सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी काल समोर आली आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी आत्महत्या केली. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी हादरली आहे. ते 58 वर्षांचे होते. नितीन देसाई हे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक तसेच निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेते होते. काही दिवसांपूर्वी नितीन देसाई यांच्यावर 51 लाखांच्या फसवणुकीचा आरोप झाला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीन देसाई यांनी कर्जतजवळील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी सफाई कर्मचाऱ्यांना ते अशा अवस्थेत दिसले, त्यानंतर लगेच स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.
गेल्या महिन्यातच, आगामी गणेश चतुर्थी सणानिमित्त नितीन देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओमध्ये पूजा केली. ते मुंबईतील प्रतिष्ठित गणपती मंडळ लालबागच्या राजासाठी सजावटीचे काम करत होते. याशिवाय नितीन देसाई महाराणा प्रताप यांच्या नवीन शोमध्ये व्यस्त होते, जो ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार होत होता.
नितीन देसाई हे इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. कला दिग्दर्शनासारख्या वेगळ्या क्षेत्रात त्यांनी मोलाचे काम केले आहे. नितीनने हम दिल दे चुके सनम, लगान, देवदास, जोधा अकबर आणि प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचे सेट डिझाइन केले. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
नितीन देसाई एनडी स्टुडिओचे मालक होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 250 जाहिरात चित्रपट, 180 चित्रपट आणि 100 टीव्ही शोमध्ये कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यांना 4 राष्ट्रीय, 9 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. नितीन देसाई यांच्या नावावर भारतातील सर्वात मोठा चित्रपट सेट बांधण्याचा विक्रम आहे. एवढ्या महान व्यक्तिमत्वाच्या जगातून अचानक जाण्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वी एका जाहिरात संस्थेने देसाई यांच्यावर ५१.७ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तीन महिने काम करूनही देसाई यांनी पैसे दिले नसल्याचा दावा त्या एजन्सीने केला होता. मात्र, नितीन देसाई यांनी हे आरोप फेटाळून लावले.