Close

पाणीपुरी तयार करण्याचा व्यवसाय (Earn More Money In Pani Puri Making – Micro Business)

वाढती महागाई आणि बेरोजगारीची समस्या यांनी आपलं राहणीमान बिकट होत चाललं आहे. शिवाय नोकरीच्या रहाटगाडग्यात अडकण्यापेक्षा स्वतःचा उद्योग सुरू करावा, असं अनेक स्त्रियांना वाटतं. पण योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. ‘स्वावलंबिनी’ या सदराद्वारे आम्ही नेमकं तेच देण्याचा प्रयत्न करत आहोत. घरच्या घरी सुरू करून पुढे विस्तारित करता येण्याजोग्या लघुउद्योगांची माहिती या सदराद्वारे आपल्याला मिळेल. तर उद्योगिनी बना, स्वावलंबिनी व्हा! आजच्या लेखात जाणून घेऊया, पाणीपुरीच्या पुर्‍या तयार करण्याच्या लघुउद्योगाविषयी-

काही पदार्थ असे असतात की, ज्यांचं नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरीही अशीच आहे! म्हणजे, भूक लागली म्हणून नव्हे, तर बरेच दिवस खाल्ली नाही, काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय, पाणीपुरीची चव जिभेवर रेंगाळतेय... असं कोणतंही कारण पाणीपुरी खाण्यास पुरेसं होतं. आणि आपले पाय आपोआप आपल्या आवडीच्या पाणीपुरी स्टॉलकडे वळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही यास अपवाद नाही. त्यात हल्ली बाजारात पाणीपुरीचेही नानाविध फ्लेवर्स उपलब्ध झाले आहेत, म्हणजे पाणीपुरीच्या चाहत्यांसाठी पर्वणीच! लोकांचं पाणीपुरीसाठीचं हेच प्रेम लक्षात घेऊन हल्ली वाढदिवस, लग्न, स्नेहसंमेलन अशा समारंभांमध्येही पाणीपुरीच्या स्टॉलची योजना आवर्जून होताना दिसते. अर्थात, सध्या आणि सदैवच पाणीपुरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि असणार, यात वाद नाही.

या पाणीपुरीमध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक असतो, पुरी. आणि ही पुरी तयार करण्याचा व्यवसाय तुम्ही घरगुती स्वरूपात सुरू करू शकता, अगदी कमी पैशात आणि कमी जागेत. कालांतराने पुरीची मागणी वाढली की, या व्यवसायाचं स्वरूप विस्तारता येईल. या अंकात आपण याच पाणीपुरीची पुरी तयार करण्याच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊ. सुरुवातीला घरगुती स्वरूपात व्यवसाय सुरू करून, त्यास उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर, हा व्यवसाय विस्तारून दररोज 32,000 पुर्‍या तयार करायच्या आहेत, असं गृहीत धरून त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, ते जाणून घेऊ.

साधनं
पाणीपुरीची पुरी तयार करण्याच्या व्यवसायासाठी पीठ मळण्याचं मशीन, कढई, गॅस शेगडी, झारा, पाणीपुरी मेकिंग मशीन अशा साधनांची आवश्यकता भासेल.
पीठ मळण्याचं मशीन (डो मिक्सर/डो मेकर)
पीठ मळण्याच्या एका मशीनची किंमत जवळपास 25 हजार रुपयांपासून सुरू होते. पाणीपुरीच्या पुर्‍या तयार करण्यासाठी तुम्ही किती किलो पीठ मळता, यानुसार मशीन उपलब्ध आहेत. 2 किलो पीठ मळायचं असल्यास, कमी क्षमता असलेलं मशीन खरेदी करता येईल. त्याची किंमत सुमारे 2000 रुपयांपासून सुरू होते.
कढई
पाणीपुरी तयार करताना लाटलेल्या पुर्‍या तळल्यानंतरच खाण्यासाठी पूर्णपणे योग्य होतात. या पुर्‍या तेलात तळण्यासाठी कढईची आवश्यकता असते. एका कढईची किंमत सुमारे 500 रुपयांपासून सुरू होते. अशा किमान दोन कढयांची आवश्यकता भासेल. तेव्हा दोन कढयांचे होतील (500  2) 1000.
गॅस शेगडी
पुर्‍या तळण्यासाठी कढईसोबतच शेगडीची गरज भासेल. एका शेगडीची किंमत सुमारे 3,500 रुपयांपासून सुरू होते. अशा किमान दोन शेगड्यांची आवश्यकता भासेल. तेव्हा दोन शेगड्यांचे होतील (3500  2) 7000.
झारा
पुर्‍या तळण्यासाठी झार्‍याचीही गरज आहे. एका झार्‍याची किंमत सुमारे 100 रुपयांपासून सुरू होते. अशा किमान दोन झार्‍यांची आवश्यकता भासेल. तेव्हा दोन झार्‍यांचे होतील (100  2) 200.
पाणीपुरी मेकिंग मशीन
पाणीपुरी व्यवसायाचा विस्तार काही काळानंतर वाढला किंवा जास्त भांडवल उपलब्ध झालं, तर हा व्यवसाय मोठ्या स्तरावरही करता येईल. त्यासाठी पाणीपुरी मेकिंग मशीनची आवश्यकता आहे. पाणीपुरी मेकिंग मशीनच्या साहाय्याने एका तासात जवळपास 4000 पुर्‍या तयार करता येतात. एका पाणीपुरी मेकिंग मशीनची किंमत सुमारे 45 हजार रुपयांपासून सुरू होते. भांडवल कमी असल्यास पाणीपुरी मेकिंग मशीनऐवजी स्वतः लाटूनही पुर्‍या तयार करता येतील. मात्र त्यासाठी अधिक वेळ खर्च होईल, तसंच कर्मचार्‍यांचीही गरज भासेल.
पीठ मळण्याचं मशीन, कढई, शेगडी, झारा आणि पाणीपुरी मेकिंग मशीन या पाणीपुरी तयार करण्यासाठी लागणार्‍या यंत्रसामग्रीची किंमत ही ते यंत्र तयार करणारी कंपनी आणि त्याचा दर्जा यानुसार बाजारात किंवा ऑनलाइन साइट्सवर वेगवेगळी असू शकते. तर अशा प्रकारच्या 32,000 पाणीपुरीच्या पुर्‍या तयार करण्यासाठी साधनांचा एकूण खर्च होईल, सुमारे 78,200.

जागा आणि कर्मचारी खर्च
जागा
पुरेशी जागा उपलब्ध असल्यास, हा व्यवसाय घरच्या घरीही सुरू करता येईल. त्यासाठी किमान 500 चौरस फूट जागेची आवश्यकता आहे.
जागेचं भाडं
मुंबई, पुणे, दिल्ली यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी जागेचं भाडं वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे तुम्ही कोणत्या शहरात आणि किती मोठ्या जागेत हा व्यवसाय सुरू करता, यावर प्रामुख्याने जागेच्या भाड्याची रक्कम अवलंबून असेल.
विजेचं बिल
विजेचं बिल आणि अन्य खर्च हाही शहरानुसार वेगवेगळा असेल. तरी आपण अंदाजे विजेचं बिल 2000 आणि अन्य खर्च 1000 होईल, असं गृहीत धरू.
कर्मचारी
प्रतिदिन 32,000 पुर्‍या तयार करायच्या असल्यास, किमान 2 कर्मचार्‍यांची आवश्यकता भासेल. प्रत्येक कर्मचार्‍याचं प्रतिदिन वेतन सुमारे 200 गृहीत धरलं, तर एकूण कर्मचार्‍यांचं वेतन दरमहा (400  25) 10,000 होईल. इतर प्रशासनिक खर्च (जागेचं भाडं वगळून) सुमारे 3000 असेल.

पाणीपुरीच्या पुर्‍या तयार करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम आवश्यक कच्चा माल एकत्र करून पीठ चांगलं मळून घ्या. यासाठी पीठ मळण्याच्या मशीनचा वापर करता येईल.
- या पिठाच्या पोळ्या लाटून साच्याने योग्य आकाराच्या पुर्‍या तयार करा. यासाठी पाणीपुरी मेकिंग मशीनचा वापर करता येईल. पाणीपुरी मेकिंग मशीनच्या साहाय्याने तासाभरात सुमारे 4000 पुर्‍या तयार करता येतात.
- तयार झालेल्या पुर्‍या कढईमध्ये योग्य प्रमाणात तेल गरम करून, त्यामध्ये व्यवस्थित तळून घ्या.
- पुर्‍या कच्च्या राहणार नाहीत, याची काळजी घेत दोन्ही बाजूने व्यवस्थित तळा.
- पुर्‍या झार्‍याच्या मदतीने अलगद काढून व्यवस्थित ठेवा. पुर्‍या फुटणार नाहीत, याची काळजी घ्या.
- पाणीपुरी मेकिंग मशीनच्या साहाय्याने एका वेळेस अनेक पुर्‍या तयार होत असल्यामुळे जास्त कर्मचार्‍यांची आवश्यकता नसते. मात्र पुर्‍या तळण्यासाठी कर्मचारी आवश्यक आहेत.
- पाणीपुरीच्या पुर्‍या तयार झाल्यानंतर त्याचं व्यवस्थित पॅकेजिंग करणं गरजेचं आहे.

लक्षात ठेवा
- पाणीपुरीच्या पुर्‍या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल चांगल्या दर्जाचा असावा.
- पाणीपुरी हा एक खाद्यपदार्थ असल्यामुळे पुर्‍या तयार करताना स्वच्छता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे.
- पुर्‍या तळताना गरम तेलामुळे कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही, तसंच भाजणार नाही याची काळजी घ्या.
- पुर्‍या कच्च्या राहणार नाहीत, त्या योग्य प्रमाणात तळल्या जातील, याची काळजी घ्या.
- पुर्‍या तयार झाल्यानंतर त्या फुटणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यायला हवी.
- पुर्‍या तयार करण्यासाठी निवडलेलं ठिकाण किंवा परिसर हा स्वच्छ असावा. माशा, डास यासारख्या गोष्टी पुर्‍यांच्या आजूबाजूला नसाव्यात.

उत्पादनाचं पॅकेजिंग
उत्पादनाचं पॅकेजिंग करताना अनेक गोष्टीचं भान ठेवायला हवं. उत्पादन कोणत्याही प्रकारे खराब होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. या पुर्‍यांच्या बाबतीत पॅकेजिंग करताना आणि नंतर वाहतूक करताना त्या फुटणार नाही, याची विशेष काळजी घ्यायला हवी. या पुर्‍या 50 आणि 100 नगांचं एक पाकीट या प्रकारे पॅक करता येतील.

उत्पादनाची विक्री
- पाणीपुरीच्या पुर्‍या तयार करून शहरातील विविध पाणीपुरीचे स्टॉल्स किंवा हॉटेलमध्ये पुरवता येतील. तसंच घरी पाणीपुरी तयार करणार्‍यांसाठी या पुर्‍या किराणामालाच्या दुकानातही उपलब्ध करून देता येतील.
- सुरुवातीला पुर्‍यांची विक्री करताना थोडे कष्ट घ्यावे लागतील. एकदा तुम्ही तयार केलेल्या पुर्‍यांचा दर्जा आणि स्वादाविषयी ग्राहक संतुष्ट झाले की, मागणी वाढत जाईल.
- वाढदिवस, लग्न सोहळा, स्नेहसंमेलनं अशा विविध समारंभांमध्येही हल्ली पाणीपुरी सर्व्ह केली जाते. त्यामुळे अशा कॅटरर्सशी संपर्क करा.
- तुमच्या व्यवसायाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी तुमचं नाव आणि संपर्क क्रमांक असलेले व्हिजिटिंग कार्ड, पॅम्प्लेट, बॅनर छापू शकता.
- सध्या सोशल मीडियाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. तेव्हा तुमच्या व्यवसायाची माहिती फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यू-ट्यूब यासारख्या संकेत स्थळांवरही देता येईल.

लघुउद्योग परवाना (लायसन्स)
- एखाद्या लघुउद्योगाचा प्रारंभ केल्यास, त्याचं रजिस्ट्रेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध प्रकारच्या योजनांमधून मदत करतं. व्यवसायाचं रजिस्ट्रेशन केल्यास अशा योजनांचा लाभ घेता येईल.
- तसंच पुर्‍या तयार करण्याच्या या व्यवसायासाठी शहरातील फूड आणि हेल्थ डिपार्टमेंटकडून परवाना घेणंही गरजेचं आहे. अशा प्रकारच्या परवान्यासाठी प्रत्येक शहराचे नियम वेगवेगळे आहेत. 
- पुर्‍या तयार करण्याचा व्यवसाय हा खाद्यपदार्थांशी संबंधित असल्यामुळे फ.एस.एस.ए.आय. कडूनही (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया) परवाना प्राप्त करणं गरजेचं आहे.

कर्ज सुविधा
लघुउद्योग सुरू करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते,  ती म्हणजे भांडवल. लघुउद्योग सुरू करण्यासाठी लागणारी पुरेशी रक्कम तुमच्याजवळ उपलब्ध नसल्यास तुम्ही कर्ज घेऊ शकता. घराजवळच्या अथवा तुमचं खातं असलेल्या बँकेत तुम्हाला कर्जासाठी अर्ज करता येईल. प्रत्येक बँकेचा व्याज दर, तसंच कर्ज घेण्याची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते. लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारही इच्छुकांना आर्थिक मदत करतं. भारत सरकारतर्फे छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ची सुरुवात करण्यात आली आहे. या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज आणि इतर काही सुविधा उपलब्ध आहेत. या सोयीसुविधा देशातील अनेक बँकेत उपलब्ध आहे. मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची माहिती अथवा मदत हवी असल्यास खालील फोन नंबर, वेबसाइट आणि ईमेलवर संपर्क करता येईल.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना
वेबसाइट : www.mudra.org.in
ईमेल : [email protected]
टोल-फ्री क्रमांक : 18001801111 आणि 1800110001.

संपर्क
पाणीपुरीच्या पुर्‍या तयार करण्याचा हा लघुउद्योग सुरू करायचा असल्यास, या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री, तसंच कच्चा माल याविषयीच्या माहितीसाठी तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.

जॅस एंटरप्रायजेस
बी-326, तिसरा मजला, सुमेल बिझनेस पार्क 7, बीआरटीएस बस स्टॉप, राष्ट्रीय महामार्ग क्र. 8, रखियाल, अहमदाबाद, गुजरात. पिनकोड 380023.
मोबाईल : 9426088680, 9427413884, 9426180142.
वेबसाइट : www.jasenterprise.com
ई-मेल : [email protected]

हरी इंजिनिअरिंग वर्क्स
1/6, वैदवाडी, गोंडल रोड, रेल्वे क्रॉसिंगजवळ, राजकोट, गुजरात. पिनकोड 360004.
मोबाईल : 9664932766, 9825487658, 9879271444
वेबसाइट : harisonfoodmachine.bogspot.in
ई-मेल : [email protected], [email protected]

एस. एल. मशिनरी
प्लॉट नंबर 2, किरारी, जे.जे. कॉलनी क्र. 1, नानग्लोई, नवी दिल्ली. पिनकोड 110041.
मोबाईल : 8800791063, 8802690774, 7503880829
वेबसाइट : slmachinerydelhi.justdial.com
ई-मेल : [email protected]

जयेंद्र इंजिनिअरिंग वर्क्स
हरिहर बिल्डिंग, पी.डी. मालव्या कॉलेजजवळ, गोंदल रोड, वेद वाडी, राजकोट, गुजरात. पिनकोड 360004. मोबाईल : 9724081555.

एस. के. इंजिनियर्स
102, पवन विहार कॉ. गेट, आकाश टॉवरजवळ, बिसलापूर चौक, गार्डन सिटी, बरेली, उत्तर प्रदेश. पिनकोड 243005.
मोबाईल : 9719930933, 7248448834, 9084886245
वेबसाइट : www.skengineer.org
ई-मेल : [email protected]

तीर्थ इंजिनियरिंग
दुकान क्र. 81/1, दांगट इंडस्ट्रियल इस्टेट, एनडीए रोड, शिवाने, पुणे. पिनकोड 411023.
मोबाईल : 7721853399, 9371017572  
वेबसाइट : www.tirthengineering.com
ई-मेल : [email protected]

भगवानी बेकरी मशीन्स प्रा.लि.
215, ट्रेड सेंटर, हॉटेल अदिना पॅलेसजवळ, स्टेशन रोड, वलसाड, गुजरात. पिनकोड 396601.
मोबाईल : 9377967016, 9374634964
वेबसाइट : www bhagwanibakerymachines.co.in
ई-मेल : [email protected], [email protected]

गौरांग एंटरप्रायझेस
4, प्लॉट क्र. 24-25, झवेरी इंडस्ट्रियल इस्टेट, शुभ इस्टेटसमोर, गोगा महाराज मंदिराजवळ, कथवाडा, ओढव, अहमदाबाद, गुजरात. पिनकोड 382430.
मोबाईल : 9904375157, 8000421003.
वेबसाइट : www.gaurangenterprise.in
ई-मेल : [email protected]
- सायली शिर्के

Share this article