Close

सोळा वर्षानंतर आमिरच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ नावाच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार दर्शिल सफारी (Darsheel Safary Will Be Reuniting With His Taare Zameen Par Co-Star Aamir Khan After 16 Years)

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा तारे जमीन पर ज्यांनी पाहिला असेल त्यांना दर्शिल सफारीची ओळख करुन देण्याची गरज नाही. त्या चित्रपटामध्ये त्यानं ईशान अवस्थी नावाच्या मुलाची भूमिका केली होती. आता तब्बल १६ वर्षानंतर आमिरच्या एका नव्या चित्रपटातून दर्शिल कमबॅक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

दर्शिलनं त्याच्या इंस्टा अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यानं आमिर खानसोबतचा फोटो पोस्ट करत तारे जमीन पर मधला त्याचा आणि आमिरचा लूक याविषयी चाहत्यांना सांगितलं आहे. १६ वर्षानंतर दर्शिल पुन्हा आमिरच्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे अशी बातमी समोर येताच चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. २००७ मध्ये आलेल्या तारे जमीन पर नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

त्या चित्रपटामध्ये आमिर खाननं निकुंभ नावाच्या शिक्षकाची भूमिका करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाईही केली होती. खास करुन आमिर आणि दर्शिल सफारीच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंत केले होते.

आमिर खानने त्याच्या तारे जमीन पर नावाच्या चित्रपटाचा सिक्वेल सितारे जमीन पर म्हणून नवी कलाकृती समोर घेऊन येणार असल्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षीपासून आमिरच्या या नव्या प्रोजेक्टविषयी चर्चा रंगली होती. त्याचा हा चित्रपट येत्या वर्षातील ख्रिसमसला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. यात दर्शिलनं आमिरसोबत शेयर केलेल्या एका फोटोमुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे.

आमिर आणि दर्शिलचा इंस्टावरील तो फोटो चर्चेचा विषय आहे. त्यात त्यानं एका तारे जमीन पर मधील सीन पोस्ट करत चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला आहे. त्या दोन्ही फोटोंमधील आमिर अन् दर्शिलचा लूक खास आहे. त्यानं कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मोठी धमाल आहे... १६ वर्षांनी आम्ही पुन्हा एकत्र येतो आहोत. हा खूपच मोठा रंजक अनुभव असणार आहे.

दर्शिलच्या त्या पोस्टवर त्याला चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझर्सनं कमेंट करत त्याला म्हटले आहे की, आम्ही तुला पुन्हा एकदा आमिर सोबत स्क्रिन शेयर करताना पाहण्यास उत्सुक आहोत. तुझ्या या आगामी प्रोजेक्टला खूप साऱ्या शुभेच्छा.

Share this article