Close

अनुष्का शर्मा तिच्या दुसऱ्या बाळाला परदेशात जन्म देणार का? (Are Anushka Sharma, Virat Kohli planning to have second baby in London?)

अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहे. त्यातच विराटसुद्धा क्रिकेट सामन्यांपासून दूर आहे. आता एका प्रसिद्ध बिझनेसमनच्या पोस्टनंतर पुन्हा एकदा अनुष्काच्या प्रेग्नंसीबद्दल चर्चा होऊ लागली आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनुष्का आणि विराट माध्यमांपासून दूर आहेत. त्यातच विराटने टेस्ट मॅचमधूनही ब्रेक घेतला आहे. कौटुंबिक कारणास्तव तो मॅच खेळत नसल्याचं म्हटलं गेलंय. तर विराट त्याच्या कुटुंबीयांसोबत परदेशात असल्याचीही जोरदार चर्चा आहे. दुसऱ्या प्रेग्नंसीबद्दल अद्याप अनुष्का किंवा विराटकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र यादरम्यान अनुष्का तिच्या दुसऱ्या बाळाला परदेशात जन्म देणार असल्याचं कळतंय. सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे.

बिझनेसमन हर्ष गोयंका यांनी एक्सवर (ट्विटर) यासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. ‘आता काही दिवसांतच एका बाळाचा जन्म होणार आहे. आता फक्त हे पहायचं आहे की तो बाळ वडिलांसारखा मोठा क्रिकेटर बनणार की आईसारखं चित्रपटांमध्ये करिअर करणार’, असं त्यांनी लिहिलं आहे. यासोबतच बाळाचा जन्म लंडनमध्ये होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. या पोस्टमध्ये त्यांनी थेट विराट किंवा अनुष्काचा उल्लेख केला नाही. मात्र ही पोस्ट विराट-अनुष्काबद्दल असू शकते, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत विराट-अनुष्काविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर आणि विराटचा मित्र एबी डिविलियर्सने त्याच्या युट्यूब चॅनलवर मोठा खुलासा केला होता. विराट दुसऱ्यांदा पिता बनणार आहे आणि तो सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करत आहे, असं म्हणत त्याने विराट आणि अनुष्का शर्माच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक एबी डिविलियर्सने त्याच्या या वक्तव्यापासून माघार घेतली होती. इतकंच नव्हे तर त्याने चाहत्यांची माफीसुद्धा मागितली होती. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि मी विराटबद्दल जे बोललो, ते चुकीचं होतं, असं त्याने स्पष्ट केलं होतं.

२०२० मध्ये विराट-अनुष्काने चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. जानेवारी २०२१ मध्ये अनुष्काने मुलीला जन्म दिला. विराट-अनुष्काच्या मुलीचं नाव वामिका असं आहे. आता या दुसऱ्या प्रेग्नंसीबाबतच्या चर्चांवर विराट किंवा अनुष्का काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Share this article