Close

सलमान खानचा एक फोन आणि गोविंदाने सोडलेला जुडवा, सिनेमाचे अर्धे शूटही झालेले पूर्ण (For Salman Khan Friendship Govinda Left Judwa Movie)

बॉलिवूडमध्ये अनेक मैत्रींचे असे किस्से आहेत जे नेहमी चर्चेत असतात. अशीच एक मैत्री म्हणजे सलमान खान आणि गोविंदाची. सलमानसाठी गोविंदाने आपल्या मेहनतीवरही पाणी सोडलेले.

डेव्हिड धवन दिग्दर्शित 'जुडवा' हा चित्रपट पहिल्यांदा गोविंदाला ऑफर झाला होता. सुरुवातीला करिश्मा आणि गोविंदा या चित्रपटात एकत्र दिसणार होते. गोविंदाने या चित्रपटाचे काही भाग शूटही केले होते, मात्र त्यानंतर त्याने सलमानच्या मैत्रीसाठी तो सिनेमा सोडला.

गोविंदाने आपल्या एका मुलाखतीत याबद्दलचा किस्सा सांगितला होता. तो म्हणाला की, जेव्हा मी चित्रपटांमधून ब्रेक घेऊन पुनरागमन केले तेव्हा फक्त सलमान खाननेच मला मदत केली होती. हंगामाशी संवाद साधताना गोविंदाने सांगितले की, १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला 'जुडवा' हा चित्रपट मला पहिल्यांदा ऑफर करण्यात आला होता. त्यावेळी मी माझ्या करिअरच्या शिखरावर होता आणि 'बनारसी बाबू' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यासोबतच मी 'जुडवा'चे शूटिंगही करत होतो.

'एक दिवस रात्री २-३ च्या सुमारास सलमानने मला फोन केला आणि विचारले - चिची भैया, तूम्ही अजून किती हिट चित्रपट देणार? हे ऐकून मी विचारले - का काय झाले? तेव्हा तो म्हणाला- तुम्ही सध्या ज्या जुडवा चित्रपटाचे शूटिंग करत आहात त्या प्रोजेक्टपासून दूर जा आणि तो मला द्या. या फोननंतर लगेचच गोविंदाने स्वतः चित्रपटातून बाहेर पडून सलमानला तो सिनेमा देऊ केला.

गोविंदा पुढे म्हणाला, 'मी जुडवा चित्रपटाचा भाग नव्हतो पण सुरुवातीच्या प्रोजेक्टचा भाग होतो. खान हे माझ्यासाठी नेहमीच कुटुंबासारखे आहेत. आमच्या नात्यावर कोणत्याही चित्रपट किंवा प्रोजेक्टमुळे कधीच कोणताही फरक पडत नाही. आमचे कामही आमच्या नात्याच्या आड येत नाही. सलमान आणि सोहेल नेहमी माझ्याशी पूर्ण आदराने बोलतात.

'जुडवा' हा चित्रपट केवळ ६.२५ कोटी रुपयांमध्ये बनला होता आणि बॉक्स ऑफिसवर त्याकाळी या सिनेमाने तब्बल २४.२८ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात सलमान खानसोबत करिश्मा कपूर, शक्ती कपूर, कादर खान, रीमा लागू आणि सतीश शाह यांच्यासुद्धा भूमिका होत्या.

Share this article