Close

स्वतःचं घर होण्यासाठी काय करावं? (How to Make Your Own Home)

बरीच वर्षे आम्ही भाड्याच्या घरात राहतो. सध्या घरांची भाडी खिशाला परवडत नाहीत. भरमसाठ भाड्यांमुळे आम्हाला दर महिन्याला फार आर्थिक चणचण जाणवते. स्वतःचं घर घेण्यासाठीही आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. आमच्या या प्रयत्नांना यश येण्यासाठी फेंगशुई शास्त्रात काही उपाय आहे का?
श्री. विश्‍वकर्मा हे चराचर सृष्टीचे बांधकामकर्ता आहेत. त्यांना पुराणकाळात फार महत्त्व होते. देवांच्या सर्व वास्तू त्यांनीच बांधल्या होत्या. ते देवांचे वास्तुशिल्पी तज्ज्ञ होते. त्यांनी लिहिलेली संहिता आजही वास्तुशास्त्र विश्‍वकर्मा प्रकाश, स्थापत्य देव आदी नावाने गणली जाते. ज्यांना घर घेण्याच्या प्रयत्नांत यश येत नाही, त्यांनी श्री. विश्‍वकर्मा यांच्या फोटोचे पूजन करावे. श्री. विश्‍वकर्मा चालिसा म्हणावा. सूर्याची उपासना करावी. श्री. विष्णू आणि लक्ष्मीची उपासना करावी. नक्की इच्छापूर्ती होते.

अलीकडे अगदी चाळीतील घर असलं तरी टॉयलेट, बाथरूम घरातच असते. घरात त्यांची दिशा कोठे असावी? चुकीच्या ठिकाणी ते असल्यास त्यामुळे काही दुष्परिणाम भोगावे लागतात का? त्यासाठी काही उपाय सांगा?
घरामधील बाथरूम ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावं. इथे नळ ईशान्येला आणि हिटर आग्नेयेला असावा. पाण्याचे आऊटलेट दक्षिणेकडे जाणारी नसावी. आणि वायव्येकडून अंदाजे दोन फूट सोडून पश्‍चिमेला टॉयलेट असावं. टॉयलेटमध्ये बसल्यावर बसणार्‍याने पश्‍चिम, उत्तर किंवा दक्षिण दिशा बघावी. नळ ईशान्येला असावा. टॉयलेट पूर्वेला तोंड करून असल्यास आत उभे राहिल्यावर आपला चेहरा दिसेल एवढ्या अंतरावर आरसा लावावा. मूळव्याधीचा त्रास असेल तर टॉयलेटच्या मागील भिंतीवर चार इंचाचा काळ्या रंगाचा चौकोन काढावा.

बहुमजली इमारतीच्या तळमजल्यावरील घरासाठी फेंगशुईचे जे नियम लागू होतात, तसेच नियम दहाव्या मजल्यावरील घरालाही लागू होतात का? की ते नियम बदलतात? वरील मजल्यांसाठी फेंगशुईचे कोणते नियम आहेत?
इमारतीचा तळमजला भक्कम असतो. त्याला इमारतीचा पाया व अवतीभवतीच्या परिसराचा आधार असतो. त्यामुळे तळमजल्यावर राहणारी माणसं मानसिकदृष्ट्या निश्‍चिंत असतात. त्यांना कायम आधार असल्याची भावना जाणवत राहते. ही माणसं दृढनिश्‍चयी असतात. या उलट दहाव्या मजल्यावरील वा अति उंचावरील घरं ही अधांतरी असल्याचा भास होतो. त्यात राहणार्‍या माणसांना सतत, कळत नकळत असुरक्षिततेची भावना जाणवत असते. उंचावरील घरांमध्ये प्रकाश व वारा भरपूर येतो. परंतु वार्‍याच्या अति वेगाने घरातील शुभ ऊर्जा स्थिर राहत नाही. घरातील व्यक्तींना सतत आधाराची कमतरता जाणवते. मानसिकदृष्ट्या या व्यक्ती कायम अस्वस्थ असतात. त्यामुळे त्यांची निर्णयक्षमताही कमकुवत होते. तेव्हा शक्यतो अति उंचावरील घरं घेणं टाळा.

Share this article