मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा ५८ आणि ५९ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यात ‘बापल्योक’ चित्रपटाने आपली विशेष छाप पाडली. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या द्वितीय पुरस्कारासह ‘बापल्योक’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (द्वितीय), संवाद, पार्श्वसंगीत, कथा, गीत, सहाय्य्क अभिनेता अशा तब्ब्ल ७ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.
आपल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने हे तिघंही सांगतात की, ‘उत्तम आशयसंपन्न कलाकृतीसाठी एकत्र येत आम्ही ‘बापल्योक’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला.वेगवेगळ्या राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाने यशाची मोहोर उमटवली असतानाच, मानाच्या राज्य शासनाच्या ५८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये मिळालेले यश आम्हाला अनेक नव्या चांगल्या कलाकृतींसाठी बळ देणारं आहे.
मराठी चित्रपट चांगल्या आशय विषयांवर चालतात हे लक्षात घेऊनवेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा यापुढेही मानस असल्याचे निर्माते विजय शिंदे सांगतात. या पुरस्काराबद्दल बोलताना दिग्दर्शक मकरंद माने म्हणाले कि ‘बापल्योक’ सारखी मनस्वी दमदार कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचावी यासाठी घेतलेल्या अथक मेहनतीचे चीज होताना दिसतेय. अशा पुरस्कारांमुळे काम करायला ऊर्जा मिळते. या पुरस्कारासाठी मी शासनाचा आणि माझ्या आजवरच्या वाटचालीत साथ देणाऱ्या सर्वांचा मी ऋणी आहे.
‘बापल्योक’ चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.