गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात नवनवीन विषयांवरचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ॲनिमल, सालार, डंकी या तीन सिनेमांची सध्या चांगलीच चर्चा आहे. अशातच आगामी सुपरहिरो चित्रपट हनुमानचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. ट्रेलर भेटीला येताच तो ट्विटरवर ट्रेंड झाला असून लोकांच्या पसंतीस उतरला आहे.
तेजा सज्जानं साकारलेला हा सुपरहिरो चित्रपट प्रशांत वर्माने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट एका तरुण मुलाच्या परिवर्तनाची कथा आहे जेव्हा तो वाईटाशी लढा देत भगवान हनुमानाकडून महासत्ता मिळवतो. तब्बल 11 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
'हनुमान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यात वापरण्यात येणारे ग्राफिक्स अप्रतिम दिसत आहेत. त्याचबरोबर पार्श्वभूमीतील संस्कृत श्लोकाने हा ट्रेलर आणखी सुंदर झाला आहे. या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा या चित्रपटाच्या ट्रेलरकडे लागल्या होत्या. हा सिनेमा नवीन वर्षात १२ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.