Close

ब्रेस्ट कॅन्सरवर मात केलेल्या अभिनेत्री महिमा चौधरीचा महिलांनी स्वतः चाचणी करावी, या मोहिमेत पुढाकार (Breast Cancer Survivor Actress Mahima Chaudhary Joins ‘ Thanks A Dot’ Initiative For Self- Breast Examination And Early Detection Of Cancer)

गोड चेहऱ्याची, एकेकाळी आघाडीची अभिनेत्री महिमा चौधरी हिला स्तनाचा कॅन्सर झाला. अन्‌ तिचे आयुष्य ढवळून निघाले. आपण सुरुवातीला हादरून गेलो होतो, अशी कबुली देत तिने महिलांना दिलासा देत सांगितले की, “दरमहा आपण स्वतः छातीत गाठ आहे किंवा नाही, याची चाचणी केली तर त्यावर सहज मात करता येते. आपल्याकडील महिलांना या बाबतीत टाळाटाळ करण्याची प्रवृत्ती असते. ती त्यांनी सोडावी. या संदर्भात ‘थँक्स ए डॉट’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होणे हे माझे भाग्य आहे.”

ऑक्टोबर महिना हा स्तनांच्या कॅन्सरबाबत जागरूकता करण्याचा महिना मानला जातो. त्याचे औचित्य साधून एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या वतीने महिलांनी स्वतःची चाचणी करावी व या रोगाचे लवकर निदान करून घ्यावे, या हेतुने ‘थँक्स एक डॉट’ ही मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये मासिक पाळीच्या काळात महिला मोठ्या प्रमाणात गरम पाण्याची रबरी पिशवी वापरून पोट व ओटीपोटाच्या वेदना शमवितात. तशीच हॉट वॉटर बॅग – परंतु ती छातीवर धरून स्तनात गाठ आहे की नाही, याची चाचपणी करणारी – बॅग त्यांनी निर्माण केली आहे. त्याचे अनावरण महिमा व ज्येष्ठ कॅन्सर सर्व्हायवर व समाजसेविका देविका भोजवानी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी देविका भोजवानी यांनी आपल्याला २० वर्षांपूर्वी स्तनांचा कॅन्सर झाला होता. त्यावर वेळीच उपचार केल्याने जीव वाचविला व मी अद्याप निरोगी असल्याचा निर्वाळा दिला. “स्तनांचा कॅन्सर झालेल्या महिलांना वाऱ्यावर सोडण्याची काही नातेवाईकांची प्रवृत्ती असते, अशा महिलांसाठी मदतकार्य मी सुरू केलं.”

पूर्वी आपली आजी-आई गरम पाण्याच्या बाटलीने मासिक पाळी दरम्यान शेक घेण्यास सांगत. तीच कल्पना घेऊन आता जी हॉट वॉटर बॅग योजना लागू करण्यात आली आहे, तिची निकड असल्याचे देविका यांनी सांगितले. त्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या वुमन कॅन्सर इनिशिएटिव्ह विभागाच्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत. बेस्ट ऑनकोप्लास्टिक सर्जन असलेल्या डॉ. नीता नायर यांनी या प्रसंगी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. “आपण कॅन्सर टाळू शकत नाही, पण त्याला वेळीच रोखू शकतो.” असे सांगून त्यांनी दरमहा छातीची तपासणी करण्याचे महिलांना आवाहन केले.

आपल्याकडे ब्रेस्ड कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. पण वेळीच निदान झाल्यास त्यावर मात करता येते, असे सांगून एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे चीफ ऑफ ब्रॅन्ड रविन्द्र शर्मा यांनी आपल्या कंपनीने सदर हॉट वॉटर बॅग आणली आहे. हा प्रयोग जगात पहिल्यांदाच होत असल्याचा दावा केला. कंपनीने ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तनांची स्वतः चाचणी करण्याबाबत जागृती केली असल्याचे सांगून ही बॅग कशी वापरता येईल, त्याची माहिती दिली.

Share this article