१३ मे रोजी मुंबईत मोठ्या वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक ओढावलेल्या या संकटामुळे सगळीकडेच हाहाकार माजला. उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या काही मुंबईकरांना त्या हवेच्या जोरदार झुळकेचा दिलासा वाटला तर काहींना जीव गमवावा लागला. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग पडून ७4 हून अधिक जखमी तर १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या अपघातग्रस्त घटनेवर सोनी राजदान आणि विजय वर्मा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
या घटनेची क्लिप शेअर करत विजय वर्माने खेद व्यक्त केला आणि लिहिले, 'अरे नाही.' ही बातमी शेअर करताना सोनी राजदानने याला 'भयानक' म्हटले आहे. या घटनेनंतर एनडीआरएफची टीम बचावकार्यासाठी पोहोचली. आणि खाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. यात काहीजण जखमी तर काहींचा मृत्यू झाला.
पेट्रोल पंपाजवळील जाहिरातीचे होर्डिंग बेकायदेशीरपणे लावण्यात आल्याचे बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'ला सांगितले. ते म्हणाले की, 'घाटकोपरमध्ये जे होर्डिंग लावण्यात आलेले ते परवाना नसल्यामुळे बेकायदेशीर होते. आम्ही मुंबईतील सर्व होर्डिंग्जचे परवाने तपासू आणि त्यांच्याकडे परवाना नसल्यास ते बेकायदेशीर मानले जाईल.