अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा सुपरहिट चित्रपट 'बंटी और बबली'चे दिग्दर्शक शाद अली यांनी कोर्टात धाव घेतली आहे. दिग्दर्शकाने आपल्या दोन जुन्या सहकाऱ्यांविरोधात स्क्रिप्ट चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शाद अली यांच्या जुन्या भागीदारांनी स्क्रीन रायटर्स असोसिएशन आणि अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट स्वतःची म्हणून दाखवली असा आरोप त्यांनी केला आहे.
'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, शाद अली यांनी यासंदर्भात मुंबई न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या दोन्ही माजी सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. 'साथिया' आणि 'ओके जानू' सारखे सिनेमे बनवणाऱ्या शाद अलीच्या वकिलाने कोर्टात सांगितले की, 'माझ्या क्लायंटने अनेक वर्षे स्क्रिप्टवर मेहनत घेतली. दोन्ही आरोपी त्यांचे पूर्वीचे भागीदार होते, त्यामुळे त्यांना ही स्क्रिप्ट दाखवण्यात आली होती. तेव्हा दोन्ही आरोपींनी स्क्रिप्टमध्ये काही चांगले बदल करू, असे आश्वासन दिले होते. त्यासाठी दोघांना ९०-९० हजार रुपयेही देण्यात आलेले.
वकिलाने पुढे सांगितले की, स्क्रिप्टच्या चोरीची माहिती मिळाल्यानंतर शाद अलीने दोघांची चौकशी केली तेव्हा आरोपींनी त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. हे प्रकरण सोडवायचे असेल तर ५ कोटी द्या, असेही ते म्हणाले.