'बिग बॉस ओटीटी सीझन २' चा विजेता एल्विश यादव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या अडचणी त्याचा पाठलाग सोडण्याची चिन्हे दिसत नाहीत. सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप झाल्यानंतर आता तो मनी लाँड्रिंग प्रकरणातही अडकला आहे. लवकरच ईडीच्या लखनऊ विभागीय कार्यालयाकडून त्याची चौकशी करण्याचे आदेश येऊ शकतात असे म्हटले जात आहे. नोएडामध्ये एल्विशविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या लखनऊ युनिटने पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट) अंतर्गत तपास सुरू केला आहे, सापाच्या विषाच्या तस्करी प्रकरणी ईडी एल्विश यादवला समन्स पाठवू शकते. नोव्हेंबर २०२३ मध्ये नोएडा सेक्टर-५० मध्ये एका रेव्ह पार्टीत विष पुरवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये YouTuber आरोपी आढळला होता. मार्च २०२४ मध्ये तो याप्रकरणी तुरुंगातही गेला होता. आता तो जामिनावर बाहेर आला आहे.
अंमलबजावणी संचालनालय सापाच्या विषाच्या तस्करीतून मिळालेल्या पैशाची आणि रेव्ह पार्ट्या आयोजित करण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर याची चौकशी करेल. अंमलबजावणी संचालनालय सापाच्या विष प्रकरणाशी संबंधित एल्विश यादव आणि इतर आरोपींची चौकशी करणार आहे. देशातील सर्वात लोकप्रिय यूट्यूबर्सपैकी एक असलेल्या एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी १७ मार्च रोजी सापाच्या विष प्रकरणात अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.