करण जोहरचा ‘कॉफी विथ करण 8’ या लोकप्रिय चॅट शो नुकताच सुरू झाला आहे. या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. या दोघांच्या लग्नाला पाच वर्षे झाली आहेत. इटलीतील लेक कोमो या ठिकाणी अत्यंत शाही पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला होता. त्याचे फोटो चाहत्यांना सोशल मीडियावर पहायला मिळाले होते. मात्र पाच वर्षांनंतर आता रणवीर-दीपिकाच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘कॉफी विथ करण 8’मध्ये या दोघांनी लग्नाचा व्हिडीओ दाखवून आपल्या चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं आहे. प्रेम, सेलिब्रेशन आणि इमोशन्स यांनी भरलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळेच गहिवरले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
त्यांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शो चा होस्ट करण जोहर देखील भावूक झाला. दीपवीर यांच्यातील बाँडिंग पाहिल्यानंतर करणलाही त्याच्या जीवनात पार्टनरची कमतरता जाणवू लागल्याचे त्याने म्हटलं आहे.
या व्हिडीओची सुरुवात साखरपुड्याच्या पार्टीने होते. रणवीर दीपिकासमोर त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली देतो. त्यानंतर दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण म्हणतात की, रणवीर त्यांच्या बोरिंग फॅमिलीमध्ये उत्साह घेऊन आला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर-दीपिकाच्या लग्नातील सर्व फंक्शन्सची झलक दाखवण्यात आली आहे. मेहंदीच्या कार्यक्रमात रणवीर दीपिकाची काळजी घेताना दिसत आहे. त्यानंतर रणवीरचा जबरदस्त डान्ससुद्धा या व्हिडीओत पहायला मिळतो. रणवीर आणि दीपिकाचं लग्न दोन्ही पद्धतीने झालं होतं. या दोन्ही पद्धतींच्या विधींची झलकसुद्धा त्यात पहायला मिळतेय.
इटलीतील लग्नसोहळ्याला मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती होती. त्यानंतर दीपिका – रणवीरने बेंगळुरू आणि मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
कॉफी विथ करणमध्ये या दोघांनी त्यांच्या साखरपुड्याबद्दलही खुलासा केला. २०१५ मध्ये तुम्ही दोघांनी साखरपुडा केला होता का, असा प्रश्न करणने विचारला होता. त्यावर रणवीर म्हणाला, “मी तिला २०१५ मध्येच प्रपोज केलं होतं. दुसरी एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात येण्याआधीच मी विचार केला की आपणच आधी बुकिंग केलेली बरी.” हे ऐकल्यानंतर दीपिका म्हणते “अॅडव्हान्स बुकिंग”. त्यानंतर करण आणि रणवीरसुद्धा हसू लागतात. या प्रोमो व्हिडीओमध्ये दीपिकाला करणने असाही प्रश्न विचारला की, “तू रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीरने साकारलेल्या रॉकी रंधावाच्या भूमिकेसारख्या व्यक्तीला डेट करशील का?” त्यावर दीपिका मजेशीरपणे म्हणते, “मी रॉकी रंधावाशीच लग्न केलं आहे.”