच चर्चेत आहेत. रणबीर कपूरचा अॅनिमल सिनेमा सध्या गाजतोय. तर आलिया सुद्धा गंगूबाई काठियावाडी, रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमातून चांगलीच लोकप्रिय झाली. एकंदरीतच २०२३ साल हे उभयतांसाठी यशस्वी ठरलं आहे.
रणबीर - आलियाला राहा ही मुलगी आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. राहाच्या जन्मानंतर रणबीर - आलियाने तिला समाजमाध्यमांपासून काहीसं दूर ठेवलं होतं. पण आज ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर - आलियाने लेकीला सर्वांसमोर आणलंय. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.
रणबीर - आलिया हे दोघं आज ख्रिसमसच्या निमित्ताने मीडियासमोर आले. पण यावेळी त्यांच्यासोबत त्यांची लेक राहा होती. राहाला रणबीरने कडेवर घेतलं होतं. राहा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुपच क्यूट दिसत होती. तिने तिच्या नाजूक हातांनी आई - बाबांचा चेहरा पकडला होता. समोर असलेली मीडिया राहाचं कौतुक करत होतं. रणबीर - आलिया सुद्धा सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते.
आलिया आणि रणबीरने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती. रणबीरच्या मुंबईतील 'वास्तू' या निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर जवळपास २ महिन्यानंतर आलियाने आई होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली अन् त्यानंतर ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियानं एका परिला जन्म दिला. तिचं नाव ठेवण्यात आलं राहा. नाव समोर आल्यानंतर तिच्यावर कौतूक आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला. राहा एक वर्षांची झाल्यानंतर ती मिडियासमोर येईल असं वाटलं होतं. परंतु त्यावेळीही तिला पाहता आलं नाही. परंतु आज मात्र चाहत्यांची ती इच्छाही पूर्ण झाली आहे.