Close

‘मी जिवंत असेपर्यंत श्रीदेवीचा बायोपिक होऊ देणार नाही’; असं का म्हणाले बोनी कपूर? (Boney Kapoor Reveals If He Ever Wants To Make A Biopic On Sridevi Says Till The Time I Have Alive)

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची मध्यंतरीच्या काळात जोरदार चर्चा होती. त्यावर आता निर्माते बोनी कपूर यांनी, ‘मी जिवंत असेपर्यंत तिचा बायोपिक होऊ देणार नाही,’ असं म्हटलं आहे. असं का म्हणाले असतील बोनी कपूर? जाणून घेऊया.

निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. बोनी कपूर हे विवाहित असताना श्रीदेवी यांच्या प्रेमात पडले होते. श्रीदेवी यांचं मन जिंकण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न आणि प्रतीक्षासुद्धा केली. १९९६ मध्ये या दोघांनी लग्न केलं. त्यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. मात्र २०१८ मध्ये दुबईत एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवी यांचं निधन झालं. बोनी कपूर हे आजसुद्धा जेव्हा श्रीदेवी यांच्याबद्दल बोलू लागतात, तेव्हा त्यांच्या मनातील भावना डोळ्यांत स्पष्ट दिसून येतात. सध्या बोनी कपूर हे ‘मैदान’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये जेव्हा श्रीदेवी यांचा उल्लेख झाला, तेव्हा ते भावूक झाले होते.

एका मुलाखतीत श्रीदेवी यांच्या आयुष्यावर कधी बायोपिक काढण्याचा विचार आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना बोनी कपूर म्हणाले, “श्रीदेवीला तिचं खासगी आयुष्य खासगीच ठेवायला आवडायचं. त्यामुळे तिच्या निधनानंतरही या गोष्टीचं पालन झालं पाहिजे. मला वाटत नाही की तिच्या आयुष्यावर कधी बायोपिक येईल. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत तरी मी बायोपिक काढण्यास संमती देणार नाही.”

श्रीदेवी यांच्या आधी बोनी कपूर यांनी मोना शौरी यांच्याशी लग्न केलं होतं. १९८३ पासून १९९६ पर्यंत दोघं एकत्र होते. मात्र नंतर श्रीदेवी यांच्याशी लग्न करण्यासाठी बोनी कपूर यांनी मोना यांना घटस्फोट दिला. मोना आणि बोनी यांना अर्जुन आणि अंशुला ही दोन मुलं आहेत. दुसऱ्या लग्नानंतर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया कशी होती, याविषयीही ते एका मुलाखतीत व्यक्त झाले. “मी त्याच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी त्याच्या रागाला किंवा वागणुकीला उलट उत्तर देणं टाळलं होतं. कारण तो असं का वागतोय, हे मला माहित होतं”, असं ते म्हणाले.

श्रीदेवी यांच्याशी दुसऱ्या लग्नानंतर मुलगा अर्जुन आणि मुलगी अंशुला यांनी वडील बोनी कपूर यांच्याशी बोलणं बंद केलं होतं. आपल्या वडिलांनी आईला सोडून दुसरं लग्न केलं, याचा प्रचंड राग अर्जुनच्या मनात होता. यामुळे पिता-पुत्राच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. कारण अर्जुनला आपल्या आईचं दु:ख सहन झालं नाही.

Share this article