गेल्या कित्येक दिवसांपासून बिग बॉस मराठीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यंदाचं बिग बॉस मराठीचं सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. अलिकडेच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची पत्रकार परिषद पार पडली. हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले. २८ जुलै रोजी शोचा प्रीमियर होणार आहे. त्यामुळे शोमध्ये कोण कोण स्पर्ध झळकणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
त्यातच बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये संजू राठोडची एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जातंय. संजू राठोडच्या गुलाबी साडी या गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावलं. अनेक कलाकारांनाही या गाण्यावर रिल करण्याचा मोह आवरला नाही. इतकंच नाही तर याच गुलाबी साडीने अंबानींचीही वरात गाजवली. तोच संजू राठोड आता बिग बॉसच्या घरात राडा घालण्यासाठी तयार असल्याचं म्हटलं जातंय.
कलर्स मराठी वाहिनीकडून त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यानंतर दुनियादारीमधल्या कलाकाराची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात होतं. त्यातच आता संजू राठोडच्याही नावाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता संजू राठोड बिग बॉसच्या घरात येणार का? हे येत्या 28 जुलै रोजी स्पष्ट होईल.
मागील अनेक महिन्यांपासून संजू राठोड हा बराच चर्चेत आला आहे. त्याच्या गुलाबी साडी गाण्याने त्याने सगळ्यांनाच वेड लावलं. तसेच सोशल मीडियावरही त्याचे फॉलोअर्स चांगले आहेत. त्यामुळे संजूची बिग बॉसच्या घरात एन्ट्री होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यांमध्ये अनेकांच्या नावाच्या चर्चा सुरु आहे. यामध्ये जेष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचं देखील नाव आहे. तसेच मालिकांमधून काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेले कलाकार विवेक सांगळे आणि चेतन वडनेरे हे दोघेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे सोशल मिडिया स्टार अंकिता वालावलकर ही देखील बिग बॉसच्या घरात जाऊ शकते. यांच्यासोबत दुनियादारी सिनेमातला कोणात कलाकार बिग बॉसच्या घरात दिसणार याची देखील अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
अनेक महिन्यांपासून प्रेक्षक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिजनची वाट पाहत होते. येत्या २८ जुलै रोजी या सिजनचा ग्रँड प्रमिअर सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे आता पुढचे १०० दिवस बिग बॉसच्या घरामुळे प्रेक्षकांच्या घरात मनोरंजन होणार आहे. या सिजनमध्ये होस्टच्या खुर्चीत महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुख बसणार आहे. त्यामुळे रितेश घरातील स्पर्धकांची शाळा कशी घेतो हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.