प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बालची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खुपच खराब होती. तो मृत्यूशी झुंज देत होता. रोहित गेल्या अनेक दिवसांपासून गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होता. त्यामुळे चाहते त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत होते. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आता रोहितच्या प्रकृतीत सुधारणा होत असून तो आयसीयूमधून बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आता रोहितनेही आपल्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर करत हेल्थ बाबत अपडेट दिले आहे. त्यासोबत त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहे.
रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. यात रोहित लिहितो, "माझ्या आजारपणात तुम्ही मला दिलेलं प्रेम आणि प्रार्थना माझ्या मनापर्यंत भिडल्या आहेत. तुम्ही दिलेला पाठिंबा माझ्यासाठी आशा आणि शक्तीचे प्रतीक आहे.., त्या मला माझ्या या प्रवासात मदत करत आहे. या आव्हानात्मक काळात माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. ...आशा आणि धैर्याने पुढे जात राहूया.."
आता रोहितची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी त्याच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. यासोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही रोहितच्या पोस्टवर कमेंट करून आनंद व्यक्त करत आहेत
२०१० मध्ये हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रोहितची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
फॅशन डिझायनिंगमध्ये रोहित बल अनेक वर्षे आघाडीवर राहिले. रोहितने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. अमिताभ बच्चन, काजोल, ईशा गुप्ता, कंगना राणौत, पूजा हेगडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींसाठी त्याने कपडे डिझाइन केले आहेत. जवळपास 30 वर्षे फॅशन जगतात ते अधिराज्य गाजवत आहेत.