'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंहच्या बेपत्ता होण्याचे गूढ दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. २२ एप्रिलच्या संध्याकाळपासून अभिनेता बेपत्ता आहे मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही. पण आता दिल्ली पोलिसांना एक मोठा अपडेट मिळाला आहे. गुरुचरण सिंग २७ ईमेल आणि १० खाती वापरत असल्याचे समोर आले आहे.
आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून असल्याची शंका गुरुचरणला असल्याने तो २७ वेगवेगळे ईमेल आणि १० खाती वापरत होता. तपासाशी संबंधित एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याला स्वतःवर कोणीतरी नजर ठेवल्याचा संशय होता, ज्यामुळे तो वारंवार त्याचे ईमेल बदलत होता.
एका पोलिस पथकाला त्याच्या मोबाइल फोनवरून गुरुचरण सिंहचे लोकेशन ट्रेस करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. २२ एप्रिल रोजी रात्री ९.२२ वाजल्यापासून अभिनेत्याचा मोबाईल फोन बंद आहे. सीसीटीव्ही फुटेज नुसार गुरचरण सिंहचे शेवटचे लोकेशन दक्षिण-पश्चिम दिल्लीतील डाबरी येथे होते. तिथे जाण्यासाठी त्याने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ई-रिक्षा पकडली.
गुरचरण दोन फोन वापरत होता. पण त्यातील एक त्याने दिल्लीतील घरी सोडला होता. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्याने शेवटचा फोन त्याच्या मित्राला केला होता, जो त्याला मुंबई विमानतळावर घेऊन जाणार होता. पोलिसांच्या पथकांनी त्याच्या बँक खाती आणि क्रेडिट कार्डमधून झालेल्या आर्थिक व्यवहारांचाही तपास केला आहे. यावरून १४ हजार रुपयांचा शेवटचा व्यवहार झाल्याचे समोर आले. बेपत्ता झाल्याच्या दिवशी त्याने त्याच्या एका बँक खात्यातून ही रक्कम काढली होती.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गुरचरण सिंहची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्याच्यावर अनेक कर्जे आणि थकबाकी होती. क्राइम ब्रँच आणि स्पेशल सेलसह अनेक पोलिस पथके गुरुचरण सिंहला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की गुरुचरण सिंग एका संघाचा अनुयायी होता त्यामार्फत तो दिल्लीतील छतरपूर येथील ध्यान केंद्रात जात असे.
पोलिसांनी आता त्या पंथाच्या अनुयायांचे जबाब नोंदवले आहेत. दिल्ली आणि मुंबईतील सुमारे ५० जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गुरुचरण सिंह यांना ध्यानासाठी हिमालयात जाण्याची इच्छा होती. पोलिसांच्या पथकांनी हरियाणा, पंजाब आणि उत्तराखंड यांसारख्या काही राज्यांना भेटी देऊन या प्रकरणाचा शोध सुरू केला आहे.