Close

उत्तेजना, आवेग पुन्हा मिळवा (Get The Sexual Spark Back In Your Relationship)


निरोगी संसारासाठी, नातेसंबंध टिकून राहण्यासाठी निरामय कामजीवन उपभोगलं पाहिजे. लोप पावत असलेली कामेच्छा ‘रिचार्ज’ करायला ‘व्हॅलेंटाइन डे’सारखा उत्तम मुहूर्त नाही.
‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस; पण आजकाल चालतं… म्हणजे, भेटवस्तू द्या, सिनेमा-नाटकाला जा किंवा हॉटेलात पार्टी करा, ते पुरेसं नसतं. निव्वळ लाल गुलाबाची भेट देऊन प्रेम व्यक्त करण्यापेक्षा आपल्या जोडीदाराला प्रेमाने जवळ घेणं, एकमेकांच्या मिठीत धुंद होऊन जगाला विसरून जाणं आणि प्रणयाची गोडी चाखता चाखता संपूर्ण समाधानी असा समागम करणं; ही खरं तर प्रत्येक विवाहित जोडप्यांनी एकमेकांना दिलेली सर्वोत्तम भेट होऊ शकते. कारण आजकाल होतंय काय की, ज्यांच्या लग्नाला काही वर्षं लोटली आहेत, त्यांच्यामध्ये प्रणयाची, शृंगाराची उत्कटता लोप पावलेली दिसते. निसर्गनियमानुसार ऐन तारुण्यात, लग्नाच्या नवलाईच्या दिवसात फुललेला शृंगार आता तसा फुलणार नाही, हे मान्य. परंतु, शरीरसुख घेण्याची ऊर्मी मनातून यावी लागते, ती तरी यायला हवी ना! कालपरत्वे प्रेम, प्रणय, शृंगार हे नीरस होतं खरं, पण तसं होऊ नये म्हणून आपण काही प्रयत्न करतो का? करत नसाल, तर करायला हवे. कारण निरोगी संसारासाठी, नातेसंबंध टिकून राहण्यासाठी निरामय कामजीवन उपभोगलं पाहिजे. लोप पावत असलेली कामेच्छा ‘रिचार्ज’ करायला ‘व्हॅलेंटाइन डे’सारखा उत्तम मुहूर्त नाही.
तेव्हा आपण काही मूलभूत मुद्यांवर आधी चर्चा करूया. म्हणजे आपल्या लक्षात येईल की, बेडरूममध्ये आजकाल आपली वर्तणूक कशी असते आणि ती कशी असायला हवी. त्यावरून आपल्या कामजीवनाचा आलेख उंचावू शकतो की नाही, तेही लक्षात येईल.

शरीराबाबत आपल्या भावना काय आहेत?
टेक्सास युनिव्हर्सिटीने याबाबत 18 ते 49 या वयोगटातील महिलांचं सर्वेक्षण केलं. त्यातून असं लक्षात आलं की, ज्या स्त्रियांनी आपल्या बॉडी इमेजबद्दल जास्त मार्क्स मिळवले, त्यांचं कामजीवन चांगलं होतं. आपल्याला माहीतच आहे की, आपली फिगर आणि शरीरातील वाढणारी चरबी, या गोष्टी स्त्रिया जास्तच मनावर घेत असतात. त्यामुळे कोणत्याही कारणाने का होईना, परंतु पोटावर, ओटीपोटावर किंवा मांड्या-नितंबावर चरबी वाढलेली असेल, तर सेक्स करतेवेळी त्यांचं लक्ष याच गोष्टींकडे जातं. त्या नको तितक्या ‘कॉन्शस’ होतात. काही स्त्रियांच्या मनात अपराधी भाव दाटून येतो. सुखाच्या क्षणांमध्ये असे भाव मनात दाटले, म्हणजे ती स्त्री शरीर संबंधात पूर्णपणे रममाण होऊ शकत नाही. त्याचा परिणाम ‘ऑरगॅझम’ गाठण्यावरही होतो.
टीप : या गोष्टी घडू नयेत म्हणून, बिनखर्चाचा सोपा उपाय योजा. नियमितपणे व्यायाम करा. नियमित व्यायाम केल्यामुळे शरीर प्रमाणबद्ध राहतं. त्यामुळे शरीराबाबत आपल्या भावना सकारात्मक राहतात. आत्मविश्‍वास वाढतो. या गोष्टींनी कामजीवन चांगलं राहतं.

सेक्सची मागणी करताना संकोच वाटतो?
शरीरसंबंध नीरस होण्याचं प्रमुख कारण म्हणजे, तोचतोचपणा. स्त्री किंवा पुरुष कुणीही अरसिक असलं, तर तो एकाच पठडीत शरीरसुख घेऊ इच्छितो. त्यामुळे शरीरासंबंधातील नावीन्य संपून, ते नीरस होतं. परंतु, आपल्याकडील स्त्री-पुरुषांची मानसिक जडणघडण आणि सामाजिक दडपण पाहता, आपल्याला वेगळ्या प्रकारे सेक्स करायला आवडेल, अशी मागणी करताना त्यांच्या मनात संकोच येतो. सांगितल्याशिवाय कळणार नाही, अन् कळल्याशिवाय वळणार नाही, हा साधा सिद्धांत यांच्या डोक्यात शिरत नाही. तेव्हा मुळातच विवाहित दाम्पत्यामध्ये इतका मोकळेपणा पाहिजे की, आपल्या इच्छा-अनिच्छा स्पष्टपणे एकमेकांना सांगता आल्या पाहिजेत.
टीप : काही लोकांच्या मनावर संस्कारांचा पगडा इतका जबरदस्त असतो की, ठरवलं तरी अशा प्रकारची मागणी त्यांच्या ओठांवर सहजासहजी यायची नाही. अशा लोकांना सांगावंसं वाटतं की, बोलायला एवढा संकोच वाटत असेल, तर आपली इच्छा सरळ एका चिठ्ठीत लिहून कळवावी. चिठ्ठीचपाटी पूर्वी कधी लिहिली असेल ना! तिचंही पुनरुज्जीवन करा.

सेक्सचा कार्यक्रम ठरवला जातो का?
पुष्कळ लोक असं बोलताना आढळतात की, शरीरसंबंध हे काही वेळ ठरवून होत नाहीत.
ती नैसर्गिक ऊर्मी आहे. जेव्हा ती येते तेव्हा आम्ही सेक्स करतो. म्हणजे, इच्छा होईल तेव्हा शरीरसुख घेतलं पाहिजे, असा सर्वसाधारण प्रवाद आहे. त्यासाठी काही काळ-वेळ ठरवण्याची गरज नाही. परंतु, ज्याप्रमाणे ऑफिसला जाण्याचं, प्रवासाला निघण्याचं-परतण्याचं, झोपण्याचं-उठण्याचं वेळापत्रक आपण ठरवलेलं असतं, तसं शरीरसंबंधांचंही वेळापत्रक ठरवलं पाहिजे. यामुळे आपलं कामजीवन समाधानाचं आणि संतुलित राहील. अन् आपला मूड नेहमीच चांगला राहील.
टीप : इतर गोष्टींप्रमाणेच शरीरसुखाचंही वेळापत्रक ठरवायला काहीच हरकत नाही. यामुळे मानसिक आणि शारीरिकही तयारी चांगली होईल. दोघांच्या संमतीने ज्या दिवशी हा कार्यक्रम ठरवाल, त्या दिवशी हलका आहार घ्या. सर्व कामं वेळेवर आटोपून घ्या. मुलांना वेळेवर झोपवा. जोडीदाराला उत्तेजना देतील, अशी अंतर्वस्त्रं घाला. रोमँटिक गाणी ऐका किंवा रोमँटिक चित्रपट पाहा.

सेक्सनंतर कशा भावना असतात?
सेक्स केल्यानंतर आपण जोडीदाराच्या निकट आलो आहोत, असं मनापासून वाटतं का, त्याचं मूल्यमापन करा. आपला मूड पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो का, आपले विचार सकारात्मक होतात का, त्याचंही निरीक्षण करा. जर असं घडत असेल, तर आपलं सेक्स लाइफ निश्‍चितच चांगलं आणि निरोगी आहे, असं समजायला हरकत नाही.
टीप : सेक्स आपण महिन्यातून किंवा दिवसातून किती वेळा केला, हे महत्त्वाचं नाही. एखादे वेळी रात्री केल्यानंतर पहाटे पुन्हा करावासा वाटेल, त्यात गैर काहीच नाही. दोघांच्याही संमतीने केलेला सेक्स आणि त्याचे नंतरचे परिणाम महत्त्वाचे आहेत. आपल्याला समाधान मिळालं
की नाही, त्याचं मोजमाप करा. आणि हे समाधान पुढील खेपेसही कसं मिळेल, याची तयारी करा.

बदल करण्याची गरज
काही वर्षांनंतर, शरीरसंबंधांमध्ये एक प्रकारे यांत्रिकपणा येऊ लागतो. त्यामुळे होतं काय की, शारीरिक क्षमता असूनही मन उचल घेत नाही. उत्तेजना कमजोर होते, एकमेकांना जवळ घेण्याचा आवेग ओसरतो. आपण एकाच प्रकारचे, एकाच रंगाचे कपडे अधिक काळ घालू शकत नाही किंवा एकाच प्रकारचे खाद्यपदार्थ वारंवार खाऊ शकत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. तसंच शरीरसंबंधही एकाच प्रकारे ठेवायला नकोसं वाटतं. हा नकोशेपणा घालवला पाहिजे, आपण करतो त्या कामक्रीडेत बदल केले पाहिजे, असं मनातून वाटलं म्हणजे आपलं कामजीवन निरोगी आहे, असं समजा.
टीप : शरीरसंबंधातील यांत्रिकपणा बदलण्यासाठी सर्वप्रथम वेगवेगळ्या आसनांचा आधार घ्या. दोन्ही जोडीदार रसिक असतील, सेक्समध्ये रुची घेणारे असतील, तर वात्स्यायनाचं कामसूत्र अवश्य वाचा. त्यातील आसनांचा प्रयोग करून पाहा. शिवाय आपल्या बेडरूमची सजावट बदला, जागा बदला. उत्तेजक, भडक रंगाची, विशेषतः लाल रंगाची अंतर्वस्त्रं परिधान करा. बेडरूममध्ये फुलांचा, अत्तराचा सुगंध दरवळू द्या. आपलं कामजीवन निश्‍चितच ‘रिचार्ज’ झाल्याचा अनुभव येईल.

Share this article