Close

सवयी बदला, हृदय निरोगी राखा (Healthy Habits For Heart)

हल्ली हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हार्ट अटॅकमुळे केवळ वृद्धांनाच नाही आता तरुणांनाही जीव गमवावा लागत आहे. चालत, बोलता, हसताना, नाचताना कधीही अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकमुळे लोक चिंतेत आहेत. हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे आणि त्यात काही समस्या आल्यास संपूर्ण यंत्रणा विस्कळीत होते. मात्र तुम्ही आपल्या दैनंदिन आयुष्यात थोडा बदल करून या त्रासापासून दूर राहू शकता.

सध्याच्या काळात तरुणांमधील हृदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. तरुणांच्या काही चुकीच्या सवयी हृदयविकाराचे कारण बनत आहेत, ज्यात बदल करून हे आजार टाळता येऊ शकतात. चांगला आहार, उत्तम जीवनशैली, नियमित व्यायाम आणि योग्य आरोग्य तपासणी याद्वारे तुम्ही हृदय निरोगी ठेवू शकता आणि आयुष्यभर हृदयविकारापासून दूर राहू शकता. या वाईट सवयी कोणत्या ते जाणून घेऊया.

तेलकट आणि जंक फूड टाळा : हल्ली तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खूप खाल्ले जातात, ज्याचा हृदयावर वाईट परिणाम होत आहे. तज्ज्ञांच्या अहवालानुसार, तळलेले अन्न खाल्ल्याने आपल्या लिव्हरमधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. हे कोलेस्टेरॉल आपल्या हृदयासाठी अनेक समस्या निर्माण करू शकते. रक्ताच्या धमन्यांमध्ये साचून हा पदार्थ रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतो. त्यामुळे लोकांनी तळलेले पदार्थ न घेता सकस आहार घ्यावा. आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. बाहेरचे अन्न टाळावे.

पुरेशी झोप घ्या : एका रिसर्चनुसार, जे लोक दिवसातून फक्त ६ तास झोपतात, त्यांना पुरेशी झोप घेणाऱ्या लोकांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. ज्या लोकांना दररोज ७ ते ८ तास चांगली झोप मिळते, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. आजच्या काळात, बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागतात आणि पुरेशी झोप घेत नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने दररोज ७ ते ८ तास झोपले पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपली झोप जितकी चांगली असेल तितके आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहील.

दिवसभर बसू नका, शारीरिक हालचाली करत राहा : काम करणारे लोक अनेकदा खुर्चीवर एकाच ठिकाणी अनेक तास बसतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक ठिकाणी जडपणा येतो. त्यामुळे त्यांच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊन त्यांना हृदयाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच कामामुळे तासनतास खुर्चीवर बसून राहिल्यास वेळ काढून चाला. दरम्यान लहान ब्रेक घेऊन शारीरिक हालचाली करा, यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होईल.

सिगारेटपासून अंतर ठेवा, तुमचे हृदय चांगले होईल : एका सिगारेटचा धूर तुमच्या हृदयासाठी खूप घातक ठरू शकतो यात शंका नाही. एका संशोधनानुसार, जे लोक सिगारेट ओढतात. त्यांना हृदयाच्या समस्यांना अधिक सामोरे जावे लागते. यासोबतच त्यांच्या हृदयाचे वयही कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत तुम्ही सिगारेट ओढत असाल तर त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. सिगारेट ओढल्याने हृदयाच्याच नव्हे तर फुफ्फुसाच्या समस्यांचाही धोका वाढतो. सिगारेटपासून दूर राहून तुम्ही हृदयाचे आरोग्य वाढवू शकता.

तुमचे दात नेहमी स्वच्छ ठेवा, हृदयविकारापासून तुमचे रक्षण होईल : तुमच्या दातांच्या आरोग्याचा तुमच्या हृदयाच्या आरोग्याशी थेट संबंध आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण हे पूर्णपणे सत्य आहे. वास्तविक, तुमच्या दातांमध्ये वाढणारे बॅक्टेरिया ब्रशने काढून टाकले जाऊ शकतात. जर ते बॅक्टेरिया वेळेत साफ केले नाहीत तर ते तोंडातून तुमच्या रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात. यानंतर हे बॅक्टेरिया थेट तुमच्या हृदयाला समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे लोकांनी रोज घासावे आणि दात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.

Share this article